गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर वंजारी समाजाचा नेता कोण?

  • नामदेव अंजना
  • बीबीसी मराठी
पुढचा वंजारी नेता कोण?
फोटो कॅप्शन,

पुढचा वंजारी नेता कोण?

गोपीनाथ मुंडेंनंतर वंजारी समाजाचा नेता कोण, असा प्रश्न गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या सहा वर्षांनंतर विचारण्याचं कारण काय? असा सहाजिक प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. पण त्याला काही तत्कालीन कारणं आहेत.

2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव होणं, त्यानंतर पंकजा मुंडे या काहीशा बॅकफूटवर जाणं, भाजपकडून वंजारी समाजातीलच भागवत कराड यांना राज्यसभेवर पाठवणं, तसंच (पंकजा मुंडे यांना वगळून) याच समाजातील रमेश कराड यांना विधानपरिषदेवर पाठवणं, अशा बऱ्याच घटना गेल्या काही महिन्यातच घडल्या.

गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी वंजारी समाजाचं एकहाती नेतृत्त्व केलं. वंजारी समाजानंही त्यांच्यावर अमाप प्रेम केलं. त्यांच्यानंतर मुलगी पंकजा मुंडे यांनाही निवडणुकीच्या मैदानात मतांद्वारे ते प्रेम व्यक्त केलं गेलं. मात्र 2019ला गणितं बदलल्याची दिसून आली. विधानपरिषद निवडणुकीनंतर तर या गणितांनी नवे प्रश्न समोर आणले.

अशावेळी गोपीनाथ मुंडेंनंतर वंजारी समाजाचं राजकीय नेतृत्त्व म्हणून कोण पुढे येऊ पाहतोय किंवा नेतृत्त्वाच्या क्षमतेत कुणाचं पारडं जड आहे, याचा कानोसा बीबीसी मराठीनं घेण्याचा प्रयत्न केला.

गोपीनाथ मुंडेंनंतर वंजारी समाजाचा नेता कोण, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी, वंजारी समाजानं गोपीनाथ मुंडे यांना आपले राजकीय नेतृत्त्व का मानलं, हे पाहावं लागेल. त्यानंतरच पंकजा मुंडे, धनंजय मुंडे किंवा इतर कुणाच्या नेतृत्त्वगुणांची चर्चा करता येईल.

'वंजारी समाजाला राजकीय जाणीव जागृत करणारा नेता'

मुंडेंच्या कारकिर्दीत त्यांच्या उंचीचा एकही नेता वंजारी समाजात झाला नसल्याचं ज्येष्ठ पत्रकार सुधीर महाजन सांगतात. सुधीर महाजन यांनी पत्रकार म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय प्रवास जवळून पाहिलाय.

गोपीनाथ मुंडेंचं इतकं खमकं नेतृत्व निर्माण होण्यामागचं कारणही ते सांगतात, "महाराष्ट्राच्या राजकारण किंवा समाजकारणात वंजारी समाजाला फारसं स्थान नव्हतं. मात्र गोपीनाथ मुंडेंच्या रुपानं ते स्थान प्राप्त झालं. गोपीनाथ मुंडेंनी पुढाकार घेत समाजात शैक्षणिक, सामाजिक जागरुकता निर्माण केली. वंजारी समाजाला मुंडेंनी जाणीव करून दिली की, आपली मोठी व्होटबँक आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बाजावू शकते."

फोटो स्रोत, Getty Images

पण गोपीनाथ मुंडेंच्या सोबत किंवा मागे-पुढे वंजारी समाजात नेते नव्हतेच का? तर होते. वंजारी समाजात बबनराव ढाकणे, पंडितराव दौंड, फुलचंद कराड, उषा दराडे असे बरेच नेते होऊन गेले.

"फुलचंद कराडांनी तर भगवान सेनाही स्थापन केली होती. पण गोपीनाथ मुंडेंसारखी सामाजिक मान्यता कुणालाच मिळाली नाही," असं वरिष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी सांगतात.

याही पुढे गोपीनाथ मुंडेंचा इतका पगडा वंजारी समाजावर का आहे, याबाबतही सुशील कुलकर्णी अधिक सखोलपणे सांगतात. ते म्हणतात, "महाराष्ट्रातील वंजारी समाजाला रोजगाराच्या संधी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे निर्माण झाल्या. गोपीनाथ मुंडेंच्या आशीर्वादानं मुंबई-पुण्यात स्थिरावलेला मोठा वंजारी समाज आहे. समाजाला सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठाही त्यांनी मिळवून दिली."

