नागपूर कोरोनाः तुकाराम मुंढे यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबला का?

  • प्रवीण मुधोळकर
  • बीबीसी मराठीसाठी
तुकाराम मुंढे

फोटो स्रोत, facebook

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे कायम या ना त्या कारणाने चर्चेत असतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी कसं काम केलं किंवा करत आहेत, याबद्दल विविध चर्चा आणि वाद आहेत. त्यावरून मुंढेना काहींनी हिरो तर काहींनी व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावरही या विषयावर चर्चेला उधाण आलं आहे.

मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा कहर सुरु असताना राज्याची उपराजधानी नागपुरातील स्थिती नियंत्रणात आहे. आता ही स्थिती नियंत्रित ठेवण्याच्या श्रेय कोणाला हा वादाचा मुख्य विषय आहे.

नागपुरात आतापर्यंत 597 कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यापैकी 394 रुग्ण बरे झाले तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, YOGENDRA KUMAR/HINDUSTAN TIMES VIA GETTY IMAGES

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरची लोकसंख्या 30 लाखांच्या घरात आहे. असे असून देखील कोरोनाचा प्रसार थांबवण्यात महापालिका प्रशासनाला चांगले यश आले आहे. आता ही परिस्थिती असताना हे यश नेमके प्रशासनाचे की राजकीय नेत्यांचे यातूनच राजकारण सुरू झालं आणि त्यातून वाद निर्माण होऊन आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही सुरू झाल्या.

तुकाराम मुंढेंचा पॅटर्न काय?

नागपुरात 11 मार्च 2020 रोजी परदेशातून आलेल्या एका व्यक्तीला कोव्हिड 19 ची लागण झाल्याचं पुढे आलं. पुढे 25 मार्चपर्यंत सहा रुग्ण नागपुरात आढळले. पण संशयित व्यक्तींना घरीच क्वारंटाईन होण्यास सांगण्यात येत असे. मात्र, हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारल्यानंतरही अनेक संशयित बाहेर फिरत असत.

कोरोनाचा उद्रेक होण्यासाठी हे कारणीभूत ठरलं असतं. त्यामुळे प्रत्येक संशयिताला संस्थात्मक क्वारंटाईन राहावे लागेल, असा आदेश काढला गेला. या आदेशासोबतच नागपुरातील आमदार निवास, पोलिसांसाठी बांधलेल्या वसाहती, राज्य सरकारचे वनामती, सिंबायोसिस कॉलेज यासह अनेक संस्था क्वारंटाईन सेंटर म्हणून घोषित केलं.

तुकाराम मुंढे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात आतापर्यंत फक्त तीन ते चारच कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावून उपचार करावे लागले. केंद्र सरकारच्या एम्सने नेमलेल्या समितीनेच हा अहवाल दिल्याचं ते सांगतात.

"मी माझ्या नावाने कुठलाही पॅटर्न राबवलेला नाही. केंद्र सरकारच्या ICMR आणि राज्य सरकारच्या आदेशानेच मी काम करत आहे. डिटेक्शन, आयसोलेशन, ट्रीटमेंट आणि ट्रँकिंग असा पॅटर्न आहे," असं तुकाराम मुंढे सांगतात.

संस्थात्मक विलगीकरण (इंस्टिट्युशनल क्वारंटाईन) ठेऊन थांबलो नाही तर शहरात हायपरटेंशन डायबिटीज असलेले हृदयविकाराचे किती रुग्ण आहेत, याची माहिती काढली. नियमित पाठपुरावा केला आणि कोणती लक्षणं आढळतायेत का, हे तपासलं.

नागपुरात 2250 टीबी रुग्ण आहेत, त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना तपासलं. लोकांना ताप आहे का, हे आशा वर्कर्सच्या माध्यमातून तपासल्याचंही ते सांगतात.

राजकारण्यांना राग का आला?

नागपूरचे महापालिकेचे महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात सुरुवातीपासूनच वाद आहेत. त्यात मुंढे कोणाचेही ऐकत नाही असा आरोप राजकीय नेत्यांनी केलाय.

