कोरोना मृत्यू : भारतात कोव्हिड-19चा मृत्युदर खरंच इतका कमी आहे का?

  • सौतिक बिस्वास
  • बीबीसी प्रतिनिधी
मास्क

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना विषाणूविषयीचे जगभरातले मीडिया रिपोर्ट्स कुठे दिलासादायक आहेत तर कुठे काळजीत टाकणारे.

जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये भारतातला कोव्हिड-19 चा मृत्युदर कमी असण्यामागचं गूढ काय, याचीही चर्चा आहे. भारत कोरोनाच्या प्रादुर्भावाचा ट्रेंड कमी करतोय का, यावरही बोललं जातंय.

जगात कोरोनाचे जे हॉटस्पॉट आहेत, त्या तुलनेत भारतातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा मृत्युदर कमी आहे, याचीही चर्चा आहे.

लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात पहिला कोरोनाग्रस्त आढळून आल्याच्या दोन महिन्यांनंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 27 हजारांचा आकडा ओलांडला तर तब्बल 800 जणांचा या आजाराने मृत्यू झालाय.

भारतात मृतांची संख्या दुप्पट व्हायला जवळपास 9 दिवस लागतात, तर न्यूयॉर्कमध्ये दोन ते तीन दिवस. यावरूनच भारतातला मृत्युदर किती कमी आहे, याची कल्पना येते.

यामागे वेगवेगळी कारणं सांगितली जातात. काहींच्या मते भारतात महिन्याभरापेक्षा जास्त काळापासून कडकडीत लॉकडाऊन पाळला जात आहे. त्यामुळे भारतात कोव्हिड-19 मुळे मरणाऱ्यांच्या संख्येवर चाप बसला आहे. तर काहींच्या मते भारत तरुणांचा देश असल्याने इथे मृत्युदर कमी आहे.

काही जणांना असंही वाटतं की कोरोना विषाणूचा भारतातला स्ट्रेन हा कमी घातक असावा आणि भारतातल्या उष्ण हवामानामुळे त्याचा फारसा फैलाव होत नसावा.

मात्र, या अंदाजांना शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट कोव्हिड-19च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलताना त्यांनी सांगितलं की जगाच्या इतर भागात कोरोना विषाणू जेवढा घातक आहे तेवढाच तो भारतातही आहे.

तर मग प्रश्न पडतो की भारतात कोव्हिड-19चा मृत्युदर कमी असण्यामागे काय कारण असावं?

भारतीय-अमेरिकन डॉक्टर सिद्धार्थ मुखर्जी पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना म्हणाले होते, "याचं उत्तर मलाही माहिती नाही आणि जगालाही माहिती नाही. मी म्हणेन हे एक गूढ आहे आणि याचा एक भाग म्हणजे आपल्याकडे चाचण्यांचं प्रमाण खूप कमी आहे. कदाचित जास्त चाचण्या घेतल्या तर याची अधिक स्पष्ट कल्पना येऊ शकते."

कोव्हिड-19च्या डायग्नोस्टिक चाचण्या आणि अँटीबॉडी चाचण्या दोन्ही मोठ्या प्रमाणावर झाल्या पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. डायग्नॉस्टिक चाचण्यांमधून एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे का, हे कळतं. तर अँटीबॉडी चाचण्यातून एखाद्याला कोरोनाची बाधा होऊन तो त्यातून पूर्णपणे बरा झाला आहे का, हे कळतं.

दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतात कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंची 'नोंद' होत नाहीय का?

कोरोनाची साथ पसरलेल्या अनेक देशांमध्ये अजाणतेपणाने कमी मृत्यू नोंदवले गेले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

यासंदर्भात 12 देशांमध्ये झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीचा अभ्यास करून न्यू यॉर्क टाईम्सने एक वृत्त छापलं आहे. त्यात ते असं म्हणतात की या 12 देशांमध्ये कोव्हिड-19 मुळे जे मृत्यू नोंदवले गेले त्यापेक्षा 40 हजार जास्त मृत्यूं झाले. या 40 हजारांमधले काही मृत्यू इतर कारणांमुळे झाले असले तरी काही कोरोनाच्या संसर्गामुळेच झाले असण्याची शक्यता आहे.

फायनॅन्शिअल टाईम्स वृत्तपत्रानेही 14 देशांमध्ये अशा प्रकारचा सर्व्हे केला. त्यात असं आढळलं की या देशांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची जी आकडेवारी दिली आहे प्रत्यक्ष आकडेवारी ही त्यापेक्षा 60 टक्क्यांनी जास्त असावी. मात्र, या दोन्ही सर्व्हेमध्ये भारताचा समावेश नाही.

टोरंटो विद्यापीठाचे प्रभात झा म्हणतात, "योग्य आकडेवारी सांगण्यासाठी ज्यांची नोंद झालेली नाही, असेही मृत्यूही ग्राह्य धरायला हवे."

भारतात मलेरिया, न्युमोनियापासून अनेक प्रकारच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 80% मृत्यू घरीच होतात. त्यामुळे डॉ. झा यांच्या म्हणतात, "भारतात अनेकांवर वैद्यकीय उपचार होतात. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अशा रुग्णांना घरी पाठवतात आणि घरीच त्यांचा मृत्यू होतो."

