‘घर मालकानं हाकलल्यामुळे मी आता हॉस्पिटलच्या कोव्हिड-19 वॉर्डबाहेर झोपतो’

  • मयांक भागवत
  • मुक्त पत्रकार
किरण धायगुडे

फोटो स्रोत, MayankBhagwat

फोटो कॅप्शन,

किरण धायगुडे

देशातील कोट्यवधी जनता आणि कोरोना व्हायरस यांच्यामध्ये एक मजबूत भिंत म्हणून आरोग्य कर्मचारी उभे आहेत. शत्रूशी दोन हात करताना हे आरोग्य कर्मचारी आपली ढाल बनलेत.

मात्र, या कर्मचाऱ्यांना समाजात भेदभावाचा सामना करावा लागत आहे. काहींना घरातून काढून टाकलं जात आहे. काहींवर शाब्दिक शेरेबाजी केली जात आहे तर काहींवर काम न करण्यासाठी दबाव आणला जात आहे. मुंबईतल्या अशाच काही कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न आम्ही केला.

'15 दिवस केईएममधील बाग माझं घर बनलीय'

मुंबईच्या केईएम रुग्णालयातील 'कोव्हिड-19 वॉरिअर' किरण धायगुडे यांची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. ज्या रुग्णांजवळ जाण्यास सामान्य घाबरतात अशा कोरोनाग्रस्तांची काळजी किरण घेतात. रुग्ण बरा झाला पाहिजे, या धेयाने झटतात. मात्र, किरण यांच्या पाठी कोणीच उभं राहिलं नाही.

किरण मुळचे साताऱ्याचे. मुंबईत त्यांचं कोणीच नाही. केईएम रुग्णालयात कंत्राटी वॉर्डबॉयची नोकरी करतात. मात्र, या ड्यूटीने त्यांच्या डोक्यावरील छत हिरावून घेतलंय.

किरण म्हणतात, "वडाळ्यात मित्रांसोबत बॅचलर रहायचो. कोव्हिड-19 वॉर्डमध्ये ड्युटी लागली. घर मालकाला कळलं. त्याने उद्यापासून घरी येवू नको असं फर्मान काढलं. काय करणार डोक्यावरचं छप्पर गेलं. या शहरात ओळखीचं, नातेवाईक कोणीच नाही. ड्युटी टाकून घरी जावू शकत नाही. मग, केईएमच्या आवारातील बागेला घर बनवलं. या बागेने मला 15 दिवस आसरा दिला. ही बाग म्हणजे माझं कुटुंब बनली."

गेल्या तीन वर्षांपासून किरण केईएममध्ये काम करतायेत. आपल्या अनुभवाबाबत किरण पुढे म्हणतात, "मी कोव्हिड-19 वॉर्डमध्ये रुग्णांची काळजी घेतो. पण, माझी काळजी घेणारं कोणीच नाही. बागेत झोप लागात नाही. भयंकर डास आहेत. दुसऱ्या दिवशी ड्यूटीला त्रास होतो. पण, करणार काय... पर्याय नव्हता. शेवटी मलाही पोट आहे. गावी कुटुंब आहे."

पाणावलेल्या डोळ्यांनी किरण पुढे सांगतात, "काही दिवसांनी मला बागेतही राहू दिलं गेलं नाही. सिक्युरिटीवाले ओरडायला लागले. इथे थांबू नकोस म्हणून. मग काय, पुन्हा जागा शोधणं आलं. इतर वॉर्डमध्ये गेलो तर इन्फेक्शन होईल म्हणून लोक थांबू देत नव्हते. मग, कोव्हिड-19 वॉर्डबाहेरच थांबण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता मी ज्या ठिकाणी ड्युटी करतो, तिथेच झोपतो."

सध्या किरण यांची नाइट ड्युटी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी किरण यांचा संपर्क केईएम रुग्णालयातील डॉ. दीपक मुंडे यांच्यासोबत आला. डॉ. मुंडे यांनी किरण यांना कोरोना नसल्याचं पत्र दिलं. जेणेकरून त्यांना राहायला घर मिळेल.

