ऋषी कपूर : बॉबीमधला 'स्वीटहार्ट' ते अग्निपथमधला रौफ लालापर्यंतचा प्रवास

  • रेहान फझल
  • बीबीसी प्रतिनिधी
ऋषी कपूर

फोटो स्रोत, Getty Images

ऋषी कपूर जन्मजात अभिनेते होते. असं सांगतात की ऋषी कपूर यांनी जेमतेम चालायला सुरुवात केली होती तेव्हाच ते आरशासमोर उभे राहून वेगवेगळे हावभाव करायचे.

कपूर घराण्याच्या पार्ट्यांमध्ये एक किस्सा कायम सांगितला जातो. ऋषी कपूर लहान होते तेव्हा एका संध्याकाळी राज कपूर यांनी आपल्या ग्लासातल्या व्हिस्कीचा एक घोट लहानग्या ऋषीला दिला तेव्हा त्यांनी आरशासमोर जाऊन दारुड्याचा अभिनय केला होता. एकूणच काय तर त्यांच्या अभिनयाची सुरुवात अगदी लहानपणापासूनच झाली होती.

ऋषी कपूर यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्या 'पठान' नाटकात खाटेवर एक मुलगा झोपलेला असतो तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून ऋषी कपूरच होते.

मेरा नाम जोकरसाठी राष्ट्रीय पुरस्कार

ऋषी कपूर मुंबईतल्या कॅम्पियन शाळेत शिकत होते. त्यावेळी राज कपूर यांनी 'मेरा नाम जोकर' चित्रपटात ऋषी कपूर यांना त्यांच्या लहानपणीची भूमिका दिली होती. शूटिंगसाठी शाळेला दांड्या वाढू लागल्या. शिक्षकांना हे काही पटेना. शेवटी त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

मुलाच्या अॅडमिशनसाठी राज कपूर यांना नंतर बरीच मेहनत करावी लागली होती. या चित्रपटासाठी ऋषी कपूर यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' या आपल्या आत्मकथेत लिहिलंय, "मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या वडिलांनी मला पुरस्कार घेऊन आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्याकडे पाठवलं. आजोबांनी मेडल हातात घेतलं तेव्हा त्यांचा ऊर भरून आला होता. माझ्या कपाळाचं चुंबन घेत आपल्या भारदस्त आवाजात ते म्हणाले होते - राजने माझं कर्ज फेडलं."

अभिनयाची जबरदस्त रेंज

70- 80 च्या दशकापासूनच चिंटू (ऋषी कपूर) यांची इमेज जर्सी घातलेला, गाणं गुणगुणणारा, एका हातात गिटार आणि दुसऱ्या हातात देखणी ललना असलेल्या कॅसानोव्हाची बनली होती. आपल्या अभिनय कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांची ही इमेज पुसली गेली. याच टप्प्यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या.

फोटो स्रोत, Getty Images

2004 साली आलेल्या हम तुम सिनेमातला नाराज पती, 2012 साली आलेल्या स्टुंडंट ऑफ द ईअर सिनेमातला प्राध्यापक, 2013 साली आलेल्या डी-डे सिनेमातला डॉन, 2012 साली आलेल्या अग्निपथ सिनेमातला दलाल, 2016 साली आलेल्या कपूर अँड सन्समधला 90 वर्षांचा खोडकर म्हातारा किंवा 102 नॉट आऊटमधला खाष्ट म्हातारा...ऋषी कपूर यांनी वैविध्याची नवीन उंची गाठली होती. 'मुल्क' सिनेमात त्यांनी साकारलेली राष्ट्रवादी मुस्लिमाची भूमिका स्तब्ध करणारी होती.

बॉबीने दिलं स्टारडम

ऋषी कपूर यांना राष्ट्रीय ओळख मिळवून दिली राज कपूर यांच्या 'बॉबी' चित्रपटाने. राज कपूर यांनी या चित्रपटात आपल्या मुलाची अशी इमेज बनवली की, पुढची दोन दशकं या इमेजने त्यांचा पिच्छा सोडला नाही. राज कपूरचं वैशिष्ट्यं म्हणजे ते काळानुरूप बदलायचे. बदलत्या काळाच्या काय अपेक्षा आहेत, हे त्यांना कळायचं.

'बॉबी'मध्ये त्यांनी ऋषी कपूरला ओव्हरसाईज्ड सनग्लासेस दिले. त्यांच्या स्कूटरचं हँडल जरा जास्तच लांब होतं आणि त्याच्या दोन्ही बाजूला साईड मिरर होते ज्यात त्यांच्या मुलाचा चेहरा दिसायचा. ती स्कूटर भारताच्या बदलत्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करायची त्याचप्रमाणे ती स्कूटर म्हणजे ताजेपणा, ऊर्जा आणि आधुनिकतेचं प्रतिक होती.