त्यामुळे कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी केवळ हॉस्पिटलमधले मृत्यू मोजणं पुरेसं नाही.

भारतात स्मशानभूमीत किती अंत्यसंस्कार झाले, यावरूनही ही आकडेवारी काढणं सोपं नाही. कारण आपल्याकडे अनेक ठिकाणी गावकुसाबाहेरच्या खुल्या मैदानावर अंत्यविधी पार पाडले जातात. त्यांची अधिकृत नोंद नसते.

मात्र, याविषयी बोलताना पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथ रेड्डी म्हणतात की भारतात कुठल्याच हॉस्पिटलमध्ये खूप जास्त मृत्यू झाल्याची नोंद नाही. मृत्यूची संख्या वाढली असती तर त्याची माहिती मिळालीच असती. शिवाय, एका विशिष्ट कालावधीत घरामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं असतं तर तेही कळलं असतं.

फोटो स्रोत, Getty Images

भारतात सार्वजनिक आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठीची मजबूत यंत्रणा नाही. अशावेळी मोबाईल फोनच्या माध्यमातून मृत्यूची आकडेवारी मिळवली जाऊ शकते, असं तज्ज्ञांना वाटतं.

भारतात जवळपास 85 कोटी जनतेकडे मोबाईल फोन आहेत. या लोकांना त्यांच्या गावात किंवा भागात झालेल्या असामान्य मृत्यूंची (नेमकं कारण माहिती नसलेले मृत्यू) माहिती टोल फ्री क्रमांकावर द्यायला सांगितलं. तर स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी अशा कुटुंबांना भेट देऊन त्या मृत्यूबद्दलची माहिती घेऊ शकतात. कुटुंबीयांशी बोलून मृत्यू कोव्हिड-19 मुळे तर झाला नाही ना, याचा एक अंदाज बांधू शकतील.

भारतात किती मृत्यू झाले, याची नेमकी आकडेवारी सांगणं सोपं नाही.

भारतात दरवर्षी एक कोटी लोकांचा मृत्यू होतो. 'मीलियन डेथ स्टडी;नुसार भारतात काही मृत्यूंचा अंदाज फारच कमी आहे तर काही बाबतीत फारच जास्त. इतकंच नाही तर भारतात केवळ 22 टक्के मृत्यू मेडिकली सर्टिफाईड असल्याचं स्वतः सरकारचं म्हणणं आहे.

अशा सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत कोव्हिड-19 मुळे किती मृत्यू झाले, याची नेमकी आकडेवारी कशी काढायची.

काही डॉक्टरांच्या मते भारतात कोव्हिड-19 सारखी लक्षणं असणारे असे अनेक जण आहेत ज्यांचा मृत्यू झाला. पण त्यांची कोव्हिड चाचणी झालेली नव्हती. शिवाय चुकीच्या निदानाचा प्रश्न आहेच. अनेकदा मृत्यूचं डॉक्टरांकडूनच चुकीचं निदान केलं जातं.

बेल्जिअमच्या इसॅस्मे युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे इंटेन्सिव्ह केअर मेडिसिनचे प्राध्यापक जिन-लुईस व्हिंसेट सांगतात, "भारतासह अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 मुळे प्रत्यक्षात जेवढे मृत्यू झाले त्यापेक्षा कमी नोंदवले गेले."

ते म्हणतात, "बरेचदा एखाद्या संसर्गामुळे मृत्यू ओढावतो. मात्र, चाचण्या करूनच हे मृत्यू कोव्हिड-19 मुळे झाले आहेत का, हे स्पष्टपणे सांगता येईल. चाचण्याच केल्या नाही तर गोंधळ वाढतो. 1918च्या स्पॅनिश फ्लूच्या मृत्युदरात मोठी तफावत असण्यामागेही हेच कारण आहे."

साथीच्या आजारामुळे दगावलेल्यांची संख्या जाहीर केली तर जनतेमध्ये भीती पसरण्याचाही धोका सरकारला असतो. त्यामुळे आकडेवारी लपवली जाते का?

यावर बोलताना डॉ. झा म्हणतात, "मोठ्या संख्येने लोक दगावत असतील तर ते लपवलं जाऊ शकत नाही. त्यामुळे जगभरात असं कुठे घडत असेल, असं वाटत नाही."

ते पुढे म्हणतात, "मृत्यूची आकडेवारी जास्त विश्वासार्ह असते. मात्र त्यासाठी सर्व मृत्यूंची किंवा मोठ्या प्रमाणावर मृत्यूची नोंद व्हायला हवी."

एकूणच काय तर भारतात कदाचित काही मृत्यू नोंदवले जात नसतील किंवा काही चाचण्याही सदोष असतील. मात्र, असं असलं तरी भारतात कोव्हिड-19चा मृत्यूदर जगाच्या तुलनेत कमी आहे, हे नक्की. मात्र, याचा अर्थ आपण कोव्हिड-19 ला मात दिली आहे, असा अजिबात नाही.

एका तज्ज्ञाने म्हटलं त्याप्रमाणे, "स्पष्टपणे सांगायचं तर आपल्याला अद्यापतरी याची माहिती नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)