कोरोना व्हायरस संकटानंतर अर्थव्यवस्था मुसंडी मारेल - असं रतन टाटा खरंच म्हणाले? फॅक्ट चेक

या आरोग्य संकटाच्या काळात फक्त कोरोना व्हायरसच नव्हे तर फेक न्यूजही वेगाने पसरत आहे. अशात बीबीसीची फॅक्ट चेक टीम कोरोना व्हायरससंबंधित सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांची सत्यता पडताळत आहे.
पाहू या काय खरं, काय खोटं...
रतन टाटांचा तो मेसेज
"कोरोना व्हायरसच्या संकटाबाबत बरंच काही बोललं जात आहे. सर्वत्र निराशा आहे. पण एक लक्षात घ्या की या कोरोनाच्या राक्षसाला आपण धोबीपछाड देऊन, आपली अर्थव्यवस्था मुसंडी मारेल..." अशा आशयाचा एक मेसेज टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष रतन टाटांच्या नावे सोशल मीडियावर फिरतोय.
या संकटकाळात हा मेसेज आशा देणारा आहे, त्यामुळे तो सर्रास शेअर केला जातोय. अगदी अभिनेते अर्शद वारसी आणि हुमा कुरेशी यांनीही ही पोस्ट शेअर केली आहे.
पण रतन टाटांनीच स्वतः मग एक पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत "मी असं कधी बोललो किंवा लिहिलं नाही," असं स्पष्ट केलं.
कृपया व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया साईट्सवर फिरणारा कंटेट तपासून शेअर करा, असं आवाहनसुद्धा त्यांनी केलं.
जेफ बेझोसनं असं म्हटलं?
यशस्वी उद्योजकांचे मेसेज व्हायरल होण्याची गोष्ट फक्त भारतातच घडत नाहीये. असाच एक फेक मेसेज अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या नावाने शेअर होतो आहे.
अमेझॉनचे संस्थापक बेझोस यांनी कोविड-19च्या मुद्द्यावर आफ्रिकी लोकांना एक संदेश दिला आहे, असा दावा एका मेसेजमधून केला जात आहे.
बिल गेट्स आफ्रिकेला अस्थिर करू पाहत आहेत. आफ्रिकी लोकांना एका विशिष्ट पद्धतीचे मास्क वापरू नयेत, कारण त्यात विषारी घटक असतात, असं या मेसेजमध्ये म्हटलं होतं.
मात्र अमेझॉननंही हा दावा फेटाळून लावला आहे.
या खोट्या मेसेजला फ्रान्समध्ये शेकडो लोकांनी कॉपी-पेस्ट केलं. यासंबंधीची मूळ पोस्ट डीआर कॉन्गो या अकाऊंटवरून करण्यात आल्याचं दिसून येतं.
जानेवारीत हे अकाऊंट सुरू करण्यात आलं आणि या पोस्टला 30 हजारहून अधिक वेळा शेयर करण्यात आलं.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
5G वर चुकीची पोस्ट
5G तंत्रज्ञान आणि कोरोना व्हायरस यांचा संबंध जोडणाऱ्या अफवांकडे लक्ष न देण्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. त्यांनी या अफवांना कोणताही आधार नसल्याचं म्हटलं आहे.
असं असलं तरी काही चुकीचे मेसेज फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर शेयर केले जात आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे नवनवे आजार येत आहेत, अशा हजारो पोस्ट शेयर करण्यात आल्या आहेत.
यात दावा केलाय की, 1979मध्ये 1G आलं तेव्हा इनफ्लुएंजा आला, 2Gच्या वेळेस कॉलरा आणि आता 5Gच्या वेळेस कोव्हिड-19चा प्रसार झाला आहे.
हे चुकीचं आहे. या घटनांचा एकमेकांशी काहीएक संबंध नाही.
लॅम्पपोस्टवर लागलेल्या पोस्टर्सवरील फोटोंवर दावा करण्यात आला आहे की, कोविड-19 कधीच अस्तित्वात नव्हता आणि 5जीमुळेच लोकांचा जीव जात आहे. हा दावा चुकीचा आहे.
टेस्टिंग किट्सला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर ब्रिटननं चिनी कंपनी हुआवेईबरोबरचा करार रद्द केला आहे, असा दावा फेसबुक आणि ट्वीटरवर इंग्रजी, अरबी, पोर्तुगाली, फ्रान्सिसी भाषेत हजारो वेळा शेयर करण्यात आला आहे.
