मुंबईत उत्तर भारतीय 'भय्ये' आले कधी?

  • ओंकार करंबेळकर
  • बीबीसी मराठी
स्थलांतरित मजूर

फोटो स्रोत, Getty Images

"हमे सिर्फ रोटी बनाने के लिए जगह चाहिये... इतनी बडी जगह नहीं चाहिए…"

हे उद्गार होते माझ्या घरी आलेल्या एका उत्तर भारतीय दुकानदाराच्या पत्नीचे. मी भाड्याचं घर सोडतोय म्हणून ते घर पाहायला आले होते. त्यांना त्यांच्या दुकानाजवळ घर हवं होतं.

साधारणपणे मुंबईत स्टेशन किती जवळ आहे, पाण्याची व्यवस्था कशी आहे, दुकानं जवळ आहेत का, याचा विचार करून भाड्याचं किंवा स्वतःचं घर घेतलं जातं. पण या जोडप्याची साधी-सोपी अपेक्षा होती - 'सिर्फ रोटी करने के लिए जगह…'

एवढी साधी अपेक्षा ऐकून थोडा धक्का बसलाच, पण विचार केल्यावर लक्षात आलं… हे लोक केवळ रोटीसाठी हजार-दीड हजार किलोमीटर लांब मुंबईत आले आहेत. आधी पाय रोवून उभं राहाणं... नाही… फक्त जिवंत राहाणं, हेच यांचं ध्येय असणार.

मुंबईत असे लाखो लोक केवळ जिवंत राहाण्याच्या उद्देशाने येतात. त्यांना मुंबई 'रोटी' देईल का, याची खात्री असते.

मुंबईत उत्तर भारतीय नकोत अशी हाकाटी पुन्हा सुरू झाली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापले झेंडे पुन्हा एकदा उंचावायला सुरू झाल्यानंतर उत्तर भारतीय म्हणजे मुंबईकरांच्या भाषेतील 'भय्ये' पुन्हा चर्चेत आले आहेत.

गेली दोन-तीन दशकं मुंबईकरांच्या विशेषतः मराठी माणसाचा हा आवडीचा चर्चेचा विषय आहे. साधारणतः निवडणुकीचा काळ आला की यावर जास्त चर्चा होते. एखाद-दुसरेवेळेस पाणीपुरी प्रकरण, अतिक्रमण, छटपूजा अशा निमित्तानेही तो डोकं वर काढत असतो. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार यांचं मुंबईशी असलेलं नातं कधीपासूनचं आहे, हे पाहाणं गरजेचं आहे.

मौर्य-सातवाहन-क्षत्रप-राष्ट्रकूट

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

आताच्या चर्चा पाहून मुंबईत उत्तर भारतीय काल-परवाच आले, असं सहज वाटू शकतं. पण खरंतर मुंबई आणि उत्तर भारताचा संबंध गेली 2,000 वर्षं येत आहे.

मुंबईच्या साठे महाविद्यालयात एन्शंट इंडियन कल्चर आणि आर्किओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सूरज पंडित यांच्या मते "बंगाल आणि बिहारशी मुंबईचे प्राचीन संबंध आहेत. तेव्हापासून मुंबईत व्यापाऱ्यांनी येणं, काही वर्षं राहून जाणं, स्थायिक होणं सुरू आहे."

नालंदा विद्यापीठ आणि मुंबईचे संबंध असल्याचेही ते सांगतात. आता मुंबई राजधानी असलेल्या राज्यावर आज भगवा फडकला, असं सांगितलं जात असलं तरीही मुंबईवर आणि पर्यायाने आजच्या महाराष्ट्राच्या भूभागावर अनेक शतके उत्तर भारतीय सत्तांचा ताबा होता.

उत्तर कोकणावर मौर्यांपासून अनेक राजवटी राज्य करत असल्याचं मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधील एन्शंट इंडियन कल्चर विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता कोठारे सांगतात.

त्या म्हणतात, "कोकणावर राज्य करणाऱ्या मौर्यांना 'कोकणचे मौर्य' असंही नाव होतं. मौर्यांनंतर सातवाहनांच्या काळात अग्निमित्र नागपूरला आला होता. त्याचा उल्लेख कालीदासानं त्याच्या महाकाव्यांमध्ये केलेला आहे. सातवाहनांनंतर क्षत्रप आले. त्यापाठोपाठ अनेक व्यापारी येऊ लागले.

"मुंबईच्या परिसरामध्ये कल्याण, ठाणे, नालासोपारा ही बंदरं असल्यामुळे व्यापाऱ्यांची ये-जा वाढली. त्यांच्यानंतर कलचुरींच्या माध्यमातून राष्ट्रकूट, यादव, शिलाहार अशा राजवटी बदलत गेल्या. नंतरच्या काळात अरबही आले. याचाच अर्थ मुंबईच्या जवळचा परिसर व्यापारामुळे आधीपासूनच कॉस्मोपॉलिटन होता, असा होतो."