एका दृश्याचे नऊ रिटेक

बॉबीमध्ये ऋषी कपूरचा अभिनय दमदार व्हावा, यासाठी राज कपूर यांनी बरीच मेहनत घेतली. ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' या आपल्या आत्मचरित्रात लिहिलं होतं, "कॅमेरा रोल होण्याआधी माझे वडील माझी इतकी रिहर्सल घ्यायचे की, तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. त्या सिनेमात अचला सचदेव यांनी माझ्या आईचं पात्र साकारलं होतं. ज्या सीनमध्ये माझी आई माझ्या गालावर थप्पड लगावते, तो सीन मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या वडिलांनी अचला सचदेव यांना सांगितलं होतं की, सीन चांगला होण्यासाठी तुम्ही चिंटूला जोरदार थप्पड मारा. त्यांनी या दृश्याचे 9 रिटेक घेतले. जेव्हा सीन ओके झाला तेव्हा माझा गाल निळा झाला होता आणि माझे रडू थांबत नव्हतं."

'नॅशनल स्वीटहार्ट'

1973 साली बॉबी रीलीज झाला आणि देशभरात या सिनेमाने अमाप लोकप्रियता मिळवली. ऋषी कपूर जिथे जाईल तिथे एखाद्या रॉक स्टारप्रमाणे लोक त्यांच्या भोवती गराडा घालायचे. त्यांना 'नॅशनल स्वीटहार्ट' म्हटलं गेलं. पुढच्या अनेक चित्रपटांसाठी त्यांची ही भूमिका ब्लू-प्रिंट बनली होती.

डिंपल कपाडियासोबतची त्यांची जोडी डिंपल यांनी राजेश खन्नांसोबत लग्न केल्याने तुटली. 1974 साली ऋषी कपूर यांनी पहिल्यांदा नीतू सिंह यांच्यासोबत काम केलं. चित्रपट होता जहरीला इन्सान. देशभरात ही जोडी गाजली. त्यानंतर या दोघांनी खेल खेल में, रफूचक्कर आणि जिंदादिली या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं.

फोटो स्रोत, Getty Images

सत्तरच्या दशकात सेक्स, हिंसा आणि अॅक्शनचा काळ असूनही ऋषी कपूर यांच्या 'लव्हर बॉय' या इमेजवर काहीही परिणाम झाला नाही. हा 'अँग्री यंग मॅन' अमिताभ बच्चन यांचा काळ होता.

ऋषी कपूरसोबत अनेक अभिनेत्रींनी आपल्या फिल्मी करियची सुरुवात केली किंवा त्यांच्यासोबत केलेल्या चित्रपटांमुळे त्या अभिनेत्रींच्या कारकिर्दीने नवी उंची गाठली. काजल किरण (हम किसी से कम नहीं), शोमा आनंद (बारूद), जया प्रदा ( सरगम), नसीम (कभीकभी), संगीता बिजलानी (हथियार) आणि पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियार (हिना) यांच्या पहिल्या मोठ्या सिनेमांमध्ये लीड हिरो होते ऋषी कपूर.

नीतू सिंह यांच्याशी विवाह

नीतू सिंह आणि ऋषी कपूर यांची पहिली भेट झाली त्यावेळी त्या केवळ 14 वर्षांच्या होत्या. एकदा मधू जैन यांना दिलेल्या एका मुलाखतीत नीतू सिंह यांनी सांगितलं होतं, "त्या काळात चिंटूच्या अनेक गर्लफ्रेंड होत्या. ते फोनवर त्यांच्याशी माझ्याविषयी बोलायचे. कधीकधी मी त्यांच्यातर्फे फोन करायचे. मी 17 वर्षांची झाले तेव्हा ते म्हणाले होते, की ते मला मिस करतात. मी विश्वास ठेवला नाही. तर त्यांनी शूज काढून दाखवलं की त्यांनी त्यांची बोटं 'क्रॉस' केलेली नव्हती. मी 18 वर्षांची झाले तेव्हा त्यांनी एक चावी माझ्या गळ्यात घातली आणि म्हणाले ही माझ्या हृदयाची चावी आहे."

तुम्ही दिवार चित्रपट बारकाईने बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की, या सिनेमात नीतू सिंह यांनी गळ्यात ती चावी घातलेली आहे.

