कोरोना लॉकडाऊन: बोनस देणाऱ्या कंपन्यांकडून बाकीच्यांनी काय शिकावं?

  • ऋजुता लुकतुके
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
कर्मचारी

फोटो स्रोत, Getty Images

लॉकडाऊनमध्ये नोकरी-रोजगाराच्या संधी आटत चालल्या आहेत, सगळीकडे पगारकपात होतेय. अशात काही कंपन्या अशाही आहेत ज्यांनी कामगारांचं मनोबल वाढवण्यासाठी बोनस आणि पगारवाढ जाहीर केली आहे. कोणत्या आहेत या कंपन्या? त्या का देतायत कामगारांना बोनस?

कोरोनाचा उद्रेक आणि त्यातून उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळे आपण सगळेच कठीण काळातून जात आहोत. हे एक आरोग्य विषयक संकट तर आहेच. शिवाय लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका उद्योगधंद्यांना बसला आहे. आणि त्यातूनच वारंवार पगार कपातीच्या किंवा थेट नोकर कपातीच्या घटना समोर येत आहेत.

ताजी घटना आहे इंडिगो एअरवेज करत असलेल्या 25 टक्के पगार कपातीची. उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी अख्ख्या 2020-21 आर्थिक वर्षासाठी ही पगार कपात असणार आहे.

डेलॉईट या खासगी संस्थेचा एक अहवाल सांगतो की राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी असलेल्या पहिल्या शंभर मोठ्या कंपन्यांपैकी 27 कंपन्या अशा आहेत की त्या कर्मचाऱ्यांचा एक महिन्याच्या वर पगार देऊ शकत नाहीत. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर तयार झालाय.

आर्थिक सुरक्षेच्या कारणास्तव या संस्थेनं कंपन्यांची नावं जाहीर केलेली नाहीत. पण लॉकडाऊनमुळे या कंपन्यांचा महसूल 30 टक्क्यांहूनही घटलाय, असं संस्थेचं म्हणणं आहे.

एकीकडे हे असं चित्र असताना काही भारतीय कंपन्या मात्र प्रवाहात उलटं पोहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एप्रिल 2020 पासून नवीन आर्थिक वर्षं सुरू झालं आहे आणि आर्थिक दृष्ट्या विपरित परिस्थितीत या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक तर पगार वाढ नाहीतर चक्क बोनसही देऊ केला आहे.

कोरोना काळात एक चांगलं उदाहरण लोकांसमोर ठेवण्याचा कंपन्यांचा मानस आहे. कोणत्या आहेत या कंपन्या? त्या पगार वाढ का देणार आहेत? त्यातून त्यांना कोणता संदेश द्यायचा आहे? आणि आपल्या उद्योग क्षेत्राने त्यातून काय बोध घ्यायचा आहे? सविस्तर बघूया...

पगार वाढ, बोनस आणि नवीन भरती

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

बांधकाम उद्योग ठप्प असल्यामुळे एशियन पेन्ट्स कंपनी सध्या तोट्यात आहे. पण कंपनीने आपल्या काही कारखान्यात सॅनिटायझरचं उत्पादन सुरू केलं. वेगवेगळ्या श्रेणीतले सॅनिटायझर बनवून त्यांनी उत्पादन तर सुरू ठेवलंच. शिवाय याच महिन्यात कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढही जाहीर केली आहे.

कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक काही अतिरिक्त सुविधाही त्यांनी देऊ केल्या आहेत. एवढंच नव्हे तर, दरवर्षी होते तेवढी नियमित पगार वाढ करणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे.

"आमच्या कंपनीवर मागची काही वर्षं कर्ज नाही. त्यामुळे आताच्या कठीण काळात आम्ही करता येईल तेवढी मदत कर्मचाऱ्यांना करत आहोत," असं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सिंघल यांनी बीबीसी मराठीला ईमेलद्वारे कळवलं.

अशा काळात प्रत्येक कर्मचाऱ्याशी वैयक्तिक संपर्क ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो, असंही सिंघल यांनी म्हटलं आहे.

सामाजिक बांधिलकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टाटा समूहाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसने अलीकडेच आपल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पगारात 25 टक्के कपात जाहीर केली. पण मध्य आणि कनिष्ठ वर्गाला त्यांनी कपातीची झळ बसू दिलेली नाही.

आणि महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांचं आरोग्य महत्त्वाचं मानून कंपनीने आपल्या चार लाखच्याही वर कर्मचारी वर्गाला घरून काम करण्याची सूट दिली आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असल्यामुळे हे शक्य आहे. पण, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून कंपनीचे प्रमुख राजेश गोपीनाथन यांनी हा निर्णय घेतला आहे. नवीन आर्थिक वर्षांत 40,000 नवीन कर्मचारी भरतीही टीसीएसमध्ये अपेक्षित आहे.

