कोरोना मुंबई : मृतदेहांसोबतच कोरोना रुग्णांवर उपचारांच्या 'त्या' व्हीडिओची चौकशी करण्यासाठी समिती

फोटो स्रोत, Getty Images
प्रातिनिधिक फोटो
गुरुवारी (7 मे) सकाळी अनेक वृत्तवाहिन्या एक व्हीडिओ दाखवण्यात आला...सोशल मीडियावरही तो व्हायरल झाला...व्हीडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला असेल. असं काय होतं त्या व्हीडिओत?
या व्हीडिओमध्ये एका हॉस्पिटलमधलं दृश्य दिसत आहे. यामध्ये सुमारे 20 पेक्षाही जास्त बेड एका बाजूला दिसतात. यात काही बेडवर काळ्या प्लास्टिकमध्ये बांधलेले मृतदेह दिसत आहेत, तर इतर बेडवर उपचार घेत असलेले रुग्ण झोपलेले दिसत आहेत. तसंच या रुग्णांना व्हेंटिलेटर लावलेलाही दिसत आहे. शिवाय या हॉलमध्ये कोणतीही सुरक्षात्मक उपकरणं नसलेल्या पीपीई किट परिधान न केलेल्या व्यक्ती इथून फिरताना दिसत आहेत.
हा व्हीडिओ मुंबईतला असल्याचा दावा करण्यात आला आणि कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आणि कोव्हिड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांना एकाच ठिकाणी ठेवल्यावरून मोठा गदारोळ सुरू झाला.
हा व्हीडिओ मुंबई महापालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या सायन हॉस्पिटलचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर माध्यमांनी तातडीने हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला.
कोव्हिड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घ्यायला तयार नसतात. त्यामुळे ते मृतदेह तसेच राहतात. आम्ही आता ते मृतदेह हलवले असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे, असं सायन हॉस्पिटलचे डीन प्रमोद इंगळे यांनी PTI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले
हे मृतदेह शवागारात का हलवले गेले नाहीत, याबद्दल बोलताना प्रमोद इंगळे यांनी सांगितलं, की हॉस्पिटलच्या शवागारात 15 स्लॉट आहेत, त्यापैकी 11 भरले आहेत. आम्ही जर मृतदेह शवागारात हलवले तर कोव्हिड-19 शिवाय अन्य कारणामुळे दगावलेल्या रुग्णांच्या मृतदेहावर परिणाम होऊ शकतो.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
दरम्यान, या व्हीडिओची सत्यता तपासण्यासाठी एक चौकशी स्थापन करण्यात आली असून 24 तासात त्याचा अहवाल मागविण्यात आल्याचं मुंबई महापालिकेनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
'मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी गाईडलाइन्स आवश्यक'
या व्हीडीओतून समोर आलेली गोष्ट चुकीची आहे. त्याबद्दल चौकशी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. किशोरी पेडणेकर यांनी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्यासोबत रुग्णालयाला भेट देऊन डीन डॉ. प्रमोद इंगळे यांच्यासोबत चर्चा केली.
फोटो स्रोत, Getty Images
"रूग्णांचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी पुढे येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मृतदेहाची किती तासात विल्हेवाट लावायची याबाबत गाईडलाइन्स करणे आवश्यक आहे."कोरोनाचे मृतदेह वेगळे ठेवण्याची व्यवस्था शवागृहात करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. तसंच कोरोनाचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना कळविल्यानंतरही दोन तासात जर कोणी आले नाही तर याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं.
नितेश राणे-किरीट सोमय्यांचे आरोप
आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर हा व्हीडिओ पोस्ट केला होता.
नितेश राणे यांनी हा व्हीडिओ सायन रुग्णालयाचा असल्याचं ट्विटसोबत लिहिलं आहे. रुग्ण मृतदेहांच्या बाजूला झोपलेले आहेत, हा कहर आहे असं म्हणत त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि मुंबई महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
नितेश राणे यांच्या ट्विटनंतर एकच गदारोळ माजला आहे. राणे यांच्या ट्विटवर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली.
नितेश राणे यांनी काल एक व्हीडिओ ट्विट केला होता. यामधून कोरोनाग्रस्त आणि मृत व्यक्तींबाबतची स्थिती दिसून आली आहे. काल हॉस्पिटल प्रशासन हे फेटाळून लावत होतं. पण याची सत्यता आता पडताळण्यात आली आहे. रुग्णालयाकडे बॅग उपलब्ध नसल्यामुळे त्यांना प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यात आलं आहे. रुग्णालयानेही मृतदेहांची ही परिस्थिती मान्य केली आहे.
"मी सायन हॉस्पिटलला भेट दिली. कोरोना वॉर्ड ५ मध्ये जिवंत रुग्ण सोबत मृतदेह ठेवले जातात त्यासंबंधात चौकशी केली. ह्या संदर्भात ICMR कडे तक्रार ही केली आहे," भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)