शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमागे काय राजकारण आहे?

महाविकास आघाडी, कोरोना, राजकारण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अशोक चव्हाण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी संध्याकाळी दीड तास चर्चा झाल्यची माहिती संजय राऊत यांनी दिली.

इतकच नाही तर सरकार अस्थिर असल्याचा विचार करणाऱ्यांना पोटदुखी असंल्याचं समजावं असा टोलाही त्यांनी लगावला. पण या ट्विटनंतर वेगळ्याच चर्चांना सुरुवात झालीय.

राष्ट्रपती राजवटीबाबत महाविकासआघाडीची भूमिका

राज्यात कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांकडून होत असताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याात दीड तास गुप्त बैठक झाली. शिवाय, या बैठकीत काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.

याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, " राष्ट्रपती राजवट लागू होईल असं आम्हाला अजिबात वाटत नाही. राज्यात कोरोनाचे संकट असताना ज्या कुणाला हे करताना आनंद होत असेल त्यांना तो आनंद घेऊ देत. विरोधी पक्षाला वाटत अ्सेल की आपला वेळ जात नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो."

शिवाय, कोरोनामुळे राष्ट्रपती राजवटीची भाषा कुणी करत असेल तर सुरुवात गुजरातपासून व्हायला हवी असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेस नेते 'आऊट ऑफ रीच' ?

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काँग्रेसचा एकही नेता नसल्याने महाविकासआघाडीत सर्वकाही अलबेल आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

"सगळे काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण संपर्कात असतात. महाविकासआघाडीत काही बैठका तात्काळ ठरतात. शरद पवार सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. अनेक बाबींसाठी ते उपलब्ध असतात.

काँग्रेसचे नेते अनेकदा त्यांच्या भागात असतात. बाळासाहेब थोरात त्यांच्या भागात असतात. अशोक चव्हाण आजारी आहेत. ते नांदेडला आहेत," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय.

गेल्या काही दिवसात महाविकासआघाडीच्या चार बैठका झाल्याची माहितीही राऊत यांनी दिली.

"मी स्वत: या बैठकांना हजर होतो. या सर्व बैठकांना काँग्रेसचे नेते हजर होते." पुढील पाच वर्षेतरी सरकारला धोका नाही. धोका असलाच तर तो विरोधी पक्षाला आहे", असा टोलाही राऊत यांनी लगावला.

पवार-ठाकरे भेटीवर काँग्रेसची भूमिका काय?

"कोरोनाच्या संकटात आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. अशा संकटाच्या काळात भेटीगाठी होत असतात", अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी दिलीय. आ

म्ही सतत संपर्कात असून आमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शंका घेण्याचं कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं. काही मंडळी विनाकारण शंका उपस्थित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार स्थिर असल्याचं थोरात यांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांना संबोधित करताना

कोरोना संकटाच्या काळात मदत करण्याऐवजी सरकारला त्रास कसा देता येईल याच्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप थोरातांनी केलाय. सरकार पा़डण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याची टीका बाळासाहेब थोरांनी केलीय.

शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेची चर्चा ?

राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा युतीमध्ये चर्चा सुरू झाली असून शरद पवारांना हे कळल्यामुळे बैठकांचे सत्र सुरू झाले असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

या प्रश्नाचे उत्तर देताना राऊत म्हणाले "या अफवा आहेत. अशा अफवा तुम्ही स्वप्नात पाहिल्या असतील. आमचं १७० चं बहूमत २०२५-२६ पर्यंत कायम राहील. किंबहुना १७० चे १८० होईल," असं म्हणत महाविकासआघाडीचा एकही आमदार फुटणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पवार-ठाकरे भेट कशासाठी ?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी राज्यात अशाच प्रकारच्या घडामोडींना सुरुवात झाली होती. गेल्या काही दिवसांपासून विरोधक, सत्ताधारी अशा सगळ्यांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटी घेतल्या जात आहेत. त्यामुळे शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे राजकीयदृष्ट्या पाहिलं जातंय.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

महाविकास आघाडी

पण ही भेट शरद पवारांचा सध्याच्या राज्यातील परिस्थितीबाबत मार्गदर्शनासाठी होती असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे.

ते म्हणाले, "महाविकासआघाडीचं सरकार पाच वर्षाचा कालखंड पूर्ण करेल. आम्ही निवडणुकाही एकत्र लढू. १७० आमदारांचे सरकार आहे. यात शरद पवारांचे योगदान मोठे आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं ठरवलं होतं."

देशातील इतर रज्यांमध्ये कोरोना संकटाशी लढण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले असताना विरोधकांनी राजकारण करण्यापेक्षा कोरोनाशी लढण्यासाठी तयारी केली पाहिजे असंही राऊत म्हणाले.

"मीडियामध्ये ज्या बातम्या पेरल्या जात आहेत त्यामुळे सरकार अस्थिर होणार नाही. पंतप्रधान मोदीही पवारांचे मार्गदर्शन घेतात. इतर राज्यातील नेतेही पवारांशी चर्चा करतात. असं असताना शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यावर गदारोळ व्हायचं काही कारण नाही. "

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)