याशिवाय हिंदुस्थान लिव्हर, कोका कोला, नेस्ले, केप जेमिनी, लिक्ड इन इंडिया या कंपन्याही नवीन वर्षांत कर्मचाऱ्यांना बोनस आणि पगारवाढ देणार आहेत. केप जेमिनी या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने जाहीर केलेली सगळ्यात मोठी पगार वाढ सत्तर टक्क्यांची आहे.

HCL टेक्नोलॉजी कंपनीनेही आपल्या दीड लाखांच्या वर कर्मचाऱ्यांना या कठीण काळात दिलासा देऊ केला आहे. कंपनीच्या नॉयडा भागातील मुख्यालयाचे मनुष्य बळ विकास अधिकारी अप्पा राव यांनी बीबीसीशी बोलताना कंपनीच्या पुढच्या योजनांची माहिती दिली.

"आमच्याकडे असलेले परदेशातील प्रकल्प कमी झालेले नाहीत. त्यामुळे कंपनीकडे काम आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांचं मनोबळ वाढवण्यासाठी आम्ही बोनस देण्याचं ठरवलं आहे. शिवाय पंधरा हजारच्या आस पास नवीन नोकर भरतीही नजीकच्या काळात कंपनीला करायची आहे."

कोरोना संकटात बोनस, पगार वाढ कशी परवडते?

खरंतर कठीण काळात पगार वाढ आणि बोनस देणं ही अमेरिकन संकल्पना आहे. आताही अॅमेझॉन, ब्लॅक हॉक, सिटी बँक, AT&T, वॉलमार्ट यासारख्या मोठ्या कंपन्याही हीच नीती आजमावताना दिसत आहेत. अगदी फेसबुकनेही कर्मचाऱ्यांना खास कोरोना बोनस दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रतीकात्मक छायाचित्र

अमेरिकेतील ग्लासडोअर या मनुष्यबळ विकास वेबसाईटमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम करणारे अँड्र्यू चेंबरलेन यांनी अलीकडेच एका ब्लॉगमध्ये या मानसिकतेचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे.

"मोठ्या कंपन्यांसाठी या कठीण काळात ही एक संधी आहे स्वत:ची जाहिरात करण्याची किंवा समाजातील तसंच बाजारपेठेतील आपलं स्थान बळकट करण्याची. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या मनातही त्यातून एक उपकाराची भावना निर्माण होते. आणि लवकरच सगळं पूर्ववत होणार आहे. त्यावेळी जास्तीचं पडणारं काम कर्मचारी आनंदाने करतील. कंपनीला जी खर्चात कपात करायची असते ती इतर मार्गानेही होऊ शकेल. पण मनुष्यबळ हे कुठल्याही कंपनीसाठी सगळ्यात मोठी मालमत्ता असते. आणि ते सहज मिळत नाही, म्हणून कंपन्या असा निर्णय घेतात."

पुढे जाऊन चेंबरलेन यांनी म्हटलं आहे की, "एकाच श्रेत्रातील कंपन्यांमध्ये चढाओढही सुरू होते की, आपण याबाबतीतही कसे पुढे आहोत. आणि त्यातून एका मागून एक कंपन्या हा पगार वाढीचा मार्ग स्वीकारतात. त्यातून एक वातावरण निर्मिती होते. पण, कधी कधी हा धोकाही संभवतो की पगार वाढीच्या नंतर काही कालावधीने कर्मचारी कपातही होऊ शकते.

भारतात पगार वाढ देणाऱ्या बहुतेक कंपन्या या एक तर अमेरिकन कंपन्यांना सेवा पुरवणाऱ्या आहेत किंवा त्यांच्याशी थेट व्यवहार करणाऱ्या आहेत. त्यामुळे अँड्र्यू चेंबरलेन यांचं म्हणणं आपल्याला समजू शकतं. पण या अमेरिकन अर्थविषयक तत्त्वज्ञानातून भारतीय कंपन्यांनी काही बोध का घेऊ नये? म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना का आनंदी ठेवू नये?

बोनस, पगार वाढीचं गणित

भारतातही वर म्हटल्याप्रमाणे बोनस जाहीर करणाऱ्या कंपन्यांची संख्या कमी नाही. जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या लॉकडाऊनच्या काळातही सुरू होत्या. त्यामुळे अशा कंपन्यांचा भाव मधल्या तीन महिन्यात वधारला आहे.

डी मार्ट ही किराणा सामान विकणाऱ्या दुकानांची चेन चालवणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्केट याच कालावधीत 30 टक्क्यांनी वाढली आहे.