डॉ. दीपक मुंडे म्हणतात, "कोरोना विरोधातील युद्धात शत्रूशी लढाई करतायत देशभरातील आरोग्य कर्मचारी. पण, आरोग्य कर्मचाऱ्यांना समाजाकड़ून मिळणारी वागणूक मनाला ठेच लावून जाते. आम्हाला समाजाकडून आदराची अपेक्षा नाही. आम्ही कोणासाठी लढतोय? जीवाची बाजी कोणासाठी लावतोय? आमच्याकडे समाज कोणत्या भावनेने पाहतोय याचं दुख होतं. समाजाने आरोग्य कर्मचाऱ्यांना चुकीची वागणूक देवू नये."

'रुग्णांना माझी गरज असताना मी पोहोचू शकलो नाही'

मुंबईतील विलेपार्ले परिसरात आरोग्यसेवा देणारे आयुर्वेदिक फिजीशिअन डॉ. देवीप्रसाद राव यांनादेखील समाजाच्या विरोधाचा सामना करावा लागला. डॉक्टरांसाठी त्यांचे रुग्ण म्हणजे कुटुंबापेक्षा कमी नक्कीच नाही. पण, डॉ. राव रुग्णांना भेटू शकले नाहीत.

फोटो स्रोत, DeviprasadRao

फोटो कॅप्शन,

डॉ. देवीप्रसाद राव

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

समाजाकडून मिळालेल्या वागणुकीबाबत अनुभव सांगताना डॉ राव म्हणतात, "मला सर्वांत जास्त दुःख याचं आहे की, माझ्या पेशंटना जेव्हा माझी खरी गरज होती. तेव्हा मी त्यांची मदत करू शकलो नाही. एका डॉक्टरला यापेक्षा जास्त दुख काय होणार. आम्ही रुग्णांवर उपचार करण्याची शपथ घेतलीये. पण, काही लोकांमुळे मला गरज असतानाही रुग्णांना पाहता आलं नाही."

डॉ राव यांचं क्लिनिक असलेल्या सोसायटीमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला होता. पण, महापालिकेने त्यांचं क्लिनिक सील केलं नाही. मग त्यांना रुग्णांना तपासण्यापासून कुणी रोखलं.

याबाबत ते बोलताना डॉ. राव सांगतात, "माझं क्लिनिक असलेल्या सोसायटीत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याचं कळल्यानंतर माझ्या राहत्या सोसायटीतील कमिटीने मला आणि माझ्या कुटुंबीयांना 14 दिवस होम क्वॉरेंन्टाईन होण्याची सूचना केली. मी कोव्हिड टेस्ट केली. रिपोर्ट निगेटिव्ह आले. पण, सोसायटीच्या लोकांचा दबाव काही कमी झाला नाही. रुग्णांना माझी गरज असतानाही, मला माझ्या कर्तव्यापासून रोखण्यात आलं. सोसायटीतील लोकांना मी समजावू शकलो नाही."

रुग्णांवर उपचारापासून रोकण्यात आल्यानंतर डॉ. राव यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सोसायटीच्या लोकांना बोलावून समज दिली. पण, याचा काहीच उपयोग झाला नाही. डॉ. राव यांना समाजाकडून मिळालेली वागणूक बदलेली नाही. तुम्ही क्लिनिकला गेलात तर सोसायटीत येवू नका असं सांगण्यात आलं.

"सोसायटीतल्या लोकांनी मला सांगितलं क्लिनिकला गेलात तर पुन्हा आत येवू देणार नाही. डॉक्टर्स अत्यावश्यक सेवेत मोडतात. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री डॉक्टरांना क्लिनिक खुलं ठेवण्याचं आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे मला पालिकेने अचानक नोटीस पाठवून तुम्ही काम करू नका अशी सूचना केली. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही पालिकेने अशी सूचना का केली, या प्रश्नाचं गूढ मला अजूनही उकलेलं नाही.'

माझा, एकच प्रश्न आहे. डॉक्टरांवर दबाव असताना अशा परिस्थितीत ते काम करू शकतात का, असा सवाल ते विचारतात.

'पहिले घाबरले, आता नाही घाबरणार'

मुंबईतील नायर रुग्णालयात काम करणाऱ्या दर्शना बहिरन या नर्सच्या अंगावर तर लोक चक्क थुंकले.

