कोरोना लॉकडाऊन: जुन्या टीव्ही सिरीयल्समध्ये रमताना कठीण काळ विसरायला मदत?

रामायण

फोटो स्रोत, Twitter/Star Plus

भारतामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर दूरदर्शनने एक घोषणा केली...घरात बसून वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडलेल्या अनेकांसाठी ही घोषणा 'टाइम मशीन' सारखी होती...जुन्या काळात रममाण व्हायला लावणारी.

80 आणि 90 च्या दशकात लोकप्रिय झालेल्या रामायण ही मालिका पुन्हा दाखवणार असल्याचं दूरदर्शनने जाहीर केलं. रामायणाचे रोज 2 भाग सकाळ - संध्याकाळ प्रसारित होऊ लागले आणि त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला. पाठोपाठ महाभारत, ब्योमकेश बक्षी, शक्तीमान या सगळ्यांनीही कमबॅक केला.

गंमतीची गोष्ट म्हणजे या मालिका पाहणाऱ्यांमधली एक पिढी अशी होती, जिने लहान वा तरूण असताना या मालिका पाहिल्या होत्या आणि आता पुढची पीढी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच ही मालिका पाहात होती.

प्रेक्षकांचा तुडुंब प्रतिसाद

लॉकडाऊनच्या काळात पुनर्प्रसारित झालेले रामायणाचे पहिले चार एपिसोड्स तब्बल 17 कोटी लोकांनी पाहिले. याचा प्रत्येक भाग 3.4 कोटी ते 5.1 कोटी लोकांनी पाहिला. परिणामी दूरदर्शन ही त्या काळात सर्वाधिक पाहिली जाणारी वाहिनी ठरली.

यापूर्वी दूरदर्शनच्या नंबर पहिल्या 10 वाहिन्यांमध्येही लागत नव्हता. रामायणाचा 16 एप्रिलला प्रसारित झालेला भाग तब्बल 7.7 कोटी लोकांनी पाहिला. जगभरात सगळ्यात जास्त लोकांनी पाहिलेला टीव्ही शो असा वर्ल्ड रेक़ॉर्ड यादिवशी घडला. याआधी 'द बिग बँग थिअरी'चा शेवटचा भाग 1.8 कोटी लोकांनी पाहिला होता. तर गेम ऑफ थ्रोन्सचा शेवटचा भाग 1.93 कोटी लोकांनी पाहिल्याची नोंद झाली होती.

रामायणाला अशी लोकप्रियता पहिल्यांदाच मिळालेली नाही. 1987-88 मध्ये पहिल्यांदा या मालिकेचं प्रसारण झालं, तेव्हाही या मालिकेने प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवलं होतं. सुरुवातीला ही मालिका 52 भागांची असणार होती. पण या मालिकेला मिळालेला उदंड प्रतिसाद आणि लोकप्रियता लक्षात घेत भागांची संख्या वाढवून 78 करण्यात आली.

1987 मध्ये रामायण प्रसारित व्हायला सुरुवात झाली आणि रस्ते ओस पडू लागले. लोक एकत्र येऊन टीव्हीवर ही मालिका पाहायचे. त्या काळात तब्बल 8 ते 10 कोटी लोकांनी रामायणाचं प्रसारण पाहिलं होतं. जाहिरातदार आणि प्रेक्षकांवरचा या मालिकेचा प्रभाव अजूनही तितकाच असल्याचं या पुनर्प्रसारणादरम्यान पहायला मिळालं.

38 वर्षांच्या सपना पटेल सांगतात, "लोक अगदी न चुकता दिवसातून दोनदा, म्हणजे सकाळ - संध्याकाळी रामायण बघताहेत. मी 1980 च्या दशकात लहानाची मोठी झाले. माझ्यासाठी हे जुन्या आठवणी जागणारं आहे. तेव्हा रविवारी सकाळी आम्ही सगळे कुटुंबीय आणि शेजारी टीव्हीसमोर जमा व्हायचो. रस्ते ओस पडायचे. आता घरी बसून कंटाळा आला असताना वेळ घालवायचा हा चांगला पर्याय आहे."

