कोरोना लॉकडाऊन: राज ठाकरे यांना सामनातून टोला - 'वाईन शॉपचा सल्ला महसूलासाठीच ना...?'#5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

फोटो स्रोत, Getty Images
1. मद्यविक्रीची सल्ल्यावरून राज ठाकरे यांना सामनातून टोला
लॉकडाऊनमध्ये वाईन शॉप्स सुरू करावेत, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यावर आज शिवसनेचं मुखपत्र सामनातून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
"सध्या मोकळा वेळ आहे, रिकामा मित्र परिवार आहे, कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात आणि बाजारात मद्य नसल्यानं मोठ्या वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तडफडणाऱ्या जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकार दरबारी मांडले आहे.
"राज्यातील लाख-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत. राज ठाकरे यांच्या मद्यविक्रीला परवानगी द्यावी या मागणीमुळे घरोघरच्या रिकामच्या बाटल्या, प्यालेही फसफसू लागले आहेत," अशी टिप्पणी करत पुढे संपादकीयमध्ये एक शंका उपस्थित करण्यात आली आहे.
"राज ठाकरे यांनी जी मागणी त्यात दोन शंका आहेत. एक म्हणजे या मागणीमागे नक्की राज्याच्या महसूलाचाचा विचार आहे ना? की तळीरामांच्या कोरड्या घशाच्या चिंतेतून राज यांनी ही मागणी केली आहे?" असा प्रश्न सामनाच्या संपादकीयमधून विचारण्यात आलाय.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
2. कोरोना योद्ध्यांसाठी एक कोटी PPE कीट्स
कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकांसाठी एक कोटी संरक्षण किट्सचे मुंबईहून वितरण सुरू झाले आहे. टाटा ट्रस्टच्या पुढाकाराने देशभरातील विविध भागांत ही सामग्री पोहोचवली जाणार आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी विविध क्षेत्रातील लोक प्रत्यक्ष सेवा देत आहेत. तर लॉकडाउनच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पोलिसदेखील रस्त्यावर अहोरात्र सेवा देत आहेत. परंतु यापैकी अनेक कोरोना योद्ध्यांकडे सुरक्षेची पुरेशी साधने नाहीत. ती पुरविण्यासाठी टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.
फोटो स्रोत, ANI
त्याअंतर्गत 150 कोटी रुपयांची सुरक्षा साधने ट्रस्टने विविध देशांमधून आयात होत आहेत. त्यानंतर त्याचे विविध भागात वितरण सुरू झाले आहे. टाटा ट्रस्टच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "या सुरक्षा सामग्रीमध्ये प्लास्टिकचा ओव्हरऑल कोट, मास्क, हातमोजे व प्लास्टिकचे चष्मे यांचा समावेश आहे. ही सामग्री प्रामुख्याने जिथे सुरक्षा सामग्रींचा अभाव आहे, तेथे पोहोचवली जात आहे. त्याची सुरुवात गुरुवारी मुंबईतून झाली. येत्या काळात हा पुरवठा अधिक जोमाने केला जाईल."
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं, तर मी नागपुरात बसल्याबसल्या लाख-दीड लाख पीपीई कीट नागपूरहून मुंबईहून पाठवायला तयार आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
3. उत्तर प्रदेश सरकार मजुरांना परत आणणार
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे इतर राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना उत्तर प्रदेश सरकार परत आणेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सांगितले आणि यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
इतर राज्यांमध्ये अडकून पडलेल्या आणि तेथे 14 दिवसांचे विलगीकरण पूर्ण केलेल्या लोकांची यादी तयार करावी, जेणेकरून त्यांना टप्प्या-टप्प्यात परत आणता येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
संबंधित राज्यांनी या मजुरांची तपासणी करून त्यांना उत्तर प्रदेशच्या सीमेपर्यंत आणल्यानंतर त्यांना त्यांच्या खेडय़ांमध्ये पाठवण्यात येईल. मात्र आधी त्यांना त्यांच्या जिल्ह्य़ात १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल. यासाठी व्यवस्था करावी आणि ती ठिकाणे र्निजतुक करावीत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
4. मानव प्राणी संघर्षात 21 जणांचा मृत्यू
लॉकडाऊनच्या काळात मानव-प्राणी संघर्षात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
Wildlife Institute of India या संस्थेनं लॉकडाऊनच्या काळातील मानव-प्राणी संघर्षावर अभ्यास करण्यासाठी Lockdown Wildlife Tracker नावाचं एक अप तयार केलं आहे.
या 21 मृत्यूंपैकी 13 मध्यप्रदेशातील आहेत, तर विदर्भात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या 8 पैकी 7 मृत्यू गेल्या 15 दिवसांतील आहे.
5. युग चांडकच्या मारेकऱ्यांना मरेपर्यंत जन्मठेप
नागपूरमधील आठ वर्षीय बालक युग चांडक याच्या खून प्रकरणातील आरोपी राजेश धन्नालाल दवारे आणि अरविंद अभिलाष सिंग यांची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली.
तसंच, आरोपींना मरेपर्यंत कारागृहात ठेवण्यात यावे आणि त्यांना 25 वर्षे कारावास भोगल्याशिवाय शिक्षामाफी देण्यात येऊ नये, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आलं. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
कोणतेही परिश्रम न घेता झटपट श्रीमंत होण्याच्या उद्देशाने आरोपींनी युगचे 1 सप्टेंबर 2014 ला अपहरण केलं आणि खंडणी मागितली. पण प्रकरण अंगलट येत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी युगचा निर्घृण खून केला.
परंतु, कायद्यानुसार आरोपींना दुर्मिळातल्या दुर्मिळ घटनेतच फाशीची शिक्षा सुनावता येते आणि ही घटना या निकषात बसण्यामध्ये थोडक्यात कमी पडते, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने हा सुधारित निर्णय देताना नोंदवलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हालाफेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)