बीबीसीशी बोलताना दर्शना बहिरम म्हणतात, 'मला खूप मानसिक छळाचा सामना करावा लागला. घर सोडून जा, इथे राहू नको असं म्हणत सोसायटीतील रहिवासी अंगावर थुंकले. म्हणाले, तू आमची बिल्डिंग खराब करशील. ड्युटीवरून आल्यानंतर रोज हेच ऐकायला मिळायचं. खूप मनस्ताप सहन करावा लागला. आम्ही कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवतो. मग, आम्ही आमची राहतो ती जागा खराब करू का, लोकांना कोरोना होईल असं वागू का, पण, समजणार कोण?"

फोटो स्रोत, darshana bahiram

फोटो कॅप्शन,

दर्शना बहिरम

दर्शना कल्याणहून मुंबईला कामाला जातात. सकाळी चार वाजता उठून ड्युटीसाठी निघतात. कोव्हिड वॉर्डमध्ये लोकांची सेवा करतात. मात्र, त्यांच्या पदरी पडली ती समाजाची बोलणी आणि हेटाळणी.

"लोकांना समजावून थकले. घर सोडलं. मैत्रिणीच्या नातेवाईकांकडे पाच दिवस राहिले. पण, दुसऱ्यांकडे किती दिवस राहायचं. पोलिसात गेले. पण, फारशी मदत झाली नाही. मग, विचार केला घाबरून काय जगायचं. पुन्हा घरी आले. आता ठरवलंय, घाबरणार नाही. मी कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी माझं कर्तव्य करतेय. मी घर सोडणार नाही," असं दर्शना म्हणाल्या.

'आठ तास पाणी नाही, की लघवीला जाता येत नाही'

कोरोना होऊ नये म्हणून लोकांची तपासणी करताना डॉक्टरांना खूप खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे डॉक्टरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. याबाबत केईएम रुग्णालयातील डॉ. दीपक मुंडे यांनी सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केलाय.

डॉ. मुंडे लिहितात, 'न भूतो न भविष्यती अशा वैद्यकीय आणीबाणीच्या काळात अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरवत आहोत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून,एका भयंकर शारीरिक आणि मानसिक विवंचनेतून जात आहोत. विशेषतः ड्युटीवर असताना PPE (Personal Protective Equipment) घातल्यानंतर या कठीण काळाचे गांभीर्य अधिकाधिक जाणवायला लागतं.

PPE घातल्यानंतर असताना सहा-सात तास खाणं तर सोडाच साधं पाणी सुद्धा पिता येत नाही. शिफ्ट दरम्यान लघवीला जाणे सुद्धा शक्य होत नाही. केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत झाकलेल्या या वॉटरप्रूफ पीपीई किटमध्ये घामाने कित्येक वेळा अंघोळ होऊन जाते. चेहऱ्याला N-95 मास्क, त्यावर 3 Ply सर्जिकल मास्क आणि त्यावर घातलेल्या चेहरा झाकण्याच्या प्लास्टिकच्या कव्हर मुळे नीट श्वासही घेता येत नाही, प्रचंड गुदमरल्यासारखे होते त्यामुळे थकवा डोकेदुखी आणि इतर समस्या उद्भवतात, श्वास सोडण्याच्या प्रक्रियेत गॉगलवर धुकं जमा होतं म्हणून समोर पाहणेही अंधुक होते.'

डॉ. राव पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाचा दाखला देत सांगतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला कोव्हिड-19 विरोधातील युद्धात लढणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेवकांसाचं मनोबल उंचावण्यासाठी लोकांना टाळ्या वाजवण्यास सांगितलं. लोकांनी आरोग्य सेवकांसाठी टाळ्या वाजवल्या पण प्रत्यक्षात पाहिलं तर लोकांकडून डॉक्टरांना मानसिक त्रास आणि हेटाळणी सहन करावी लागत आहे. आम्हाला समाजाकडून सम्नान मिळाला पाहिजे होता. पण, खरं पाहिलं तर लोकांकडून नकार मिळत आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)