विविध पिढ्यांना भावणारे कार्यक्रम

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

1980 च्या दशकाच्या शेवटापर्यंत भारतामध्ये दूरदर्शन (DD) ही एकमेव सरकारी वाहिनी अस्तित्वात होती. म्हणूनच या वाहिनीवरच्या अनेक मालिका अशा होत्या ज्या विविध वयोगटांना आवडतील. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचा विचार करून हे कार्यक्रम बनवले जायचे. म्हणूनच आता लॉकडाऊनच्या काळात या मालिका लोकप्रिय ठरत आहेत. "मी महाभारत माझ्या वडिलांसोबत पाहातेय. आणि लहान असताना शक्तीमान पाहिलेली माझी एक सहकारी आता तिच्या 6 वर्षांच्या मुलीसोबत शक्तीमान पाहातेय. ही मालिका पाहताना बालपण आठवल्याने तिला तर मजा येतेच आहे पण या निमित्ताने मायलेकींना हा शो एकत्र पाहात वेळ घालवायला मजा येतेय. लॉकडाऊन नसता आणि DDने जुने शोज पुन्हा दाखवले नसते, तर हे घडलं नसतं."

अर्थात या लोकप्रियतेमागे इतरही काही कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दूरदर्शन हे सर्वात जास्त प्रमाण उपलब्ध असलेलं, मोफत टीव्ही चॅनल आहे. सध्याच्या घडीला प्रेक्षक घरी अडकलेले आहेत आणि नवीन मालिका वा सध्या सुरू असणाऱ्या मालिकांच्या नवीन भागांचं चित्रीकरण बंद आहे. म्हणूनच जगभरात अनेकजण आता या लॉकडाऊनच्या काळात पूर्वीच्या गोष्टी वा मालिका पुन्हा पाहात आहेत.

फोटो स्रोत, Twitter/StarPlus

याचाच फायदा घेत आता दूरदर्शन पाठोपाण अनेक वाहिन्यांनी त्यांच्या इतर जुन्या कार्यक्रमांसोबतच रामायण - महाभारतही दाखवायला सुरुवात केली आहे. यामध्ये रामायण सागर यांचं रामायण स्टार प्लस वाहिनीवरून प्रसारित होतंय. तर बी. आर. चोप्रांचं महाभारत दूरदर्शनवरून प्रसारित होतंय. स्टार प्लसनेही 2013 मध्ये त्यांनी दाखवलेली महाभारत मालिका परत दाखवायला सुरुवात केलीय. याशिवाय श्रीकृष्ण, देवों के देव महादेव या मालिकांनीही हिंदी वाहिन्यांवर कमबॅक केलाय.

तर मराठी मनोरंजन वाहिन्यांवर सध्या स्वराज्यरक्षक संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज या मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत.

आपल्या अॅपवरून गाणी ऐकणाऱ्यांनी 'नॉस्टाल्जिया' म्हणजेच जुन्या आठवणींना उजाळा देणारी प्लेलिस्ट बनवण्याचं प्रमाण 54% नी वाढल्याचं 'स्पॉटीफाय' या म्युझिक स्ट्रीमिंग अॅपने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. 1950 ते 1980 च्या दशकातल्या गाण्यांच्या स्ट्रीमिंगचं प्रमाण वाढल्याचंही स्पॉटीफायने म्हटलं होतं.

सोशल मीडियावरही सिम्स, माईनस्वीपर, पिनबॉल आणि डबल ड्र्रॅगनसारख्या रेट्रो गेम्सची चर्चा होतेय. कदाचित अनेकांना लॉकडाऊनच्या या काळात साफसफाई करताना जुने गेमिंग कन्सोल्स सापडले आहेत. फुटबॉल मॅनेजर आणि 'एज ऑफ एम्पायर'सारखे पूर्वी पीसीवर खेळले जाणारे गेम्सही चर्चेत आहेत.

'बिहेवियरल सायन्स' विषयीचे लेखक डेव्हिड डि'साल्वो यांनी स्पॉटीफायला सांगितलं, "नॉस्टाल्जियाचा आपल्या आठवणींशी अतिशय महत्त्वाचा संबंध असतो. शिवाय एक गुलाबी चित्र आपल्या मनात निर्माण करण्याची यामध्ये ताकद असते."

युकेमध्ये BBC ने खेळाशी संबंधित संस्मरणीय क्षण पुन्हा दाखवायला सुरुवात केलीय. यामध्ये 2012 चं लंडन ऑलिम्पिक, या ऑलिम्पिकचा उद्घाटन समारंभ, सुपर सॅटर्डे, अँडी मरेने 2013 मध्ये विम्बल्डनमध्ये मिळवलेला विजय या सगळ्याचा समावेश आहे.

