वाजिद खान: 'साजिद-वाजिद' जोडीतल्या संगीतकाराचं निधन, कोरोनाची लक्षणं होती #5मोठ्याबातम्या

वाजिद खान

फोटो स्रोत, Twitter/Wajid Khan

फोटो कॅप्शन,

संगीतकार वाजिद खान

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1) संगीतकार वाजिद खान यांचं निधन

'साजिद-वाजिद' या हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडगोळीतले संगीतकार वाजिद खान यांचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झालं.

एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

साजिद-वाजिद या जोडीनं 1998 साली 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमातून संगीतकार म्हणून पदार्पण केलं होतं. त्यानंतर गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर इत्यादी सिनेमांमधील गीतांना संगीत दिलं होतं.

वॉन्टेड, दबंग, एक था टायगर अशा सिनेमांमधील गाण्यांना साजिद-वाजिद यांनीच संगीत दिले होते.

फोटो स्रोत, Twitter

काही वृत्तांनुसार वाजिद खान यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या कोरोनाची लक्षणंसुद्धा दिसत होती.

मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की किडनीशी संबंधित आजारावर वाजिद मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये 60 दिवसांपासून उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना मधुमेहसुद्धा होता.

पहाटे दोन वाजता त्यांचं निधन झालं, अशी माहिती त्यांचे बंधू आणि संगीतकार साजिद खान यांनी दिली.

वाजिद यांना वर्सोव्हा येथील कब्रिस्तानमध्ये दफन केलं जाईल. त्यांची कबर इरफान खान यांच्या शेजारी असेल.

2) मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखायला हवा होता - अमित शाह

दिल्लीतल्या निजामुद्दीन इथं पार पडलेल्या तबलिगी जमातच्या मरकज कार्यक्रमावरून देशभरात चर्चांचा धुरळा उडून शांतही झाला. मात्र, आता यावर पहिल्यांदाच भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केलंय.

मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता आणि वेळीच वैद्यकीय मदत पुरवली गेली असती, तर आता ही स्थिती झाली नसती, असं अमित शाह कोरोना आणि मरकज यावरील प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. आज तकच्या ई-अजेंडा कार्यक्रमात ते बोलत होते.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

अमित शाह

विशेष म्हणजे, दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या म्हणजेच सध्या अमित शाह यांच्याच अख्त्यारित येतात.

मरकज कार्यक्रमात सहभागी झालेले अनेकजण कोरोनाबाधित आढळले होते. त्यामुळे देशभरातून या कार्यक्रमावर टीका केली जात होती.

3) माजी मंत्र्यांच्या स्वागतादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांनी कोरोना व्हायरसवर मात केली आणि ते रविवारी चेंबुरमधील घरी परतले. हंडोरेंच्या स्वागताच्या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडवला. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Facebook/Chandrakant Handore

फोटो कॅप्शन,

माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी कोरोनावर मात केलीय.

चंद्रकांत हंडोरे यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर ते नवी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये गेले 20 दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. त्यांच्या तीन चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर चौथी चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळं त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं.

चेंबुरमधील पी. एल. लोखंडे मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ते दाखल झाले. मात्र यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते गोळा झाले होते. या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाहीच, मात्र अनेकांनी मास्कही घातले नव्हते, असं या बातमीत म्हटलंय.

4) केरळमधील डॉक्टर-नर्सची पहिली टीम महाराष्ट्रात दाखल

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्रातले डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी रात्रंदिन प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेतच. मात्र, या डॉक्टरांच्या मदतीला आता केरळमधील डॉक्टरही धावून आलेत. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीला मान देऊन, केरळमधील डॉक्टर आणि नर्सची पहिली टीम महाराष्ट्रात आलीय. मुंबई मिररनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण संचलनालयानं केरळच्या आरोग्य मंत्री के के शैलजा यांना पत्र लिहून तात्पुरत्या काळासाठी काही डॉक्टरांची मदत महाराष्ट्राला करावी, अशी विनंती केली होती. या विनंतीला केरळनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय.

पुढच्या काही दिवसात केरळमधील 50 डॉक्टर आणि 100 नर्स महाराष्ट्राच्या मदतीला येणार आहेत.

5) महाराष्ट्रात दाढी-कटिंगसाठी दुप्पट दर आकारणार

महाराष्ट्रात दाढी-कटिंगसाठी आता आधीपेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागतील, कारण महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशननं दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

लॉकडाऊनपूर्वी कटिंगचा दर 60 ते 80 रुपये होता, मात्र आता नव्या दरानुसार ग्राहकाला 100 ते 120 रुपये मोजावे लागतील. तर दाढीचा 40 ते 50 रुपयांचा दर वाढवून 80 रुपये करण्यात आलाय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून व्यवसायिकांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. PPE किटसह इतर साहित्य खरेदी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांचा खर्च वाढणार आहे, त्याचबरोबर दुकान भाडं, लाईट बिल आणि घर खर्च संभाळण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक फोटो

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यात आलाय. मात्र, लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आता 'अनलॉक'कडे सरकारचा कल दिसून येतो. त्याच पार्श्वभूमीवर 'मिशन बिगन अगेन' म्हणत महाराष्ट्र सरकारनं काही सेवा सुरू करण्यास परवानगी दिलीय.

मात्र, एवढ्या दिवस या सेवा बंद असल्यानं आर्थिक फटका बसलाय. तो भरून काढण्याचा प्रयत्न त्या त्या क्षेत्रातील लोकांचा दिसून येतोय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)