कोरोना व्हायरस: भारतातला कोव्हिड-19चा पहिला मृत्यू वादग्रस्त का ठरतोय?

  • सौतिक विश्वास
  • बीबीसी प्रतिनिधी
मोहम्मद हुसैन सिद्दिकी
फोटो कॅप्शन,

मोहम्मद हुसैन सिद्दिकी

फेब्रुवारीचा शेवटचा दिवस होता. मोहम्मद हुसैन सिद्दिकी महिनाभर आपल्या धाकट्या मुलाकडे राहून भारतात परतले होते. त्यांचा धाकटा मुलगा सौदी अरबमधल्या जेद्दाहमध्ये डेंटिस्ट आहे.

76 वर्षांचे मुस्लीम स्कॉलर आणि निवृत्त न्यायाधीश सिद्दिकी हैदराबाद विमानतळावर उतरले, तेव्हा त्यांच्या ड्रायव्हरने पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवत होता.

ते गाडीत बसले आणि शेजारच्या कर्नाटक राज्यातल्या गुलबर्गातल्या आपल्या घराकडे रवाना झाले. हैदराबादहून गुलबर्गा 240 किमी अंतरावर आहे. रस्त्यात ते चहा आणि दुपारच्या जेवणासाठी थांबले. जवळपास चार तासात ते घरी पोचले.

त्यांचे थोरले चिरंजीव हमीद फैजल यांनी सांगितलं, "मला वडील म्हणाले की ते बरे आहेत. त्यांच्याकडे बघूनही ते बरे आहे, असंच वाटत होतं. ते माझ्या भावाकडे महिनाभर राहून आले होते. मग त्यांनी आमची विचारपूस केली."

मात्र 10 दिवसांनंतर सिद्दिकींचा मृत्यू झाला. भारतात कोव्हिड-19 मुळे झालेला हा पहिला मृत्यू होता.

आठवडाभरानंतर पडले आजारी, तीन दिवसानंतर मृत्यू

मोहम्मद हुसैन सिद्दिकी भारतात परतल्यानतंर जवळपास आठवडाभराने त्यांची प्रकृती बिघडली आणि पुढच्या तीन दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये नेताना अॅम्ब्युलंसमध्येच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

सिद्दिकी यांची प्रकृती खराब होत असल्याचं बघून कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी सिद्दिकी यांना दोन दिवसात दोन शहरातल्या चार हॉस्पिटल्समध्ये दाखवलं. पाचव्या हॉस्पिटलला जाताना अॅम्ब्युलन्समध्ये त्यांचा मृत्यू झाला.

सिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलने सांगितलं की, त्यांची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

अहमद फैजल सिद्दिकी सांगतात, "त्यांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला, यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाहीय. आम्हाला अजून डेथ सर्टिफिकेटही मिळालेलं नाही."

उपचारामध्ये गोंधळ

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

अनेक अर्थांनी सिद्दिकी यांचा मृत्यू भारतात कोव्हिड-19 वरच्या उपचारांमध्ये असलेला गोंधळ अधोरेखित करतो.

सिद्दिकी आपल्या थोरल्या मुलासोबत गुलबर्गामध्ये एका दुमजली घरात राहायचे. ते जेद्दाहवरून परतले, तेव्हा त्यांची प्रकृती उत्तम होती.

पत्नीचं कॅन्सरने निधन झाल्यानंतर पाच वर्षांपूर्वीच त्यांनी काम बंद केलं होतं, म्हणजे एकप्रकारे निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर त्यांचा बराचसा वेळ पुस्तकांनी भरलेल्या त्यांच्या ऑफिसमध्येच जायचा. ते स्थानिक मशिदीचे केअरटेकरही होते. त्यांचे एक मित्र गुलाम गौस सांगतात, "ते उदार आणि विद्वान होते."

7 मार्च रोजी सिद्दिकी यांनी तब्येत बरी नसल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते लवकर उठले. त्यांना खूप खोकला येत होता. त्यांनी पाणी मागितलं. त्यांचे फॅमिली डॉक्टर लगेच घरी आले. सिद्दिकी यांना त्यांनी सर्दी-खोकल्याची एक टॅब्लेट दिली आणि निघून गेले.

त्या दिवशी त्यांचा खोकला खूपच वाढला. रात्रभर झोप लागली नाही. एव्हाना त्यांना तापही चढला. 9 मार्चला कुटुंबीयांनी त्यांना गुलबर्गामधल्या एका हॉस्पिटलला नेलं. तिथे त्यांना 12 तासांसाठी दाखल करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

वक्तव्यांमध्ये तफावत

इथूनच पुढे सगळ्या गोंधळाला सुरुवात झाली.

या हॉस्पिटलने दिलेल्या डिस्चार्ज नोटमध्ये म्हटलं आहे की, सिद्दिकी यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्युमोनिया आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचाही त्रास आहे.

सिद्दीकी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना हैदराबादच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं. मात्र, या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कधीच त्यांना कोव्हिड-19 असावा, अशी साधी शंकाही उपस्थित केली नाही.

मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, "गुलबर्गामधल्या हॉस्पिटलने त्यांना संशयित कोरोना रुग्ण म्हटलं होतं. याच पत्रकात पुढे सांगितलं आहे की, गुलबर्गामधल्याच हॉस्पिटलने त्यांचा स्वॅब घेतला होता आणि हा नमुना चाचणीसाठी बंगळुरूच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता."

