आंबेडकर जयंती कोरोना व्हायरसच्या काळात कशी साजरी करायची? कोण कोण काय काय सांगतंय?

आंबेडकर जयंती

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसमुळे राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन कशापद्धतीनं साजरा करायचा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी जनतेला काय आवाहनं केलं आहे, ते पाहूया.

भीम जयंती ऑनलाईन साजरी करा – प्रकाश आंबेडकर

"बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जमा केलेला निधी सफाई कामगार, आरोग्य सेवक तसंच या कोरोनाच्या काळात जे लोक आपला जीव धोक्यात घालून काम करताय, अशा हातावर पोट असणाऱ्या समूहाला द्यावा. त्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. अशा लोकांची चूल विझणार नाही, याची काळजी घ्या. या गरजू लोकांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्या," असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

"यंदाची जयंती आपण घरातूनच साजरी करावी. घरातील जयंतीचे फोटोज, व्हीडिओ सोशल मीडियावर टाकून इतरांनीही ती घरातून साजरी करावी यासाठी आवाहन करावं. अशाप्रकारे यंदाची जयंती ऑनलाईन पद्धतीनं साजरी करावी," असंही ते म्हणाले.

समतेचा दिवा लावा - रामदास आठवले

"दरवर्षी आपण मोठ्या प्रमाणात भीमजयंती साजरी करतो. पण यंदा कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे घरात थांबूनच आपल्याला भीमजयंती साजरी करायची आहे," असं रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

"मी सकाळी 11 वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कुटुंबीयांना मिठाई वाटणार आहे. या परिस्थितीत गर्दी करू नये."

बाबासाहेबांनी विषमता आणि जातीव्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला, त्यामुळे संध्याकाळी समतेचा दिवा लावा, असंही त्यांनी म्हटलंय.

यंदा भीमजयंती पुढे ढकलण्याचा विचार करावा - शरद पवार

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यंदाचा उत्सव पुढे ढकलण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला आहे.

"14 एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा साजरा केला जातो. कोरोना व्हायरसच्या काळात गर्दी टाळण्यासाठी हा जयंतीचा उत्सव दोन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी पुढे ढकलण्याचा विचार करावा. कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत असताना आपण एकत्रित आलात तर आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होतील," असं त्यांनी म्हटलं आहे.

रेशन किटचं वाटप करा - जे. पी. नड्डा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा दिवस कसा साजरा करावा, याविषयीचं निवदेन ट्विटरवर जाहीर केलं आहे.

त्यांनी म्हटलंय, "भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं घरात पूजन करावं आणि फोटो सोशल मीडियावर शेयर करावा.

फोटो स्रोत, BJP4India

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी व्हीडिओ मेसेजद्वारे जनतेला आवाहन करावं. तसंच शक्य तितक्या घरात रेशन कीटचं वाटप करा आणि आंबेडकरांवर निबंध, कविता, लेख लिहून ते सोशल मीडियावर शेयर करा."

तरुण पीढीला इतिहास समजावून सांगा - काँग्रेस

"यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात महावीर जयंती, हनुमान जयंती, मुस्लीम बांधवांची शब-ए-बारात झाली. हे सगळे सण जनतेनं कायद्याचं पालन करत आपापल्या घरात साजरे केले. याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीसुद्धा घरात राहूनच साजरी करायची आहे," असं आवाहन काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केलं आहे.

"घरात राहून कशी साजरी करायची, तर येणारी जी पीढी आहे त्या पीढीली बाबासाहेब आंबेडकर, देशाची घटना, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांचा इतिहास सखोलपणे समजून सांगा. तो इतिहास आज आपल्या तरुण पीढीला समजावून सांगण्यासाठी वेळ आणि संधी आहे. त्याचा वापर आपण करून घ्यायला हवा," असंही वाघमारे यांनी सांगितलं.

वाचन-अध्ययन करा - मनीषा कायंदे

"बाबासाहेबांची यंदाची जयंती आपण घरी बसूनच साजरी करायची आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं आपण वाचू शकतो किंवा इंटरनेटवरील त्यांच्याविषयीची माहिती पाहू शकतो. अशाप्रकारे वाचन आणि अध्ययन करून आपल्याला बाबासाहेबांची यंदाची जयंती साजरी करायची आहे," असं आवाहन शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे करतात.

"खरं तर आपण महापुरुषांचे स्मारकं बांधतो, त्यावेळी त्याची उंची किती असेल, रुंदी किती असेल अशा बाह्य गोष्टींकडे आपलं लक्ष असतं. पण, मला वाटतं महापुरुषांचं चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घेणे, हीच जयंती साजरी करण्याची खरी पद्धत असते," असंही त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images

आंबेडकरी कलाकारांना मदत करा – दिशा शेख

"यंदाची भीम जयंती घरात राहूनच साजरी करावी, त्यासाठी इतरांना आमंत्रणही देऊ नये. खरंतर भीम जयंतीसाठी बाबासाहेबांच्या अनुयायांनी अनेक दिवसांपासून आर्थिक बचत केलेली असते. जेणेकरून 14 एप्रिलला नवीन कपडे घेता येईल किंवा काही नवीन पदार्थ खाता येईल. पण, यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे साचवून ठेवलेले पैसे आरोग्य विभाग अथवा इतर गरजू व्यक्तींना द्यावेत," असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख यांनी केलं आहे.

"याशिवाय आंबेडकरी कलाकारांसाठी एप्रिल महिना महत्त्वाचा असतो. या महिन्यातल्या कमाईवर ते वर्षभर गुजराण करतात. त्यामुळे या कलाकारांना काही आर्थिक मदत करता येते का, तेही बाबासाहेबांच्या अनुयायांनी बघायला हवं. हीच आंबेडकरी विचारांची भीम जयंती ठरेल," असं त्यांनी पुढे सांगितलं.

गोरगरिबांपर्यंत पोहोचून मदत करा - इम्तियाज जलील

"सध्या कोरोनाच्या संकटात आंबेडकरी विचारांचे युवक खूप चांगलं काम करत आहेत. गोरगरिबांना अन्न तसंच मास्कदेखील पुरवायचं काम ते करत आहेत. तेच काम नेटानं पुढे घेऊन जायची गरज आहे. बाबासाहेबांनी शिकवण दिल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी गोरगरिबांपर्यंत पोहोचून त्यांना शक्य तितकी मदत करायला हवी. अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करायला हवी," असं आवाहन AIMIMचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)