कोरोना : मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिंमत दाखवावी - देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिंमत दाखवावी - फडणवीस

अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेणं आवश्यक आहे. कोरोनाच्या भीतीने बचावात्मक पवित्रा घेतला तर राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात येईल. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिंमत दाखवावी, असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी ऑनलाईन चर्चा केली. सकाळने ही बातमी दिली आहे.

राज्याचा आर्थिक गाडा सुरळीत करण्यासाठी महाविकास आघाडीला हिंमत दाखवून लॉकडाऊन शिथील करावा लागेल नाहीतर राज्याची अर्थव्यवस्था ढेपाळायला वेळ लागणार नसल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.

2. कोरोनाचं निदान 15 मिनिटांमध्ये करणारं किट, NIV ने दिली मान्यता

कोरोनाच्या संसर्गाचा तपास 15 मिनिटांमध्ये घेणाऱ्या एका टेस्ट किटला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV)ने मान्यता दिली आहे.

या संशोधनामध्ये अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील संशोधक शीतल रंधे - महाळुंगकर यांचा मोठा वाटा आहे. लोकमतने या तरुण संशोधकाविषयीची बातमी प्रसिद्ध केलीय.

फोटो स्रोत, Getty Images

अकोले तालुक्यातल्या पिंपळदरीच्या शीतल या पुण्यातल्या इम्रो या कंपनीत संशोधन विभागात काम करतात.

त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तयार केलेलं किट लवकरच बाजारात उपलब्ध होईल आणि या किटच्या मदतीने 15 मिनिटांत कोरोनाच्या संसर्गाची चाचणी घेता येईल.

3. लॉकडाऊनमुळे घटलं कार्बन उत्सर्जन

40 वर्षांमध्ये पहिल्यांदाच देशभरातल्या कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात घट झालेली आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) ने केलेल्या अभ्यासात हे आढळून आलंय.

आजच्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये याविषयीची बातमी प्रसिद्ध झालीये.

या अभ्यासानुसार मार्च महिन्यामध्ये देशभरातल्या कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात 15% घट झालेली होती. तर गेल्या महिन्यात मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत 30% घट झाल्याचा अंदाज आहे.

लॉकडाऊनसोबतच आर्थिक मंदी आणि स्वच्छ ऊर्जा पुरवणाऱ्या स्रोतांचा वाढता वापर यामुळे देखील हे प्रमाण घटल्याचा अंदाज लॉरी मायलीविर्टा आणि सुनील दहिया यांनी CREAसाठी केलेल्या संशोधनात वर्तवलाय.

4. मुंबईत लोकल सुरू करू नयेत - रामदास आठवले

मुंबईत लोकल रेल्वे सेवा सुरू केल्यास कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढेल आणि म्हणूनच मुंबईत लोकल्स सुरू करण्यात येऊ नयेत असं रामदास आठवलेंनी म्हटलंय. TV9 मराठीने याविषयीचं वृत्त दिलंय.

अत्यावश्यक सेवांमधल्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल्स सुरू करू द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबतच्या व्हीडिओ कॉन्फरन्सदरम्यान केली होती. मुंबईत कोरोनाच्या सर्वाधिक केसेस असून झोपडपट्ट्यांमध्येही कोरोना पोहोचलेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

रोज कोरोनाच्या केसेस वाढत असताना लोकल सुरू केल्यास गर्दी होईल आणि कोरोना वाढण्याची शक्यता आहे, म्हणून लोकल सेवा अजून काही काळ बंद राहणं आवश्यक असल्याचं रामदास आठवले म्हणाले आहेत.

यासोबतच रेड झोनमध्ये लॉकडाऊन वाढवावा अशी मागणीही रामदास आठवलेंनी केलीय.

5. मान्सून शनिवारपर्यंत अंदमानमध्ये, 100 टक्के पावसाचा अंदाज

यावर्षी नेहमीपेक्षा 4 दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल होणार आहे. दरवर्षी 20 मेपर्यंत मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होतो. पण यंदा 16मे पर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे. सकाळने ही बातमी प्रसिद्ध केलीय.

जून ते सप्टेंबर या काळात यावर्षी 100 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)