गुलबर्गाहून बंगळुरू जवळपास 570 किमी अंतरावर आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात सिद्दिकी यांच्या कुटुंबावर त्यांना गुलबर्गातल्या हॉस्पिटलमधून घेऊन गेल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यात लिहिलं आहे, "चाचणीचा अहवाल येण्याची वाट बघण्याआधीच रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना तिथून नेण्याचा आग्रह धरला आणि वैद्यकीय सल्ल्याविरोधात त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना हैदराबादमधल्या एका खासगी हॉस्पिटलला घेऊन गेले."

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, हमीद फैजल सिद्दिकी सांगतात, "आमच्यावर हे आरोप का करण्यात येत आहेत, मला कळतच नाही. त्यांनी आम्हाला इथेच थांबायला सांगितलं असतं तर आम्ही त्यांना गुलबर्गामधल्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतो. जे हॉस्पिटलने सांगितलं तेच आम्ही केलं आणि आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत."

मात्र, जिल्ह्यातले अधिकारी सांगतात की सिद्दीकी यांना स्थानिक सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगण्यात आलं होतं, जिथे कोव्हिड-19 साठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आला होता. या अधिकाऱ्याने सांगितलं की कुटुंबीय मात्र त्यांना बाहेर घेऊन जाण्यावर अडून बसले होते.

हॉस्पिटलच्या वाऱ्या

10 मार्चच्या संध्याकाळी सिद्दिकी यांना अॅम्ब्युलन्समध्ये नेण्यात आलं. तिथे एका पॅरामेडिकने त्यांना ऑक्सिजन आणि आयव्ही लाईन चढवलं. मुलगा, मुलगी आणि जावई त्यांच्यासोबतच होते.

रात्रभर प्रवास करून ते सकाळी हैदराबादला पोहोचले. हैदराबादला पोहोचल्यावर ते सिद्दिकी यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलला घेऊन गेले.

एका न्युरॉलॉजिकल क्लिनिकने त्यांना दाखल करून घ्यायला नकार दिला आणि त्यांना हैदराबादच्या सरकारी हॉस्पिटलसाठी रेफर केलं. सिद्दिकी कुटुंबीयांनी तिथे तासभर वाट बघितली. कुटुंबातल्या एकाने सांगितलं, "एकही डॉक्टर त्यांच्याकडे फिरकला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो."

फोटो स्रोत, Getty Images

अॅम्ब्युलंसमध्ये सिद्दिकी यांची प्रकृती ढासळत होती. शेवटी ते सुपर-स्पेशलिटी हॉस्पिटलला पोहोचले. डॉक्टरांनी काही तास त्यांच्यावर लक्ष ठेवलं. हॉस्पिटलने त्यांना पॅरासिटॅमॉल दिलं. नेब्युलाईझर लावलं आणि आईव्ही फ्लुईडवर ठेवलं. तसंच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला.

हैदराबादमध्येही कुटुंब आणि हॉस्पिटलच्या दाव्यांमध्ये तफावत आढळते.

या हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज नोटवर लिहिलं की, त्यांनी भर्ती करण्याचा सल्ला दिला होता. रुग्णाला धोका असल्याची संपूर्ण कल्पनाही त्यांना देण्यात आली होती. मात्र, कुटुंबीय त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करायला तयार नव्हते.

मात्र, हा दावाही चुकीचा असल्याचं सिद्दिकी कुटुंबीयांचं म्हणणं आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने रुग्णाला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तिथे त्यांची कोरोना चाचणी करा आणि मग या हॉस्पिटलमध्ये या, असं सांगितल्याचं सिद्दिकी कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

कुटुंबातल्या एकाने सांगितलं, "आम्हाला कळत नव्हतं की आम्ही काय करावं. आम्ही तिथून निघालो आणि गुलबर्गाला परतण्याचा निर्णय घेतला."

दुसऱ्या दिवशी सकाळी अॅम्ब्युलन्स गुलबर्गाला पोचली तोवर सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. 600 किमीचा प्रवास केल्यानंतर मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली होती.

त्यांच्या मृत्यूसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका शासकीय पत्रकात म्हटलं आहे, "लक्षणं दिसायला सुरुवात झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना एकाही सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं नव्हतं."

गुपचूप उरकला दफनविधी

आपले वडील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेले भारतातले पहिले रुग्ण असल्याचं आपल्याला दुसऱ्या दिवशी टिव्हीवरून कळाल्याचं मोहम्मद सिद्दिकी यांचे चिरंजीव सांगतात. दुपारी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर गुपचूप दफनविधी पार पाडण्यात आला.

सिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर गुलबर्गामध्ये कोव्हिड-19 चे 20 हून अधिक रुग्ण आढळले आहेत आणि इतर दोघांचा मृत्यू झाला आहे.

फोटो कॅप्शन,

मोहम्मद हुसैन सिद्दिकी

सिद्दिकी यांची 45 वर्षांची मुलगी आणि फॅमिली डॉक्टर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, दोघही आता यातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

सिद्दिकी त्या रात्री अॅम्ब्युलन्समध्ये आपल्या मुलाला म्हणाले होते, "मला तहान लागली आहे. थोडं पाणी दे आणि मला घरी घेऊन चल."

सिद्दिकी यांचे कुटुंबीय घरी परतले. मात्र त्यांना घरी पोहोचता आलं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)