उत्तर भारतीयांना 'भय्या' का म्हणतात?

मुंबई आणि परिसरातले म्हशींचे तबेले (हो, मुंबईत गोठ्याला 'तबेला' असंच नाव आहे) चालवणे आणि दूध विकण्याचं मुख्य काम भय्ये करायचे, तबेल्यातच ते राहायचे. शहराचा विकास होत गेला तसे हे तबेले शहराच्या बाहेर फेकले जाऊ लागले. त्यानंतर जागेला सोन्याची किंमत आल्यावर जागेपायी हे तबेले हटवले जाऊ लागले.

मुंबईत उत्तर भारतीय, मग तो कोठूनही आलेला असो, त्याला 'भय्या' असं एकमेव संबोधन आहे. वास्तविक तबेल्यात काम करणारे लोक एकमेकांना 'भय्या' म्हणून हाक मारायचे, असा उल्लेख सुहास कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या 'अर्धी मुंबई' या पुस्तकात करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी हाच शब्द उचलला.

फोटो स्रोत, Getty Images

वरवर हा शब्द नातं जोडणारा वाटत असला तरी मुंबईकरांनी हा शब्द थोडा नकारात्मक पातळीवर नेऊन ठेवला आहे. त्या शब्दाच्या मागे-पुढे येणारी वाक्यं पाहिली की, या शब्दात तिरस्कार आणि एकप्रकारची हिणवणारी भावना साठल्याचं दिसून येतं.

गेल्या 20 वर्षांमध्ये ही भावना अधिक तीव्र झाल्याचं दिसून येतं. भय्याच्या बायकोला 'बहीण' किंव 'बहेन' म्हणण्याऐवजी 'भय्यीण' असा उल्लेख केला जातो.

यासर्व तिरस्कारामध्ये नोकऱ्यांची कमतरता, 'बाहेरच्या लोकांनी इथं येऊन पैसे मिळवले', 'हे लोक सुशिक्षित नसतात', त्यांची राहाण्याची पद्धती वेगळी आहे, असा विचार दडलेला दिसून येतो. तसं उघड उघड बोललंही जातं... अगदी सहजपणे.

मुंबईत 'भय्ये' करतात तरी काय?

असं म्हटलं जातं की, मुंबईत इंग्रजांनी पाय ठेवल्यापासून उत्तर भारतीय 'भय्ये' येत आहेत. 1857च्या उठावानंतर उत्तर भारतात बहुतांश मुस्लीम संस्थानं आणि दस्तुरखुद्द मुघल बादशहाच देशोधडीला लागल्यावर प्रजाही देशोधडीला लागली. कामकाज, व्यवसाय ठप्प झाल्यावर अनेक लोक दक्षिणेकडे सरकले. मध्यप्रांतात आणि उत्तर महाराष्ट्रात बर्हाणपूर, मालेगाव इथं स्थायिक झाले आणि शेवटी मुंबईकडे सरकले.

आज मुंबईत तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलात तर उत्तर भारतीय व्यक्ती सापडणार नाही किंवा एखादं काम करणारा 'भय्या' सापडणार नाही, असं होत नाही.

फोटो स्रोत, Getty Images

'भय्ये' मुंबईत दुधाच्या व्यवसायापाठोपाठ इतर अनेक व्यवसायात उतरले. टॅक्सी चालवणे, पाणीपुरी-भेळपुरी विकणे, भाजी-फुलं-गजरे विकणे, प्लंबिंग, सुतारकाम, रंगकाम, केस कापणे, धोबीकाम, टांगा चालवणे, असा एकही व्यवसाय त्यांनी सोडलेला नाही.

तसेच उत्तर भारतीय, लेखक, कवी, पत्रकारही तयार झाले आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय पत्रकार संजय निरुपम याच शहरातून लोकसभेत निवडून गेले.

सहज गंमत म्हणून काळ्या पिवळ्या टॅक्सीत बसल्यावर, 'क्यों भय्या... कहाँ से हो? जौनपूर, प्रतापगड या सुलतानपूर?' असं विचारलं तर तो यापैकी तिन्ही जिल्ह्यांपैकी एकाचं नाव घेतोच. तो कोणत्याही एका राजकीय पक्षाचं किंवा नेत्याचं नाव न घेता सर्वच राजकीय पक्षांवर टीका करतो, आणि त्याच वेळेस सराईतपणे त्यांचं कौतुकही करून मोकळा होतो. कदाचित जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडीत त्याचं उत्तर दडलेलं असावं.

मराठी मनात अस्वस्थता का निर्माण होते?

मुंबईकर आणि उत्तर भारतीय यांचा खराखुरा संबंध गेल्या दोन शतकांमध्ये जास्त आला आहे. कित्येक उत्तर भारतीयांच्या अनेक पिढ्या इथंच राहिल्या आहेत. त्यामुळे तेही मुंबईकरच होतात. तरीही अध्येमध्ये त्यांच्याविरोधात असंतोषाची लाट का येते, का प्रश्न उरतोच.

