कोरोना : मृतांची संख्या जुलै महिन्यात 18 हजारापर्यंत जाण्याची शक्यता #5मोठ्या बातम्या

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1. देशातील मृतांची संख्या जुलै महिन्यात 18 हजारापर्यंत जाण्याची शक्यता, साथरोग तज्ज्ञ संस्थेचा अहवाल

भारतात जुलै महिन्यात कोरोना व्हायरसचा प्रसार शिगेला पोहोचू शकतो. या काळात देशातील एकूण मृत्यूंची संख्या 18 हजारापर्यंत जाऊ शकते, असा अंदाज साथरोग व सार्वजनिक आरोग्य तज्ञ तसंच सेंटर फॉर कंट्रोल ऑफ क्रोनिक कंडिशन्स या संस्थेचे संचालक प्रा. डी. प्रभाकरन यांनी वर्तवला आहे. प्रभाकरन हे लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेतही प्राध्यापक आहेत. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

देशात कोरोनाची साथ चढत्या क्रमाने पुढे जात आहे. जुलै महिन्यात कोरोनाची स्थिती शिखरावस्थेत राहील. त्यावेळी भारतात कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 18 हजारापर्यंत असू शकते.

सध्या वेगवेगळे सांख्यिकी मॉडेल वापरून अहवाल सादर करण्यात येत आहेत. त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जुलै महिन्यात देशातील कोरोनाबाधितांची संख्या 4 ते 6 लाख राहील. त्यात मृत्यूदर 3 टक्के राहील. त्यामुळे अंदाजे 12 ते 18 हजारापर्यंत मृत्यू होऊ शकतात, असं प्रभाकरन म्हणाले.

2. मुंबईतील हॉटेल फॉर्च्यूनमध्ये आग, 25 डॉक्टरांना वाचवण्यात यश

मुंबईतील धोबी तलाव भागात मेट्रो चित्रपटगृहाजवळ हॉटेल फॉर्च्युनमध्ये बुधवारी आगीची घटना घडली. हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आगीचा भडका उडाला होता. या हॉटेलमध्ये डॉक्टर्स वास्तव्याला असल्याने एकच खळबळ उडाली होती.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू करून काही वेळातच सुमारे 25 डॉक्टरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चौथ्या मजल्यावर अडकलेल्या डॉक्टर्सना बाहेर काढण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

अग्निशमन दलाचे 5 बंब आणि 4 जंबो टँकर यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

3 . कोव्हिडने मृत्यू झाल्याच्या अफवेमुळे मृतदेह कचरा गाडीतून नेण्याची वेळ

कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यू झाल्याच्या अफवेमुळे एका तरुणाचा मृतदेह चक्क कचरा गाडीतून नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ही घटना घडल्याबाबतची बातमी एबीपी माझाने दिली आहे.

या तरुणाचा सोमवारी (25 मे) रात्री मृत्यू झाला होता. तो रायगड जिल्ह्यातून हा तरुण 11 मे रोजी आपल्या गावी परतला होता.

प्रशासनाने त्याला 14 दिवसांसाठी तरुणाला होम क्वारंटाईन केले होते.

पण नंतर काही दिवसांनी त्या तरुणाची प्रकृती खालावल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची जोरदार अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र सदर तरुणाचा मृत्यू हा अन्य कारणाने झाल्याचे समोर आले होते.

पण अंत्यविधीसाठी तरुणाचा मृतदेह नगरपालिकेच्या एका कचरा घंटागाडी मधून घेऊन जाण्यात आला. याबाबतचा व्हीडिओ समोर आल्याने वाद निर्माण झाला.

कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या अफवेमुळे कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाकडे कोणताच पर्याय नसल्याने कचरा घंटागाडीचे पूर्ण सॅनिटायझेशन करून कोणतीही विटंबना न करता त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडला आहे, असं स्पष्टीकरण मुख्याधिकारी हराळे यांनी दिलं आहे.

4. अंतिम परीक्षा रद्द करण्याची 88 टक्के विद्यार्थ्यांची मागणी

कोरोना संकटामुळे राज्यातील विद्यापीठांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी अशी मागणी सुमारे 88 टक्के विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र स्टुडंट युनियनतर्फे (मासू) एक ऑनलाईन सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.

मासूच्या सर्वेक्षणात 32 हजार 378 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 93 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना कोरोनाची लागण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. तर 88 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षाच रद्द करा, अशी मागणी केली आहे.

युजीसीच्या परिपत्रकानुसार राज्य सरकारला परीक्षा रद्द करून ग्रेड देता येऊ शकते. सध्याची स्थिती पाहता परीक्षा रद्द करण्यात यावी. सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे, असं मासूचे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे म्हणाले. ही बातमी ईसकाळने दिली आहे.

5. रेड झोनमधून आल्याने घोड्याला केले होम क्वारंटाईन

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये कोरोना संदर्भात रेड झोनमधून प्रवास करून आल्यामुळे चक्क एका घोड्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

देशातील लॉकडाऊनच्या काळात हा घोडा शोपियानवरून मालकासह राजौरीत आला होता. संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून घोड्याच्या मालकाला प्रशासनाच्या देखरेखीखाली क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसेच घोड्यालाही होम क्वारंटाईन केलं गेलं, अशी माहिती तहसिलदार अंजुम खान यांनी दिली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)