आता प्रश्न आहे आपल्याला होणारा फायदा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

आयटी कंपन्यांमधील एक दृश्य

त्याविषयी बीबीसी मराठीने पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट आणि स्टार्टअप कंपन्यांची उभारणी करण्यात अग्रेसर असलेले प्रताप काकरिया यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दोन गोष्टी अधोरेखित केल्या - "कंपनीचं नेमकं बिझनेस मॉडेल, कंपनीवरील कर्ज आणि पुढच्या 2-3 वर्षांच्या कालावधीत कंपनीची अपेक्षित कामगिरी यावर कुठल्याही कंपनीचं बोनस आणि पगाराचं गणित अवलंबून असतं.

"धंदा करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी भांडवल लागतं. आणि ते उभं करण्याचा एकमेव पर्याय सध्या देशात आहे तो म्हणजे संस्थांकडून घ्यायची कर्जं. आणि भारतात कर्ज महाग आहेत. परतफेडीचे नियम जाचक आहेत. तुलनेनं इतर देशांमध्ये कर्जं स्वस्त आहेत, म्हणूनच एकदा कंपनीचं आर्थिक गणित कोलमडून पडलं तर ते दुरुस्त करण्यात खूप वेळ जातो. आणि आर्थिक नुकसानही मोठं होतं."

"याउलट भारतात मनुष्यबळ स्वस्त आहे. आणि ते सहजी उपलब्ध होतं. म्हणून भारतीय कंपन्यांचं हाती असलेल्या मनुष्य बळाकडे दुर्लक्ष होतं. पण आताच्या परिस्थितीत खरं तर मनुष्यबळच अमूल्य आहे," असं मत प्रताप काकरिया यांनी नोंदवलं.

आताच्या कठीण काळातून तरून जाण्यासाठी भारतीय कंपन्यांनी मनुष्य बळाचाच वापर केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. "कंपनीचं उत्पादन आणखी कसं चांगलं करता येईल, याचा विचार या काळात केला पाहिजे. जागतिक बाजारपेठेत कसं घुसता येईल, याचा विचार केला पाहिजे. आणि आयात-निर्यात धोरण तयार करण्यावर भर दिला पाहिजे. तसंच डिजिटायझेशनचं महत्त्व ओळखलं तर येणाऱ्या पुढच्या काळात कंपनीला मरण नाही."

हा विचार करून कंपनीने या काळात आहे ते सुरू ठेवून मनुष्य बळाला पुढच्या काळासाठी तयार करण्याच्या कामी लावलं आणि तसं धोरण ठेवलं तर कंपनीची स्वाभाविकपणे वाढ होईल, असं थोडक्यात त्यांना म्हणायचं आहे.

'संकट ही व्यावसायिकासाठी संधी'

पुण्यातील सर्वत्र टेक्नोलॉजीस या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष मंदार आगाशे यांना कोरोनाच्या संकटात संधी दिसते. नुकतीच त्यांनी आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची पगार वाढ प्रक्रिया पूर्ण केली आहे. मध्यम आकाराची ही तंत्रज्ञान कंपनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून पगारवाढ देणार आहे.

"आयुष्य सुरू राहतं. कोरोना हे अंतिम सत्य नाही. ती फक्त तात्पुरती अडचण आहे. आणि त्यातूनच एक संधी कंपनीला मिळाली ती अभिनव काहीतरी करण्याची. आम्ही आमचा सगळा कर्मचारी वर्ग घरूनही कसा प्रभावीपणे काम करू शकेल, याचा विचार केला. मनुष्यबळ ही आमची खरी ताकद आहे, हे ओळखून त्यांना कामं नव्याने नेमून दिली.

"एरवी सेल्समध्ये असलेल्या माणसाला टेली मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग आणि क्लायंट्स बरोबरचे हितसंबंध सांभाळण्याची कामं दिली. त्यातून ही मंडळी नवीन कला शिकली. त्यांना नोकरीची शाश्वती राहिली आणि दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांनी कंपनीसाठी मनापासून काम केलं," असं मंदार सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कोरोना काळात काही कंपन्यांनी बोनस दिला.

"कार्यालय बंद असल्यामुळे ती जागा आम्हाला लागणार नव्हती. तिच्यावर होणारा खर्च कमी झाला. आणि तो पैसा आम्ही कर्मचाऱ्यांवर वापरला. अगदी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीलाही त्यांचा कंपनीसाठी उपयोग आहे हे पटवून दिलं. आणि त्यांच्याकडून वेगळं काम करवून घेतलं.''

इनोव्हेशन (कल्पकता) आणि मनुष्यबळाचं रिलोकेशन (तात्पुरत्या बदल्या, कामाचं बदललेलं स्वरूप) यातून सर्वत्र टेक्नोलॉजीसने आपलं नफ्याचं गणित जुळवलं. कल्पकता दाखवणारी माणसं आणि तीही कर्मचारी वर्गातली माणसं असल्यामुळे त्यांच्यावरील विश्वास मंदार आगाशे यांना महत्त्वाचा वाटतो.

हीच कल्पकता जर उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांनीही दाखवली तर ते ही हे गणित जुळवून आणतील, असं आगाशे यांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)