फोटो स्रोत, DD National

फोटो कॅप्शन,

ब्योमकेश बक्षी मालिकेतलं दृश्य

पण या नॉस्टाल्जियाच्या भावनेची कठीण काळात काही मदत होते का?

मानसोपचारतज्ज्ञ आणि हिप्नोथेरपिस्ट डॉ. जोनाथन पॉइंटर यांच्यामते जुन्या टीव्ही मालिका, सिनेमे, संगीत, पुस्तकं, व्हिडिओ गेम्स, खेळांमधले क्षण आणि अगदी अन्नपदार्थ यांचा आपल्या भावना आणि आठवणींशी संबंध असतो.

"भावना आणि आठवणी एकमेकांशी निगडीत असतात. भावनांमुळे आठवणी जाग्या होतात आणि आठवणींमुळे भावना उफाळून येतात. म्हणूनच जेव्हा आपण एखादी जुनी घटना आठवतो तेव्हा जणू काही तो क्षण पुन्हा अनुभवतो. त्याच्याशी संबंधित आठवण पुन्हा आठवतो. भूतकाळातले काही वास, दृश्यं, आवाज यामुळेही या भावना आणि आठवणी जागृत होऊ शकतात."

म्हणूनच आपण पूर्वी पाहिलेली, आवडलेली एखादी मालिका पुन्हा पाहताना जाणते-अजाणतेपणी आपल्याला त्याविषयी चांगलं, सकारात्मक वाटत राहतं. "मूड आणि आठवण यांचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणूनच आपण लहान असतानाचे आपले शोज पाहताना आपल्या मनात सकारात्मक भाव येतात. आपण पहिल्यांदा तो कार्यक्रम पाहताना जसं वाटलं होतं, तसं वाटत राहतं." डॉ. पॉइंटर सांगतात.

सुखावणारा भूतकाळ

रामायण आणि महाभारताच्या पुनर्प्रसारणासोबतच पटेल सध्या 1990 च्या दशकातली डिटेक्टिव्ह सीरिज - ब्योमकेश बक्षी पाहात आहेत. "मला माझं बालपण आठवतं. या शोबद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे मुळात हा माणूस डिटेक्टिव्ह वाटतच नाही. तो धोतर - कुर्ता घालतो. सध्याच्या शोजच्या तुलनेत हे साधेपण भावणारं आहे. जुन्या साध्यासुध्या जगाची - काळाची यामुळे आठवण होते."

ओळखीचा टीव्ही वा रेडिओ शो हा आधार देणारा, दिलासा देणारा ठरू शकतो असं मानसोपचार तज्ज्ञ हिल्डा बर्क म्हणतात, "बेभरवशाचं वा धोकादायक वातावरण आजूबाजूला असताना ओळखीच्या टीव्ही वा रेडियो शोच्या जगात रमावसं वाटणं मी समजू शकते. कदाचित यामागे 'मी हे पाहताना वा ऐकताना काहीही वाईट होणार नाही' अशी भावना नकळत जागृत होते," त्या सांगतात.

फोटो स्रोत, DD National

लॉकडाऊनच्या काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे अनेकांना कित्येक दिवसांत वा आठवड्यांत 'मानवी स्पर्श' ही मिळालेला नाही किंवा ते थेट समोरासमोर कोणाशीही बोललेले नाहीत आणि ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. या सुखावणाऱ्या भूतकाळात रमण्याचा मार्ग असला तरी या गोष्टी स्पर्श, संवाद यासाठी पर्याय ठरू शकत नाहीत. भूतकाळात रमण्याचे हे पर्याय अशा परिस्थितीत एकट्या पडलेल्या लोकांना त्यांच्या जवळच्या लोकांच्या आठवणींपाशी नेऊन सोडतात.

"या अशा कार्यक्रमांसोबतच आपला स्वतःचाही एक इतिहास असतो, त्याला काही अर्थ असतो, आपण कोणाचे तरी आहोत, ही भावना त्यातून जागृत होते. मग या नात्यांचा, समाजाचा वा व्यक्तींचं महत्त्व समजायला लागतं. "डॉ. पॉइंटर सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)