नीतूने 'बॉब' हे टोपणनाव दिलं

नीतू सिंह यांनी पुढे सांगितलं होतं, "एकदा ताज हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं होतं की, तुला लग्न करायचं नाही का? मी म्हणाले होते, करायचं आहे. पण कुणाशी करू? ऋषी कपूर खूपच निरागसपणे म्हणाले होते माझ्याशी आणि कुणाशी."

फोटो स्रोत, Getty Images

नीतू सिंह ऋषी कपूर यांना 'बॉब' म्हणायच्या. नीतू सिंह यांनी एकदा लिहिलं होतं की, ऋषी कपूर यांचा स्वभाव पझेसिव्ह आहे. मला माहिती आहे की, मी कुणाच्या फार जवळ जाऊ शकत नाही. कारण चिंटूला वाईट वाटतं. इतकंच कशाला मुलगा रणबीरशी असलेली जवळीकही त्यांना आवडत नाही. एक काळ असा होता जेव्हा ते खूप दारू प्यायचे. त्यावेळी दारूच्या नशेत मनातलं सगळं बोलून जायचे. त्यावेळी त्यांना जी मुलगी आवडायची तिच्याबद्दलही सांगायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी विचारल्यावर पुन्हा त्याच निरागसतेने मला विचारायचे तुला हे सगळं कुणी सांगितलं?"

कंजूष ऋषी

ऋषी कपूर यांनी त्यांचे काका शशी कपूर यांच्याप्रमाणेच कधीही रविवारी काम केलं नाही. रविवार हा त्यांच्यालेखी त्यांच्या कुटुंबीयांसाठीचा दिवस होता. मात्र, त्यांचा स्वभाव शशी कपूर यांच्या अगदी विरुद्ध होता. ते एक कठोर आणि शिस्तप्रिय वडील होते आणि मुलांशी खूप कमी बोलायचे.

ऋषी कपूर स्वतः लहान असताना वडिलांसमोर त्यांची बोबडी वळायची. ऋषी कपूर यांच्याविषयी बोललं जायचं की ते कंजूष होते. त्यांना लोकांना गिफ्ट द्यायला फारसं आवडायचं नाही. त्यांचा मुलगा रणबीर 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याने आईला कार मागितली होती. तेव्हा ऋषी कपूर यांनी रणबीरला म्हटलं होतं की, कार घ्यायचं तुझं अजून वय नाही. मुलांनी बिघडू नये, असं त्यांना वाटायचं.

फोटो स्रोत, Getty Images

रणबीर आणि रिधिमा दोघंही आपल्या पायावर उभे होईपर्यंत दोघंही इकॉनॉमी क्लासनेच प्रवास करायचे. नीतू सिंह यांनी एकदा ऋषी कपूर यांच्या कंजूषपणाचा एका गमतीशीर किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या होत्या, "खाण्याच्या बाबतीत ते कधीच कंजूषी करायचे नाही. मला आठवतं आम्ही एकदा न्यूयॉर्कला गेलो होतो तेव्हा ते मला महागड्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचे आणि एकेका डिशवर शेकडो डॉलर खर्च करायचे. मात्र, छोट्या-छोट्या वस्तू खरेदीसाठी पैसे खर्च करायला त्यांना जीवावर यायचं. एकदा न्यूयॉर्कमध्येच अपार्टमेंकडे जाताना सकाळच्या चहासाठी मला दूध घ्यायचं होतं. मध्यरात्र झाली होती. मात्र, एवढ्या रात्री चिंटू दूरवरच्या दुकानात गेले कारण तिथे दूध 30 सेंट्स स्वस्त होतं."

'कपूर घराण्यातील सर्वोत्तम अभिनेते'

ऋषी कपूर यांनी चरित्र अभिनेते म्हणून ज्या भूमिका साकारल्या त्या सर्वांना न्याय दिला. लता मंगेशकर एकदा म्हणाल्या होत्या, "ते कपूर घराण्यातले सर्वोत्तम अभिनेते आहेत."

भूमिका करताना अगदी सहज असणं ही त्यांच्या अभिनयाची खासियत होती. आज रोमँटिक हिरोसाठी सुंदर दिसणं जेवढं गरजेचं आहे तेवढचं फिट असणंही गरजेचं आहे. ऋषी कपूर कायमच ओव्हरवेट होते. मात्र, तरीही तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही. चरित्र अभिनेता म्हणूनही ऋषी कपूर यांना तेवढीच लोकप्रियता मिळाली जेवढी 70 च्या दशकात कारकिर्दीला सुरुवात करताना.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)