कोरोना व्हायरसः राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्याची सध्याची स्थिती काय आहे?

lead image Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा lead image

राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 45 रुग्ण आढळले आहेत, ज्यापैकी 21 रुग्ण एकट्या भिलवाडा जिल्ह्यातील आहेत.

गुरुवारी राज्यातील कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू भिलवाडामधीलच होता आणि गुरुवारी रात्रीच अजून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

भिलवाड्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन आरोग्य विभागानं 332 मेडिकल टीमद्वारे शहरी भागातल्या 1 लाख घरांमधील 5 लाख सदस्य आणि 1948 टीमद्वारे 19 लाख ग्रामीण सदस्यांचं सर्वेक्षण केलं आहे.

राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु शर्मा यांनी एक व्हीडिओ जारी करत म्हटलं आहे की, गेल्या 3-4 दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. भिलवाड्यातल्या 28 लाख नागरिकांपैकी 24 लाख नागरिकांचं स्क्रीनिंग करण्यात आलं आहे.

भिलवाड्यातील सॅम्पलची तपासणी केली जात आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये 700 सॅम्पलची तपासणी पूर्ण होईल. ग्रामीण भागातील 4 लाख नागरिकांचंही पुढील 2 दिवसांत स्क्रीनिंग पूर्ण केली जाईल, असंही ते म्हणाले.

भिलवाडा, जयपूर, झुनझुनू आणि जोधपूरमधून नवे रुग्ण समोर आले आहेत. राजस्थानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 45 वर पोहोचली आहे.

एकट्या भिलवाड्यात कोरोनाच्या 21 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या समोर आल्यानं सरकारची चिंता वाढली आहे. गुरुवारी राजस्थानमध्ये 5 नवीन रुग्ण आढळून आले, यांतील 2 भिलवाड्यातील आहे.

भिलवाडा म्हणजे राजस्थानचं इटली

भिलवाडा आजघडीला राजस्थानचं इटली झालं आहे. इथं कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत आहे. असं असतानाच गेल्या 2 दिवसांपासून राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु मंत्री आणि भालवाड्याचे खासदार विठ्ठल शंकर अवस्थी यांच्यामध्ये स्थानिक परिस्थितीबाबत चर्चासुद्धा झालेली नाही.

Image copyright MOHAR SINGH MEENA/BBC
प्रतिमा मथळा भीलवाडा

आरोग्यमंत्र्यांशी माजी 2 दिवसांपूर्वी चर्चा झाली आहे आणि मी नियमितपणे स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे, असं अवस्थी यांनी म्हटलं आहे.

भिलवाड्यातील आरके कॉलनीमधील रहिवासी लोकेश यांनी सांगितलं की, मेडिकल टीम दोन दिवसांपूर्वी सर्वेक्षणासाठी घरी आली होती. घरातील कुटुंबीयांचं आरोग्य आणि प्रवासाविषयी या टीमनं जाणून घेतलं.

आतापर्यंत 1 लाख 7 हजार कुटुंबातील 5 लाख 33 हजार व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. ग्रामीण भागात गुरुवारपर्यंत 19 लाख व्यक्तींचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. जिल्ह्यातील 28 लाख 50 हजार नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असं भिलवाड्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट यांनी बीबीसीला सांगितलं.

हे सर्वेक्षण कोरोना साखळी ब्रेक होईपर्यंत नियमितपणे करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान कोरोनाचे लक्षण आढळल्यास संबंधित व्यक्तीला आयसोलेशनमध्ये ठेवलं जात आहे, असंही भट्ट म्हणाले.

घरोघरी जाऊन सर्वेक्षण

भिलवाड्यामधील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचं सर्वेक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत.

मुख्य आरोग्य अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जात आहे.

Image copyright MOHAR SINGH MEENA/BBC
प्रतिमा मथळा भीलवाडा

कुटुंबातील कुणी विदेशातून आलं आहे का, ते इतरांना भेटले का, कुणाला सर्दी, खोकला, ताप आहे का, कुणावर बांगड हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आहेत का, याची चौकशी केली जात आहे.

बांगड हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या व्यक्तींची यादी या टीमकडे आहे. ज्याआधारे गेल्या काही दिवसांमध्ये या व्यक्तींच्या आरोग्यात काही बदल झाले आहेत, हेही पाहिलं जात आहे.

कोरोनाग्रस्त रुग्ण खासगी बांगड हॉस्पिटलमध्ये आढळून आले. जितके रुग्ण आढळले आहेत, त्यांच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे, असं भिलवाड्याचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मुस्ताफ अहमद यांनी सांगितलं.

