कोरोना व्हायरसः भोपाळच्या डॉक्टरांनी कारमध्येच राहाण्याचा निर्णय का घेतला?
- शुरैह नियाजी
- बीबीसी हिंदीसाठी

फोटो स्रोत, SACHIN NAYAK
देशावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाशी सगळेजण सध्या दोन हात करत आहेत. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून लोकांच्या सेवेसाठी झटत आहेत.
भोपाळच्या जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेत असलेले डॉक्टर सचिन नायकसुद्धा अशाच प्रकारे काम करत आहेत.
सचिन नायक कोरोनाग्रस्तांसाठी काम करत आहेत. इथं त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. पुढे हा संसर्ग त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना संसर्गापासून वाचवण्यासाठी सचिन यांनी आपल्या कारलाच आपलं घर बनवलं. आई, पत्नी आणि मुलाला संसर्ग होऊ नये, यासाठी सचिन यांनी हा निर्णय घेतला होता.
पण प्रशासनाने आता सचिन यांची व्यवस्था एका हॉटेलात केली आहे. इथून पुढे ते याठिकाणी आरामात राहू शकतात.
कुटुंबापासून दूर राहाणं किती त्रासदायक?
सचिन नायक सांगतात, हा निर्णय घेणं गरजेचं होतं. आपल्याला इतरांसोबतच कुटुंबीयांचंसुद्धा संसर्गापासून संरक्षण करायचं आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
डॉक्टर सचिन नायक मागच्या एका आठवड्यापासून गाडीतच राहत होते. या गाडीत त्यांनी आवश्यक वस्तू ठेवल्या होत्या. लॅपटॉपसोबतच काही पुस्तकंसुद्धा त्यांनी ठेवली होती. वेळ मिळाल्यानंतर ते ही पुस्तकं वाचायचे.
डॉक्टर नायक व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून घरातल्या लोकांबरोबर बोलत असतात.
फोटो स्रोत, SACHIN NAYAK
सात दिवस सलग काम करून बुधवारी ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले.
यादरम्यान आपली पत्नी आणि आई यांना बाहेरच भेटून ते परतले. काळजी करू नका. मी लवकरच घरी परत येईन, असं त्यांनी आईला सांगितलं.
यावेळी घरातून त्यांनी एक ग्लास पाणीही पिलं. पण या माध्यमातून संसर्ग होणार नाही याची काळजीही त्यांनी घेतली. घरातून जेवणाचा डबा घेऊन सचिन कामावर निघून गेले.
ही लढाई मोठी आहे. पण याच्यावर विजय मिळवता येऊ शकतो, असं सचिन यांना वाटतं. डॉक्टर सचिन नायक यांचा हा किस्सा सर्वत्र चर्चिला जात आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही सचिन यांचं कौतुक केलं. चौहान यांनी डॉक्टर सचिन यांचा फोटो शेअर करताना लिहिलं, या योद्ध्यांच्या मदतीने आपण कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो.
शिवराज सिंह चौहान सातत्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अशा हिरोंचा सन्मान करत आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री चौहान यांनी भोपाळचे माजी मुख्य शल्य चिकित्सक आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर डेहरिया यांचा फोटो शेअर केला होता.
या फोटोत ते पाच दिवसांनी घरी परतले आहेत आणि चहा पित आहेत. डेहरिया यांची पत्नी आणि मुलं त्यांच्यापासून दूर अंतरावर थांबले आहेत.
त्यांचं कुटुंब कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करत आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनीही काही दिवसांपूर्वी डॉक्टर सचिन यांचा फोटो शेअर करून कौतुक केलं होतं. तर इंदूरमधले एक डॉक्टर शत्रुघ्न पंजवानी यांचा गुरुवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.
इंदूरचे सीएमएचओ डॉ. प्रवीण जडिया यांनी ही माहिती दिली आहे.शत्रुघ्न पंजवानी काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण परिस्थिती गंभीर होती. गुरूवारी त्यांचा मृत्यू झाला, असं त्यांनी सांगितलं.
मध्य प्रदेशात एखाद्या डॉक्टरचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे प्रशासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांना दक्षता घेण्यास सांगितलं आहे.
राज्यातील कोरोना व्हायरसग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री चौहान यांन भोपाळ, इंदूर आणि उज्जैनच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले होते. हीच स्थिती महिनाभर दिसू शकते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)