कोरोना अपडेट: उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण #5मोठ्याबातम्या

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1. 'मातोश्री'वरच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री' या ठिकाणी पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. 'मिडडे' या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

'मातोश्री' येथिल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण बंगला सॅनिटाईज करण्यात आला आहे. ठाकरे कुटुंबीयांनी कोरोना टेस्ट केल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसली तरी, त्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.

एच ईस्ट वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी सांगितलं, "एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलं असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. 'मातोश्री' येथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. बहुतांश जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. काही रिपोर्ट येणं बाकी आहे.

"मुख्यमंत्र्यांचाया कुटुंबातील कोणत्याही सदस्याला होम क्वारंटाईन होण्यास सांगितलं नाहीय, कारण कुणीही रुग्णाच्या थेट संपर्कात आलेलं नाही," असंही ते म्हणाले.

2. महाविकासआघाडीतच नाराजी असेल तर ठाकरे सरकार स्वत:च पडेल - अमित शहा

महाविकास आघाडीचं सरकार चालवणाऱ्या तीन राजकीय पक्षांमध्येच अंतर्गत नाराजी असेल तर सरकार स्वत:च पडेल, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. नेटवर्क18 ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

फोटो स्रोत, PTI

अमित शाह म्हणाले, "एकत्र आलेल्या तीन राजकीय पक्षांचा एकमेकांवर विश्वास असेल तर सरकार कसे पडेल ? पण सत्तेत असलेल्यांमध्ये नाराजी असेल आणि ते सत्ता सोडून जाणार असतील तर हे सरकार पडेल." शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार पडले तर त्याला त्यांच्यातला आंतरविरोध कारणीभूत असेल असंही शहा म्हणालेत.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्यामागे काही बोलणी सुरू आहेत का ? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी पुन्हा एकदा सरकारमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे बोलून दाखवले. तसेच कोरोनाचे संकट असताना भाजप कुठल्याही राज्यात सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

3. पुण्यात 30 माकडांवर करोना लस चाचणी

कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातही सुरू आहेत. कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी SARS COV 2 या लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. लोकमत या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

30 माकडांवर सर्वप्रथम या लशीची चाचणी केली जाणार आहे. ही माकडं राज्यातूनच आणली जाणार असून तसे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. वन विभागाने या प्रयोगासाठी काही अटींसह मान्यता दिली आहे.

4. पंढरपुरात 460 मठ आणि धर्मशाळांना नोटीस

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात कुणीही मठ किंवा इतर ठिकाणी राहण्याची सोय करुन दिली तर जागा मालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. पंढरपूर प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी तसे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी 460 मठ आणि धर्मशाळांना नोटीसही बजावली आहे. सामना या वृत्तपत्राने ही बातमी दिलीय.

यंदा वारी होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. पण तोपर्यंत कुणीही परवानगी न घेता पंढरपूरात दाखल झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

5. नोकऱ्या गेल्या असतील तर संपर्क साधा - मनसेचे मराठी तरुणांना आवाहन

कोरोना संकट काळात अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. तसंच अनेकांचे पगार कापले जात आहेत. मराठी तरुणांना असा काही अनुभव येत असल्यास त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवावे असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. त्यासाठी मनसेकडून संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

टिव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी याविषयीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. सरकार केवळ फेसबुकवर बोलत आहे. पण नोकऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी प्रत्यक्षात काहीही करत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. यासाठी मनसे कामगार सेनेचा नंबर त्यांनी दिला असून या विषयाची माहिती गोळा करुन मनसे त्याचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)