कोरोना लॉकडाऊन : विद्यापीठाच्या परीक्षा होणार, विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- राज्य सरकार

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

लॉकडाऊनमुळे स्थगित केलेल्या राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) जाहीर करण्यात आलंय.

पण कोव्हिड -19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या विद्यापीठाला आपला वेगळा निर्णय घेण्याची मुभा युजीसीकडून देण्यात आलीये.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याविषयी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

प्रश्न: विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ परीक्षांबाबत वेळापत्रक जाहीर करत काही शिफारशी केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात कशी होणार?

उत्तर: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) फ्रेमवर्कमध्ये आमच्या परीक्षा बसतायत का ते ठरवावं लागेल. आम्ही चार कुलगुरुंची समिती नेमली आहे. त्यांचाही अहवाल पाहावा लागेल. मुख्यमंत्री आणि राज्यपालांशी चर्चा करावी लागेल. त्यानंतर युजीसीसोबत पत्रव्यवहार करुन निर्णय घेतला जाईल.

कोरोना
लाईन

घाईघाईत कोणताही निर्णय घेतल्यास लाखो विद्यार्थ्यांना अडचण येईल. परीक्षा कशा घ्यायच्या याचाही विचार करावा लागेल.

प्रश्न: विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षांचे वेळापत्रक कधी जाहीर होणार?

उत्तर: राज्यातील चार विद्यापीठांच्या कुलगुरुंची समिती नेमण्यात आली आहे. लवकरात लवकर या समितीचा अहवाल येईल. त्यानंतर युजीसीचे मार्गदर्शन घेऊन आम्ही वेळापत्रक जाहीर करू.

प्रश्न: पावसाळ्यात परीक्षा सुरू होतील का? शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल?

उत्तर: परीक्षा होणार नाहीत, असं कुणीही म्हटलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये. जोपर्यंत कुलगुरू, सचिव, संचालक, मंत्री स्वत: माहिती देत नाही तोपर्यंत विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेऊ नये.

प्रश्न: दोन आठवड्यांत चित्र स्पष्ट होईल असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

उत्तर: सुप्रिया सुळे यांच्यासोबत माझी चर्चा झाली. दोन आठवड्यांचा कालावधी लागेलच.

विद्यापीठाच्या परीक्षा, लॉ परीक्षा, सीईटी अशा सर्व परीक्षांचे वेळापत्रक ठरवायचे आहे त्यासाठी युजीसीचा अहवाल पहावा लागेल. या सगळ्या प्रक्रियेसाठी दोन आठवडे वेळ लागेल.

प्रश्न: शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार?

उत्तर: शैक्षणिक वर्षाला उशीर होणार आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सीईटीची परीक्षा 12 एप्रिलला होती. ती होऊ शकलेली नाही. त्यामुळे सीईटी परीक्षा, त्याचा निकाल आणि प्रवेश प्रक्रिया यामुळे विलंब होणार आहे. पण त्याचा परिणाम पुढच्या वर्षी होऊ देणार नाही.

प्रश्न: परीक्षेचे पॅटर्न बदलणार का? किती गुणांची परीक्षा घेणार?

उत्तर: परीक्षेचे पॅटर्न बदलणार आहे. पण परीक्षा होतील. किती मार्कांची परीक्षा घ्यायची याबाबत चर्चा करावी लागणार आहे. पण परीक्षेचे स्वरुप बदलेल.

प्रश्न: ऑनलाईन परीक्षा घेण्याचा विचार आहे का?

उत्तर: ऑनलाईन परीक्षांचा सध्यातरी विचार नाही. कारण महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहता ते काही भागात शक्य नाही.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of podcast promotion

उदाहरणार्थ, गडचिरोली, चंद्रपूर या भागात ते शक्य नाही. आजही अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे वेळ आलीच तर केवळ पर्याय म्हणून त्याकडे पाहतोय. पण अजून त्याबाबत कोणतीही तयारी नाही.

प्रश्न: स्पर्धा परीक्षांबाबत काय निर्णय घेणार?

उत्तर :MPSC, UPSC परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे ही जबाबदारी आहे. पण आमचे विद्यार्थी या परीक्षांना बसतात म्हणून त्यांचा विचार आम्ही केला आहे. ज्यांची शेवटची संधी आहे त्यांना पुढील वर्षी संधी मिळावी यासाठी राज्यपालांना आम्ही पत्र देणार आहोत.

प्रश्न: सीईटीची परीक्षा होणार का?

उत्तर: सीईटीची परीक्षा आम्हाला घ्यावीच लागेल. विद्यार्थी बारावीपेक्षा सीईटीचा अभ्यास अधिक करतात. त्यामुळे सीईटीची परीक्षा घ्यावी लागेल. केवळ बारावी निकालाच्या आधारावर प्रवेश देता येणार नाहीत.

प्रश्न: लॉकडाऊनमध्ये परीक्षा घेता येतील का?

उत्तर: लॉकडाऊनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतील. लॉकडाऊन उठेपर्यंत परीक्षा घेता येणार नाहीत. पण त्याचे अधिकार विद्यापीठांना दिलेले आहेत.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

विद्यापीठांनी आपल्या विभागातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचा आहे. ती माहिती कुलगुरुंच्या समितीला दिल्यानंतर त्याचा अहवाल तयार होऊन मग अंतिम निर्णय होऊ शकेल.

प्रश्न: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या शिफारशीला राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. सरकारसमोर हे एक मोठं आव्हान आहे का?

उत्तर: आम्ही पुन्हा एकदा राज्यपालांना पत्र दिलं आहे. घटनेच्या आधीन राहून राज्यपाल लवकरच उद्धव ठाकरे यांची आमदार म्हणून नियुक्ती करतील.

प्रश्न: विरोधकांकडून राजकारण केलं जातंय का ?

उत्तर: विरोधक काय करत आहेत हे आम्ही पाहत नाही. पण भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी कोव्हिडच्या विळख्यात कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये, असा सल्ला सगळ्यांना दिलाय.

विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेले विद्यापीठ परीक्षांचे वेळापत्रक:

1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत परीक्षा

15 ऑगस्टपर्यंत विद्यापीठाचे निकाल

1 ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया

1 सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)