'मुंडेंचं हिंदुत्व बहुजनांना सामावून घेणारं'

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

ऊसतोड कामगारांच्या समस्या आणि मराठवाड्यातील राजकारणाचा विशेष अभ्यास असणारे संशोधक सोमीनाथ घोळवे थोडं वेगळं मत मांडतात. ते म्हणतात, "गोपीनाथ मुंडे यांना केवळ वंजारी समाजाच्या चौकटीत बांधणं त्यांच्यावर अन्याय आहे. उदाहरणादाखल, आपण त्यांच्या मतदारसंघाबाबत पाहू. त्यांच्या रेणापूर मतदारसंघात सुद्धा वंजारी मतांपेक्षा इतर मतं अधिक होती.

"गोपीनाथ मुंडे यांचं हिंदुत्व बहुजनांना सामावून घेणारं होतं. पर्यायानं त्यांना वंजारींच्या मतांच्याही पुढे जाऊन मान्यता होती," असं सोमीनाथ घोळवे सांगतात.

हे असलं तरी गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी किंवा ओबीसींचं राजकारण फार उशिरा सुरू केलं. प्रमोद महाजन हयात असताना गोपीनाथ मुंडे यांना राजकारणात 'गॉडफादर' होता. मात्र महाजनांच्या निधनानंतर त्यांना स्पर्धा सुरू झाली आणि त्यांनी ओबीसीचंही राजकारण सुरू केलं. ओबीसीचे नेते म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली होती.

गोपीनाथ मुंडे यांनी ते हयात असतानाच त्यांचा राजकीय वारसा मुलगी पंकजा मुंडेंच्या रूपाने जाहीर केला होता. त्यामुळे पुढे पंकजा मुंडेच राजकीय वारस म्हणून पुढे आल्या. मात्र, इथेच गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे नाराज झाले आणि मुंडे कुटुंबात दोन भाग झाले.

फोटो स्रोत, Pankaja Gopinath Munde/FACEBOOK

गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी वडिलांचा वारसा पुढे हाकण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांच्या भावनिक हाकेला 2014 साली वंजारी समाजानं साद दिलीही. मात्र, 2019 साली विधानसभेत पंकजा मुंडे पराभूत झाल्या आणि पुन्हा नेतृत्त्वाची चर्चा सुरू झाली.

त्यात भाजपनं वंजारी समाजातील भागवत कराड यांना राज्यसभा खासदार म्हणून तर रमेश कराड यांना विधान परिषदेत आमदार म्हणून संधी दिली. त्यामुळे यापुढे वंजारी समाजाचा नेता मुंडे कुटुंबातील असेल की या कुटुंबाबाहेरचा असेल, असा प्रश्न चर्चेत आला.

"भाजपनं भागवत कराड आणि रमेश कराड यांना संधी दिली असली तरी, या दोघांमध्ये वंजारी समाजाचं नेतृत्व करण्याची क्षमता नाही. शिवाय, समाजही यांना मान्यता देणार नाही, कारण वंजारी समाजामधील त्यांचा सहभाग तेवढा प्रभावी नाहीय," असं पत्रकार सुशील कुलकर्णी यांना वाटतं. "वंजारी समाजाचा नेता कोण - धनंजय की पंकजा मुंडे? हाच प्रश्न आहे. यातील जे कुणी भविष्यात प्रभावी राहील तोच नेता होईल."

किंबहुना, बीबीसी मराठीच्या मुलाखतीतच पंकजा मुंडे यांनीच सांगितलं की, रमेश कराड आणि भागवत कराड हे मलाच नेतृत्व मानून पुढे जात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे की धनंजय मुंडे यांच्यापैकी कोण वंजारी समाजाचं नेतृत्त्व आपल्या खांद्यावर घेऊ शकतं, याची चाचपणी बीबीसी मराठीनं केली.

मुंडे भाऊ-बहिणीत सरस कोण?

