कोरोना व्हायरस: 'हॉटस्पॉट' झोन नेमके काय असतात?

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना विषाणुचा फैलाव कमी करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र विशेषतः मुंबई, पुणे याशिवाय दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारनेही त्या त्या राज्यातल्या ज्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्यांना 'हॉटस्पॉट' म्हणून घोषित केलं आहे.
हॉटस्पॉट घोषित झाल्यानंतर ते परिसर पूर्णपणे सील होतात.
दिल्ली सरकारने बुधवारी (8 एप्रिल) मध्यरात्री शहरातील 20 भाग हॉटस्पॉट घोषित करून सील केले, तर उत्तर प्रदेशातील 15 जिल्ह्यांमध्ये 104 भाग अतिसंवेदनशील म्हणजेच हॉटस्पॉट असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. हे सर्वच्या सर्व 104 भाग सील करण्यात आले आहेत.
दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आता मुंबईतही घराबाहेर पडताना मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आलं आहे. जे लोक मास्क बांधणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सध्यातरी 15 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असतील.
दिल्लीत जे 20 परिसर सील करण्यात आले आहेत त्या भागांमध्ये जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याची जबाबदारी सरकारची असेल, असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आर. के. तिवारी यांनीदेखील हॉटस्पॉट घोषित झालेल्या भागांमध्ये 100% होम डिलिव्हरी करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे.
त्यांनी म्हटलं, "आरोग्य सेवेव्यतिरिक्त इतर सर्व सेवा बंद असतील. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कम्युनिटी पातळीवर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे."
लॉकडाऊन आणि हॉटस्पॉट यात काय फरक ?
लॉकडाऊनमध्ये लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय, मेडिकल दुकानं आणि खाण्या-पिण्याच्या वस्तुंची दुकानं खुली ठेवण्यात आली आहेत.
मात्र, ज्या भागांना हॉटस्पॉट घोषित करण्यात आलं त्या भागांमध्ये आता केवळ वैद्यकीय सेवेशी संबंधित गोष्टी म्हणजे हॉस्पिटल, क्लिनिक, मेडिकल स्टोअर्स हेच खुले राहतील. याशिवाय फक्त डिलिव्हरी सर्विसमध्ये असणाऱ्या लोकांनाच परिसराच्या बाहेर पडता येणार आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
- हॉटस्पॉट घोषित झालेल्या परिसरातून लोकांना घरून बाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी असेल.
- जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळतील. जीवनावश्यक वस्तू आणि औषधं ऑनलाईन मागवता येतील.
- सरकारने एक कॉल सेंटर सुरू केलं आहे. या कॉल सेंटरवर कॉल करून आवश्यक वस्तूंची ऑर्डर देता येते.
- या परिसरामध्ये राहणाऱ्या ज्या लोकांना लॉकडाऊननंतर कर्फ्यू पास देण्यात आले होते. त्या सर्वांच्या पासची पुनर्तपासणी होईल आणि आवश्यक नसलेले पास रद्द केले जातील.
- फळ-भाज्यांची दुकानं जिथे लोकांची गर्दी होण्याची शक्यता असते, ती बंद करण्यात येतील.
- हॉटस्पॉट परिसरातून बाहेर पडण्याची परवानगी फक्त आणि फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधींनाच असेल.
उत्तर प्रदेशमधील हॉटस्पॉट
उत्तर प्रदेशात सर्वाधिक हॉटस्पॉट आग्रा इथे आहे. आग्रा शहरात तब्बल 22 हॉटस्पॉट परिसर आहे. त्यानतंर गाजियाबादमध्ये 13, गौतमबुद्धनगरमध्ये 12, कानपूरमध्ये 12 आणि वाराणासीमध्ये 4 ठिकाणांना हॉटस्पॉट घोषित करण्यात आलं आहे.
याशिवाय शामलीमध्ये 3, मेरठमध्ये 7, बरेलीमध्ये 1, बुलंदशहरमध्ये 3, बस्तीमध्ये 3, फिरोजाबादमध्ये 3, सहारनपूरमध्ये 4, महाराजगंजमध्ये 4, सीतापूरमध्ये 1 तर लखनौमध्ये मोठी 8 आणि छोटे 5 परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
फोटो स्रोत, TWITTER/NOIDA_AUTHORITY
हे परिसर सील करण्यात येत असल्याची बातमी पसरताच लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि त्यांनी सामान खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठमोठ्या रांगा लावल्या. काही ठिकाणी पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला.
नोएडा प्रशासनाच्या सीईओ रितू माहेश्वरी यांनी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध करून लोकांना न घाबरण्याचं आणि सर्व जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जातील, असं आवाहन केलं.
त्यांनी म्हटलं, "नोएडा प्रशासन फळं, भाज्या, वाणसामान, औषधं या सर्व जीवनावश्यक वस्तू परवानाधारक वेंडर्समार्फत घरपोच देईल. लोकांचं हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. नोएडामध्ये 24 तास कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या कॉल सेंटरमध्ये कॉल करून लोकांना कुठलंही सामान घरी मागवता येईल. हॉटस्पॉटमुळे सील करण्यात आलेल्या परिसरांमध्ये वेंडर्स चिन्हांकित करण्यात येत आहेत. हेच वेंडर्स घरपोच सेवा देतील."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)