अम्फान चक्रीवादळ : सुपर सायक्लोनचा ओडिशा-बंगालच्या किनारपट्टीला धोका #5मोठ्याबातम्या

अम्फान

फोटो स्रोत, SANJAY DAS

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1. 'अम्फान'चं रूपांतर सुपर सायक्लोनमध्ये

'अम्फान' चक्रीवादळाचे रूपांतर 'सुपर सायक्लोन'मध्ये झालं असून आज हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याची माहिती NDRFचे प्रमुख एस. एन प्रधान यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

या वादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात 1999 मध्ये असे 'सुपर सायक्लोन' आले होते. त्यानंतर आता हे 'सुपर सायक्लोन' ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे.

मदत आणि बचावकार्यासाठी NDRFच्या 13 तुकड्या ओडिशात तैनात करण्यात आल्या आहेत, तर 17 तुकड्यांना सतर्क ठेवण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 19 तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत आणि 4 तुकड्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती NDRFच्या प्रमुखांनी दिली.

'सुपर सायक्लोन'चा धोका ओडिशातील 12 जिल्ह्यांना आणि पश्चिम बंगालमधील कोलकातासह 5 जिल्ह्यांना अधिक आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील 24 परगना, उत्तर 24 परगना, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्यांना हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत मच्छिमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. 'सुपर सायक्लोन'मुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

2. 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये खरी मदत केवळ 1.86 लाख कोटींची - पी. चिदंबरम

केंद्राने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजपैकी खरी मदत ही केवळ 1.86 लाख कोटी रुपयांची असून बाजारातील मागणी वाढण्यासाठी फारसा उपयोग नाही, असं काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने 'आत्मनिर्भर भारत' योजनेच्या नावाखाली दिलेली मदत कमालीची तुटपुंजी असल्याची टीकाही त्यांनी केली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

केंद्राने मदतीची घोषणा मागे घेऊन खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 10 टक्के रकमेची तरतूद करावी, अशी मागणीही चिदंबरम यांनी सोमवारी (18 मे) केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजचा तपशील सलग पाच दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला. त्यातील विविध मुद्दय़ांचे काँग्रेस येत्या काही दिवसांमध्ये विश्लेषण करणार आहे. त्यातील पहिली पत्रकार परिषद पी. चिदंबरम यांनी घेतली.

त्यांनी म्हटलं की, सीतरामन यांनी दिलेले आकडे पाहिले तर मदत केवळ एक टक्का इतकीच आहे. जर केंद्राला राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 10 टक्के मदत करायची असेल तर किमान दहा लाख कोटी रुपयांची खर्चावर आधारित व्यापक वित्तीय मदत द्यावी लागेल.

या प्रोत्साहन मदतीत आर्थिक सुधारणाचा कार्यक्रमही राबवला जात आहे. वास्तविक, संसदीय समित्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा केली जाऊ शकते. त्यालाही संसदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली तर गोपनीयतेचा भंग होईल असा मुद्दा काढून समित्यांच्या बैठका होत नसल्याचं चिदंबरम यांनी सांगितलं.

3. आंतरराज्यीय प्रवासासाठी मिळणार ई-पास

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने काही सवलतीही दिल्या आहेत. त्याअंतर्गत लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या राज्यात प्रवास करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी एक नवीन वेबसाइट तयार केली आहे.

एबीपी माझानं ही बातमी दिलीये.

फोटो स्रोत, Getty Images

http://serviceonline.gov.in/epass/ ही वेबसाईट राष्ट्रीय माहिती केंद्राद्वारे (NIC) विकसित करण्यात आली आहे. या वेबसाईटवर 17 राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी ई-पास मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. लॉकडाऊनमध्ये मिळणारा ई पास हा विशिष्ट श्रेणींमध्येच मिळणार आहे. या श्रेणींमध्ये विद्यार्थी, आवश्यक सेवा क्षेत्रातील कर्मचारी, पर्यटक, यात्रेकरू, आपत्कालीन/वैद्यकीय कारणासाठी प्रवास आणि विवाह यांचा समावेश आहे.

वेबसाईटवरील माहितीनुसार, एखादी व्यक्ती किंवा ग्रुप या सेवेचा वापर करून प्रवासी पाससाठी अर्ज करू शकणार आहे. ई-पाससाठी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन प्रतीदेखील सादर कराव्या लागतील. याशिवाय ओटीपी पडताळणीसाठी एक सक्रिय मोबाइल नंबर देखील आवश्यक आहे.

4. झी मीडियामधील 28 कर्मचारी कोव्हिड-19 पॉझिटिव्ह

नॉयडामधील गौतम बुद्धनगरमध्ये सोमवारी (18 मे) कोव्हिड-19 चे 31 नवीन रुग्ण आढळले. या नवीन रुग्णांमध्ये 15 जण हे झी मीडियामधील कर्मचारी आहेत तर आठ जण हे चिनी मोबाईल कंपनी OPPO चे कर्मचारी आहेत. गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 286 झाली आहे.

हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 मे रोजी झी मीडियामधील 39 वर्षीय कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. ही व्यक्ती दिल्लीतील लक्ष्मी नगर इथं राहणारी आहे. या कर्मचाऱ्याची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर 51 कर्मचाऱ्यांचीही दिल्लीतल्या मॅक्स लॅबमध्ये चाचणी घेण्यात आली.

या चाचणीमध्ये 28 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. या 28 पैकी 15 जण हे गौतम बुद्धनगर भागात राहणारे आहेत, तर अन्य 13 जण हे दिल्ली, गाझियाबाद आणि फरीदाबाद इथले आहेत.

झी मीडियाच्या ऑफिसमध्ये हे कर्मचारी जिथे काम करायचे तो भाग सील करण्यात आला असून निर्जंतुकीकरणाचं काम सुरू असल्याचं झी मीडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

5. CBSEच्या परीक्षा 1 ते 15 जुलैदरम्यान

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान घेतल्या जातील. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोकमतनं ही बातमी दिलीये.

फोटो स्रोत, Twitter

परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मास्क घालून यावं, तसंच पारदर्शक बाटलीत सॅनिटायझर आणावं अशी सूचना CBSEचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी केली आहे.

CBSEने कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ 29 प्रमुख विषयांची परीक्षा घेण्याचे ठरवले होते. यात उत्तर पूर्व दिल्लीत दंगलीमुळे स्थगित झालेल्या 17 प्रमुख विषयांच्या (दहावी 6 आणि बारावी 11) परीक्षांचा समावेश आहे. तर पूर्ण देशात बारावीच्या केवळ 12 प्रमुख विषयांच्या परीक्षा आयोजित करण्यात येतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)