निसर्ग चक्रीवादळ: मुंबई जोरदार पाऊस-वाऱ्याचा सामना करायला तयार आहे का?

  • मयुरेश कोण्णूर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबई

फोटो स्रोत, ANI

समुद्री चक्रीवादळ 'निसर्ग' मुंबईच्या दारावर येऊन थडकलंय. शेवटचं वादळ मुंबईच्या किनारपट्टीला येऊन धडकलं त्याला 129 वर्षं झाली.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आजपर्यंत अनेक चक्रीवादळं आली, पण मुंबईच्या दारावर त्यापैकी शेवटचं 1891 मध्ये आलं होतं. मुंबईत राहिलेल्या एका पोर्तुगीज इतिहासकाराच्या लेखनात मे 1618 मध्ये आलेल्या अशा विनाशकारी वादळाचा उल्लेख सापडतो. 17व्या आणि 18व्या शतकातही तोपर्यंत व्यापारी केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या या शहरानं अनेक वादळांना तोंड दिलं.

गेल्या दशकभराच्या काळात मुंबईनं पूरही पाहिला, ढगफुटीसारखा प्रचंड पाऊसही अनुभवला. पण त्याला चक्रीवादळ कारणीभूत नव्हतं.

"मुंबईनं 1891 सालानंतर अशा गंभीर प्रकारचं चक्रीवादळ येऊन थडकणं अनुभवलं नाही आहे," अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात हवामानशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अॅडम सोबल यांनी 'बीबीसी'च्या सौतिक बिस्वास यांच्याशी बोलताना सांगितलं. सोबल यांनी चक्रीवादळासाठी मुंबईच्या असलेल्या तयारीचाही अभ्यास केला आहे.

"हे वादळ मुंबईजवळ येईल आणि जवळपास 110 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहतील. हे एक ताकदवान 'ट्रॉपिकल स्टॉर्म' असेल, ज्याला आपण 'हरिकेन' म्हणतो तसं नाही," सोबल सांगतात.

पण 129 वर्षांनी चक्रीवादळाचा मुकाबला करायला निघालेली मुंबई त्याला तोंड द्यायला तयार आहे का? मुंबई आता एकाच वेळेस कोरोनाच्या आणि 'निसर्ग' चक्रीवादळाच्या कात्रीत अडकली आहे. या दोन्ही संकटांना तोंड देत तारेवरची कसरत सरकारच्या आणि मुंबईकरांच्या वाट्यालाही आली आहे. त्यामुळेच एका बाजूला या चक्रीवादळाला तोंड देतांना, सरकारला प्राथमिकता ही कोरोनाबाधित रुग्णांना द्यावी लागली आहे.

"मुंबईच्या बीकेसी मैदानात जे विशेष कोव्हिड हॉस्पिटल आपण उभारलं आहे, तिथले रुग्ण दुसऱ्या ठिकाणी आपण या वादळाची सूचना आल्यावर स्थलांतरित करतो आहोत," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी या चक्रीवादळासंबंधी जनतेला संबोधित करतांना म्हणाले.

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन,

मुंबईत मच्छिमारांनी बोटी परत आणल्या.

कोविडच्या युद्धासाठी जी तयारी केली ती टिकववण्याची वेळ या दोन दिवसांमध्ये आली आहे. या वादळाच्या काळात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, ICU बेड्स आहेत, तिथे तो खंडित होऊ नये म्हणून सरकार जनरेटर्सची सोय करते आहे.

वास्तविकपणे, कोरोनाच्या काळात सरकारनं खासगी रुग्णालयातले बेड्स कोव्हिड पेशंट्ससाठी घेतलेले आहेत. पण आता वादळाचा काळ आल्यावर विशेष कोव्हिड रुग्णालयं सोडून इतर रुग्णालयं उपलब्ध करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

मुंबईसहित जो किनारपट्टीचा भाग या वादळानं प्रभावित होणार आहे, विशेषत: उत्तर कोकणाचा, तिथे सखल भागात किनारपट्टीजवळ राहत असलेल्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. धोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येतं आहे.

मुंबई महापालिकेनं काही शाळा उपलब्ध करून तिथे लोकांना स्थलांतरित केलं आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर संचारबंदी लागू केली गेली आहे.

अलिबागजवळ हे वादळ जमिनीला येऊन थडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे अलिबाग आणि किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरात संचारबंदी लागू केली आहे.

फोटो स्रोत, NDRF

जीवितहानी टाळणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश नागरिक घरामध्येच आहेत, ती एक जमेची बाजू. पण काही महिन्यांपासून कोरोनाचा सामना करत उभ्या असलेल्या प्रशासन यंत्रणेची अजून एक परीक्षा आली आहे.

विजेचा पुरवठा, पाणी पुरवठा, इंटरनेट या लगेचच प्रभावित होणाऱ्या व्यवस्था आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घरात पिण्याचं पाणी साठवा, असं म्हटलं आहे. मालमत्तेचं होऊ शकणारं नुकसान, हा दुसरा प्रश्न आहे. वादळाच्या अशा तडाख्यासमोर मुंबईला उभं राहायचं आहे.

मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात NDRFच्या 10 तुकड्या सध्या तैनात करण्यात आल्या आहेत. एकट्या मुंबईत त्यातल्या तीन तुकड्या आहेत. अजून सहा तुकड्या सज्ज आहेत, ज्यांना गरजेनुसार कुठेही पाठवलं जाईल.

राज्य आपत्ती प्राधिकरणाचा एक विशेष कक्षही मंत्रालयात तयार करण्यात आला आहे. मुंबई आणि इतर परिसरावर वादळ आल्यावर कशी स्थिती असेल, त्याच्यावर चोवीस तास तिथून लक्ष असेल. या वादळाची सूचना आल्यावर समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या मच्छिमारांचा प्रश्न होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मुंबईतलं दृश्य

शासनाचा दावा आहे की सगळ्यांशी संपर्क होऊन त्यांना परत आणलं गेलं आहे, आणि परत समुद्रात सूचना येईपर्यंत जायचं नाही, असंही सांगितलं आहे.

गेल्या आठवड्यात पूर्व किनारपट्टीवर आलेल्या अम्फान या चक्रीवादळानं पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना फटका बसला. ओडिशा कायम अशा चक्रीवादळांना तोंड देत असल्यानं तिथे विशेष कायद्यान्वये स्वतंत्र यंत्रणा उभी आहे. तिचं कायमच कौतुक होत असतं. बंगालला, अगदी कोलकाता शहरालाही या वादळाचा मोठा फटका बसला. आता लगेचच पश्चिम किनारपट्टीवर मुंबईच्या दिशेनं चक्रीवादळ आलं आहे.

2005 असो वा दरवर्षीचा पावसाळा, मुंबईची होणारी स्थिती टीकेचा विषय असते. आता मुंबई येऊ घातलेल्या पावसाळ्यासाठी कोरोना काळात तयार होत होती, आणि तितक्यात 'निसर्गा'नं दार ठोठावलं. तुंबलेल्या नाल्यांमुळे थोड्या पावसातही पूरसदृश स्थितीला तोंड देणारी मुंबई या चक्रीवादळासाठी किती तयार आहे, हा म्हणूनच प्रश्न आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)