भिलवाड्यातील 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर जयपूरमध्ये उपचार सुरू आहे आणि इतरांना एमजी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. भिलवाड्यात जवळपास 400 जणांमा क्वारंटाईन करण्यात आलं आहे, डॉ. अहमद सांगतात.

राजस्थानात कोरोनामुळे पहिला मृत्यू, कुटुंबातील दोघांना लागण

भिलवाडामध्ये गुरुवारी 73 वर्षांच्या नारायण सिंग यांचा मृत्यू झाला. नारायण यांचा मुलगा आणि नातवालाही कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाची लागण आणि किडनीच्या आजारावर उपचार घेत असलेल्या नारायण सिंग यांचा गुरुवारी मृत्यू झाला, असं भिलवाड्याचे खासदार विठ्ठल शंकर अवस्थी यांनी बीबीसीला सांगितलं.

कलेक्टर राजेंद्र भट्ट सांगतात, नारायण सिंग हे किडनीसंबंधीचा आजार आणि ब्रेन स्ट्रोकवर उपचार घेत होते. ते 4 मार्चपासून 11 मार्चपर्यंत बांगड हॉस्पिटलमध्ये भर्ती होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आधीच घरी पाठवण्यात आलं होतं.

कोमा आणि किडनीसंबंधीचे आजार नारायण सिंग यांचा मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे, असं भट्ट सांगतात.

राजस्थानच्या आरोग्य सचिवांच्या मते, गुरुवारी रात्री भिलवाड्यामध्ये आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. 60 वर्षांच्या सुवालाल जाट यांचाही मृत्यू किडनीसंबंधीचा आजार आणि हृदयविकारामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे.

यापूर्वी 20 मार्चला इटलीच्या एका नागरिकाचा मृत्यू किडनीसंबंधीच्या आजारामुळे झाला होता. या व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, पण, उपचारानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर किडनीसंबंधित आजारावर उपचार करण्यासाठी त्यांनी जयपूरमधल्या एका खासगी दवाखान्यात भर्ती करण्यात आलं होतं.

राजस्थानमधील 3 मृत्यू किडनीसंबंधीचे आजार आणि हृदयासंबंधीचे आजारामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनं आतापर्यंत काय केलं?

कोरोनाग्रस्तांच्या सर्वाधिक संख्येमुळे भीलवाडा राजस्थानमधील कोरोनाचं केंद्र बनलं आहे. 19 मार्चला इथे कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण निदर्शनास आला. यात बांगड हॉस्पिटलमधील डॉक्टर आलोक शर्मा यांच्यासहित 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर राजस्थान सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली.

मग राज्यात कर्फ्यू लावण्यात आला, जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या. भिलवाड्यात सध्या बाहेरगावच्या कुणालाच प्रवेश दिला जात नाही.

कोरोना व्हायरसपासून बचाव व्हावा म्हणून सरकारनं भिलवाड्यातील हॉस्टेल, हॉटेल आणि रिसॉर्ट यांच्यासहित अनेक इमारतींमध्ये जवळपास 4 हजार क्वारंटाईन बेड बनवण्याचं काम सुरू केलं आहे. तसंच खासगी हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये 80 आयसोलेशन बेड तयार करण्यात आले आहेत.

भिलवाड्यात 6,445 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे, 381हून अधिक सॅम्पलची तपासणी सुरू आहे आणि सर्वेक्षणादरम्यान 149 जणांना हाय रिस्क कॅटेगिरीमध्ये ठेवण्यात आलं आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वॉर रूम आणि कोरोना कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. बांगड हॉस्पिटलमध्ये 4 ते 11 मार्चदरम्यान उपचार घेतलेल्या सगळ्या रुग्णांची यादी तयार केली जात आहे.

राज्यात किती प्रकरणं?

  • भिलवाड्यात आतापर्यंत कोरोनाचे 21 रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमधील इतक कोणत्या जिल्ह्यापेक्षा ही संख्या अधिक आहे.
  • झुणझुणूमध्ये 6 कोरोनाग्रस्त आढळले आहेत, तर 190 सॅम्पलची तपासणी सुरू आहे.
  • जयपूरमध्ये 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 42 सॅम्पलची तपासणी सुरू आहे.
  • पालीमध्ये 24 सॅम्पलची तपासणी करण्यात आली, ज्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण समोर आला.
  • प्रतापगड जिल्ह्यात 25 सॅम्पलमध्ये दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट आलं.
  • सीकर जिल्ह्यात 66 सॅम्पलमध्ये 1 रुग्ण आढळला.
  • जोधपूर जिल्ह्यात 136 सॅम्पलची तपासणी करण्यात आली, ज्यात 5 जण पॉझिटिव्ह आढळले, 19 सॅम्पलची तपासणी अद्याप बाकी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)