"दसरा मेळावा भगवानगडाऐवजी सावरगावात घेऊन, तिथं ज्या संख्येत गर्दी पंकजा मुंडेंनी जमवून दाखवली, तेव्हाच खरंतर गोपीनाथ मुंडेंनंतर वंजारी समाजाचा नेता कोण, हे स्पष्ट झालं होतं," असं निरीक्षण वरिष्ठ पत्रकार प्रमोद माने नोंदवतात.

ते सांगतात की सध्या पंकजा मुंडेंवरची नाराजी किंवा त्यांची झालेली कोंडी ती फक्त राजकारणाच्या राज्यस्तरावर आहेत; समाजात त्यांचं नेतृत्त्व मान्य असल्याचं दिसतं. "आजच्या घडीला तरी वंजारी समाजात पंकजा मुंडेंच्या सोबत राहण्याबाबत स्पष्टता आहेत. मात्र भावनिकतेच्या बळावर समाजाला किती काळ सोबत ठेवणार आहोत, या प्रश्नाचं उत्तर पंकजा मुंडे यांनी शोधायला हवं," ते सांगतात.

गोपीनाथ मुंडे हे पक्षाच्या पलिकडे जात ओबीसी समाजासाठी पुढाकार घेत असत. प्रमोद माने याच गोष्टीचा उल्लेख करत म्हणतात, पंकजा मुंडेही असाच प्रयत्न करताना दिसतात.

"काकू क्षीरसागरांबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा कायमच सुसंवाद राहिला होता. तसाच जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत पंकजा यांचा सुसंवाद दिसून येतो. महादेव जानकरांना भाऊ मानतात, धनगर समाजाच्या राम शिंदे यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. तसं धनंजय मुंडेंमध्ये दिसत नाहीत. ते पक्षाच्या पलिकडे जाताना दिसत नाहीत," असा फरक प्रमोद माने अधोरेखित करतात.

मात्र, ज्येष्ठ पत्रकार सुधीर महाजन यांना गोपीनाथ मुंडे यांच्यातील राजकीय गुण धनंजय मुंडे यांच्यात अधिक दिसतात. ते म्हणतात, काम, संपर्क, संचार, आक्रमकता आणि वक्तृत्वशैली या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर धनंजय मुंडे हे उजवे वाटतात.

"धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील मुलभूत फरक असा की, धनंजय मुंडे बीडमध्ये राहून राजकारण करतात, तर पंकजा मुंडे मुंबईत राहून बीडचं राजकारण करू पाहतात. बीडमध्ये राहून आणि येऊन राजकारण करणे यात मोठा फरक आहे," असं महाजन म्हणतात.

मात्र, वंजारी समाज धनंजय मुंडेंना आपला नेता म्हणून स्वीकारेल का, याबाबत सुशील कुलकर्णी यांना शंका वाटते. याबाबत अधिक विस्तृतपणे ते सांगतात की, "वंजारी समाजाचा राजकीय संघर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसशी राहिलाय. महाराष्ट्रात जिथं जिथं वंजारी समाज पसरलाय, तिथे ज्या प्रस्थापित नेत्याशी हा समाज लढतोय, तो राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा आहे. आणि धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत आहेत."

याच मुद्द्याला धरून सुधीर महाजन म्हणतात, "पक्ष थोडा वेळ बाजूला ठेवून विचार केल्यास गोपीनाथ मुंडे यांच्यातील नेतृत्त्व गुण आणि कामाची तडफ ही धनंजय मुंडे यांच्यामध्येच जास्त दिसते. पण समाजाचा मुद्दा येतो त्यावेळी कामापेक्षा अनेकदा भावनिक नातं जास्त वजनदार ठरतं. समाजाच्या कृती, बोलण्यातून ते वारंवार दिसूनही येतं."

फोटो स्रोत, Facebook

'पुढची निवडणूक ठरवेल'

2014 साली गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पंकजा मुंडे जिंकल्या. मात्र 2019ची म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि तो धनंजय मुंडे यांनीच केला.

"धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांकडेही राजकीय वारस म्हणून पाहिलं जातं. मात्र यात स्पष्टता येण्यासाठी आणखी एक निवडणूक जावी लागेल, कारण मुंडेंच्या निधनानंतर दोघेही प्रत्येकी एक-एक निवडणूक जिंकले आहेत. पुढच्या निवडणुकीत काय होतंय, यातून अधिक स्पष्ट होईल," असं सोमीनाथ घोळवे म्हणतात.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)