पण, ब्रिटनची हुआवेईसोबतचा करार अद्याप कायम आहे. टेस्टिंग किट्सला कोरोनाचा संसर्ग झाला, याचे काहीच पुरावे नाहीत.
यानंतर एक अफवा समोर आली की, कोरोना व्हायरस आणि 5G तंत्रज्ञान नव्या 20 पौंडांच्या नोटांशी संबंधित आहेत.
या नोटाच्या मागील भागात कथित 5G टेलीकॉम टॉवरच्या वरती दिसणारी गोष्ट म्हणजे व्हायरस आहे, असे मेसेज पसरवण्यात आले.
खरं तर या नोटेची डिझाईन जाहीर झाल्यानंतर बँक ऑफ इंग्लंडनं म्हटलं होतं की, ज्याला कोराना व्हायरस म्हटलं जात आहे, ते टेट ब्रिटेन आर्ट गैलरीचा रोटंडा आहे. तिथंच फोन टॉवर मार्गेटचं लाइटहाउस आहे.
या अफवेविषयी सविस्तर इथे वाचू शकता - 5G तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरसचा जास्त प्रसार झाला का?
अँब्युलन्स व्हॉइस नोट
इंग्लंडमध्ये आणखी एक ऑडियो मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरतोय, ज्यात एक महिला दावा करतेय की, ती साउथ ईस्ट कोस्ट अँब्युलन्स सर्व्हिससाठी काम करते आणि ते पब्लिक हेल्थ इंग्लंडकडून मिळणाऱ्या माहितीची देवाणघेवाण करत आहे.
या मेसेजमध्ये ही महिला म्हणते की, कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये सुदृढ आणि तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.
अनेकांनी हा ऑडिओ मेसेज बीबीसीच्या बातमीदारांना आणि साउथ ईस्ट कोस्ट अँब्युलन्स सर्व्हिसकडे पाठवून विचारणा केली. त्यामुळे हा मेसेज व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात शेयर झाल्याचं दिसून येतं.
याविषयी पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या मुख्य नर्स विव बेनेट म्हणाल्या, "ही एक फेक न्यूज आहे. आम्ही लोकांना विनंती करतो की, त्यांनी याकडे दुर्लक्ष करावं आणि तिला शेयर करू नये."
या मेसेजमध्ये शेयर केलेली गोष्ट चुकीची आहे, असंही बेनेट यांनी स्पष्ट केलंय.
नासानं भारताच्या टाळ्या ऐकल्या का?
भारतीयांनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवल्या, तेव्हा एक अशाप्रकारचा आवाज तयार झाला जो अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं ऐकला. यामुळे कोरोना व्हायरसला परत जावं लागलं.
आवाज इतक्या दूरवर कसा जाणार?
हा मेसेज दोन आठवड्यांपूर्वीचा आहे, पण आम्ही अशा लोकांना ओळखतो जे आजही हाच मेसेज शेयर करत आहेत. भारत सरकारनं ही बाब फेटाळून लावल्यानंतरही हे चालूच आहे.
अमेरिकेच्या वैज्ञानिकाविषयीच्या मेसेजचा फॅक्ट चेक
कोरोना व्हायरसची निर्मिती केल्यामुळे हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक करण्यात आली, असेही दावे करण्यात आले. ही बातमी व्हायरल झाली आणि अनेक भाषांमध्ये प्रसारित झाली. लाखो वेळेस ती शेयर करण्यात आली.
पोस्टमध्ये म्हटलं की, चार्ल्स लीबर यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आणि त्यांनीच कोरोना व्हायरसची निर्मिती केली आणि चीनमध्ये त्याची विक्री केली.
लीबर यांना यंदा जानेवारी महिन्यात चीनमधील संपर्काविषयी खोट बोलल्यामुळे अटक करण्यात आली होती.
पण कोरोना व्हायरसच्या निर्मितीसाठी किंवा तो चीनसा विकण्यासाठी अटक केली, हा दावा खोटा आहे.
यांतील अनेक पोस्टमध्ये जानेवारीमध्ये आलेली अमेरिकी न्यूज क्लिपसुद्धा आहे.
नॅचरल रेसिपीसंबंधीच्या एका स्पॅनिश फेसबुक पेजवर ही क्लिप शेयर करण्यात आली होती आणि अडीच लाखांहून अधिक वेळा शेयर करण्यात आलं होतं.
कोरोना व्हायरसची जीनोम सीक्वेंसिंग सांगते की, हा आजार जनावरांपासून माणसात आला आहे आणि तो माणसांनी निर्माण केलेला नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)