मुंबईत राहाणाऱ्या लोकांच्या मनात अचानक स्थलांतरितांच्या विरोधात का विचार येतात, याचा मानसशास्त्रीय दृष्टीनेही विचार होण्याची गरज आहे. 'आपले रोजगार हे लोक घेऊन जात आहेत', ही भावना त्यांच्या मनात का येते याचा शोध घेण्याची गरज आहे.

नवे रोजगार स्वीकारणं किंवा उत्तर भारतीय करत असलेली कामं करण्याऐवजी त्यांच्याविरोधात घोषणा देऊन तात्पुरतं खापर फोडून मोकळं होणं का आवडत असावं, याचा विचार व्हायला हवा. किंबहुना तसाच विचार केला जावा, यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात का हे तपासणं गरजेचं आहे.

उत्तर भारतीय स्थलांतरित कामगारांचं राहणीमान, त्यांची कौटुंबिक व्यवस्था मराठी माणसापेक्षा वेगळी असल्याने अनेकदा लोक या मुद्द्यांवरूनही विचार करून पाहातात. खाण्यापिण्याच्या सवयी, स्वच्छतेच्या सवयींबद्दल दोन्ही समुदायांचे आचार-विचार वेगवेगळे आहेत.

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ - ‘युपी बिहारचे मजूर मराठी माणसाचं कौतुक करताना महाराष्ट्राचा अभिमान वाटतो.'

मुंबईमध्ये कार्यरत असणारे मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी यावर अधिक माहिती दिली. स्थलांतरितांना नेहमीच त्रास होतो आणि संकटकालीन स्थितीत तो जास्तच होतो, असं ते म्हणतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "समाज बदलाच्या प्रक्रियेत कोणताही समाज नेहमी एखाद खलनायक शोधत असतो. एकेकाळी लोक इंग्रजांना व्हिलन मानायचे. तेच रूढ झालं. त्यामुळे कोणतंही सरकार आपल्याला खलनायक वाटत असतं.

"प्रत्येक जण प्रत्येक स्तरावर हा खलनायकाचा वापर करत असतो. याला 'प्रोजेक्शन मेकॅनिज्म' असंही म्हटलं जातं. स्वतःच्या प्रश्नांच्या मागचं कारण दुसरी व्यक्ती किंवा समाज आहे, असं सांगून त्यांच्याकडे बोट करायचंहा प्रायमरी डिफेन्स असतो. एकदा दुसऱ्याकडे बोट दाखवलं की आत्मपरीक्षणाची गरज लागत नाही. ही खदखद सुरूच असते. संकटकाळात तिला तोंड फुटतं."

'अब तो आदत हो गयी'

मुंबईत दोन पिढ्या राहूनही दररोज काही समस्यांना तोंड द्यावच लागतं, अशी खंत उत्तर भारतीय बोलून दाखवतात. मुंबईत दोन पिढ्या स्थायिक झालेले आणि गेली अनेक वर्षं पत्रकारितेत असणारे कप्तान माली यांचा अनुभव फारसा वेगळा नाही.

फोटो कॅप्शन,

कप्तान माली

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "तुम्ही थोडेफार शिकून मोठे झालात की एकप्रकारच्या भेदभावला सामोरं जावं लागतं. 'ये लोग तो अनपढ़ हैं... गंदे होते हैं... इनके बहुत सारे बच्चे होते हैं...' अशी वाक्यं ट्रेनमध्ये सहज ऐकू येतात. 'भय्ये लोग ट्रेनों में भीड़ करते हैं...' असं सहज कानावर येतं. आता याची सवय झाली आहे.

"माझ्यामते जेव्हा रोजगार कमी होतात, तेव्हा अशाप्रकारची भावना वाढीला लागते. मी डोंबिवलीत राहात असताना एका सोसायटीत मी कमिटी मेंबर होतो. तेव्हा मीटिंगमध्ये 'ये भय्ये लोग को कमिटी में क्यू रखते हो?' असे उद्गार काढले जायचे.

"अर्थात हे सगळं असलं तरी काही सकारात्मक गोष्टी आहेतच. अनेक लोकांना आमचं कौतुकही वाटतं. आम्ही हिंदी इंग्रजीबरोबर मराठी बोलतो, याचं कौतुक वाटतं. उत्तर भारतीय कोणत्याही पगारात काम करायला तयार असतात, त्याचं कौतुक वाटतं."

"माझ्या अनेक ओळखीच्या मराठी उद्योजक मित्रांनी आपली पहिली पसंती उत्तर भारतीय कामगारांना असल्याचं सांगितलं आहे. उत्तर भारतीय मजूर मेहनती आणि एकाग्रतेने काम करत असल्याबद्दल त्यांना कौतुक वाटतं. उत्तर भारतीय अत्यंत कमी पगारात कोणतंही काम करायला तयार होतात."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)