काही दिवसांपूर्वी संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांना पत्र लिहिलं. त्यात जोशींनी म्हटलं, "प्रशासनात लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे असतात. महापौरांचे आदेश हे कायद्यानुसार आयुक्तांना बंधनकारक असतात."

फोटो स्रोत, NMC FACEBOOK

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

प्रशासनाची जबाबदारी जशी आयुक्त म्हणून आपली आहे, तशीच शहराचा महापौर म्हणून माझीसुद्धा आहे, असे महापौर संदीप जोशी म्हणतात.

"नागपूरच्या नागरिकांनी ती विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर टाकली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनयमाच्या कलम 4 मध्ये प्राधिकरणाच्या बाबतीत नमूद केलेल्या स्पष्टतेबाबत आपण अवगत आहात, अशी मला अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी प्रशासनाचे दोन चाके आहेत. त्याप्रमाणे आपण कार्य करावे, त्याप्रमाणे आपण वागावे," अशी भावनाही जोशी यांनी व्यक्त केली आहे.

मुळात महापालिका आयुक्तच कोरोनाशी दोन हात करत आहेत, की पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनाही श्रेय द्यायला हवे, असा मुद्दा उपस्थित करत तुकाराम मुंढे यांच्यावर टीका करायला सुरवात झाली. मग सोशल मीडियावर आणि विशेषत: युवा वर्गात प्रसिद्ध असणाऱ्या तुकाराम मुंढे यांचा जयजयकार त्यांच्या चाहत्यांनी करायला सुरवात केली. मग मुंढे हेच जाणूनबुजून हे घडवत आहेत आणि मीडियातून स्वत:च स्तुती करून घेत असल्याची टीका काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केली.

तुकाराम मुंढे यांच्या हेकेखोरपणाचा हिशेब आपण आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात घेणार असल्याचा इशारा काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी दिलाय.

"मुंढे म्हणजे लोकप्रतिनिधींचे ऐकायचं नाही, जनतेच्या अडचणी समजून घ्यायच्या नाही, प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखील लोकांना महिनाभर घरीच डांबून ठेवायचे, त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करायची नाही असा कारभार आहे," असा आरोप विकास ठाकरे यांनी केलाय.

विकास ठाकरे पुढे म्हणतात, "मुंढे पगारी नोकरदार आहेत, राज्य सरकारच्या सर्व सोयीसुविधा घेतात. सरकारच्याच योजनांची त्यांना अंमलबजावणी करायची असते. मात्र ते मुंढे पॅटर्न म्हणून स्वतःचा प्रचार करतात. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे याचे श्रेयही ते सरकारला देत नाही."

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

महापौर संदीप जोशी

"सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी त्यांनी एजन्सी नियुक्त केली आहे. यावर त्यांचे भक्त वेगवेगळे फोटो टाकतात. नागपूरचा राजा म्हणतात. यावर त्यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून कधी आक्षेप घेतला नाही. सरकारची नोकरी करतो असे म्हटले नाही. यावरून सर्वच मुंढेंच्या सहमतीने सुरू असल्याचे स्पष्ट होते. एवढीच प्रसिद्धी आणि समाजसेवेची खुमखुमी असेल तर मुंढे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात यावं," असं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे .

या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया देताना मुंढे म्हणाले, "माझा संपूर्ण फोकस हा कोरोनाच्या विरुद्ध लढाईचा आहे. कोण काय म्हणतंय यावर मी फारसे लक्ष देत नाही."

मी आपल्या कामावर आणि जनतेच्या सेवेला प्राध्यान्य देत असल्याचं मुंढे बीबीसी मराठीशी सोबत बोलतांना म्हणाले, "कायद्याच्या आणि नैतिकतेच्या आधारावर लोकांची सेवा करत राहणे हेच आपले ध्येय आहे. सनदी अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून अनेक अशा परिस्थितीचा सामना केला वेगळा जरी असला तरी नवीन नाही."

'मुंढे आणि वाद हे जुने समीकरण'

मुंढे विरुद्ध राजकारणी या वादावर नागपुरातील काही मान्यवरांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला.

महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित म्हणतात, "मुंढे जिथे जातात तिथे पदाधिकारी आणि राजकारणी त्यांच्या विरोधात जातात. त्यांच्या एककल्ली स्वभावावर होणारी टीका देखील नवी नाही. हे सर्व मान्य केले तरी सामान्य माणूस त्यांच्या सोबत असतो, प्रसंगी पक्ष बंधने झिडकारून लोक त्यांच्या कार्याचे कौतुक करताना दिसतात नागपुरातही हेच चित्र आहे."

फोटो स्रोत, Nmc facebook

"स्वत:चे काम वाढवून मुंढेंशी स्पर्धा शक्य आहे. राजकीय मंडळींनी तसे केले तर कदाचित सामान्यजनांचे समर्थन त्यांनाही मिळेल. नागपूरच्या करोनास्थितीचे नियंत्रण हे टीमवर्क आहे. त्या यशाचे भागीदार मुंढे आहेत. डाॉक्टर्स आहेत. महापौर आहेत. एवढेच कशाला, पोलीस आयुक्तही आहेत. अकोला, औरंगाबाद, मुंबई आणि नागपूरची तुलना केली तर नागपूरचे परिश्रम डोळ्यात भरतील. मुंढे यांचा भूतकाळ गरिबीचा होता. त्यांचा वर्तमान करारी आहे ही अनेकांची समस्या आहे. शरणागतीची नव्हे तर समन्वयाची दिशा स्वीकारण्यातच त्यांच्या प्रभावी भविष्याचा मार्ग दडला असेल," अपराजित पुढे सांगतात.

तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना सुरु आहे त्यावरून राजकीय श्रेय घेण्याचं हे प्रकरण असल्याचं 'द हितवाद' या वृत्तपत्राचे पत्रकार विकास वैद्य यांनी सांगितलं.

"तुकाराम मुंढे यांचा नागपुरात सोशल कनेक्ट नाही, कुणीही त्यांच्या फार निकट नाही. शिवाय शहर त्यांच्यासाठी नवे आहे. तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीसाठी एखादा नियम फिरवला असे झाले नाही त्यामुळे ते हिरो झाले असावे," असे वैद्य म्हणाले.

फोटो स्रोत, Nmc facebook

नागपुरात इतर शहराच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेन कमी झालाय देशातील पहिल्या तीस शहरातही नागपुरात नाही. आता एवढ्या मोठ्या संकटातून शहर बाहेर येत असताना याचा फायदा कुठल्याही राजकीय पक्षाला घेता येत नाही हे त्यांचे शल्य आहे. मुळात तुकाराम मुंढे यांनी केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेले नियम कडकपणे लागू केले.

"सरकारने महापालिका आय़ुक्तांना कोव्हिड-19 विरुद्ध लढण्यासाठी म्हणून नेमले आहे. त्यामुळे नागपुरातील पोलीस आयुक्त असो वा जिल्हाधिकारी त्यांना तुकाराम मुंढे यांनी दिलेले आदेश पाळणे मह्त्वाचे आहे. जरी हे सनदी अधिकार मुंढे यांच्यापेक्षा वरिष्ठ असले तरी. आता शहरात कोरोना पॉझिटिव्ह केसेस ज्या भागात आढळतात, त्या ठिकाणचा परिसर एक ते तीन किलोमीटरपर्यंत सिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरूनच मनपातील सत्ताधारी, विरोधक मुंढे यांच्या विरोधात गेले आहेत. पण हा नियम केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसारच घेतलं आहे," वैद्य यांनी सांगितलं आहे.

तर सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोवनी यांनीही तुकाराम मुंढे हे नागपूरसाठी योग्य काम करत असल्याच सांगितलं आहे, "तुकाराम मुंढे हे थेट लोकांसोबत संपर्क ठेवतात. सुरुवातीला मुंढे यांना शिस्त लावायला राज्य सरकार पाठवतं, नंतर त्यांचे सत्ताधारी लोकांसोबत खटके उडतात. घटनेतील मुल्य सामान्यांसाठी रुजवण्यासाठी त्यांचे प्रयत्न योग्य आहेत. गरीब घरून आलेला एक सामान्य माणूस अशा प्रकारे चांगले काम करतो, म्हणूनच ते राजकीय नेत्यांच्या मनात खुपतं," असंही सोवनी म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)