मुंबईत 8 जूनपासून बेस्ट बसेस पुन्हा धावणार

फोटो स्रोत, Getty Images
बेस्ट बस
मुंबईमध्ये 8 जूनपासून बेस्ट बसेस पुन्हा धावणार आहेत. 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर जाहीर करण्यात आला तेव्हापासून बेस्ट सेवा बंद करण्यात आली होती.
सध्या बेस्ट बसेस या फक्त अत्यावश्यक सेवांसाठी सुरू आहेत. पण, सोमवारपासून आणखी काही क्षेत्रातील लोक प्रवास करू शकतील. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.
बसमध्ये प्रवेश केल्यानंतर ऑफिसचं आयडीकार्ड कंडक्टरला दाखवावं लागेल. कंटेनमेंट झोन्स असलेल्या भागात बससेवा उपलब्ध नसेल.
प्रवास करणाऱ्यांना मास्क परिधान करणं बंधनकारक आहे. ड्रायव्हर-कंडक्टरकडे सॅनिटायझर असेल असं नमूद करण्यात आलं आहे.
बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हटलंय की, "8 जून 2020पासून बेस्टच्या बसगाड्यांमधून सामाजिक अंतर ठेवून प्रवास करू देण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमानं घेतला आहे.
"या निर्णयानुसार, बसगाड्यांमधील डावीकडे आणि उजवीकडे दोन जणांकरता असणाऱ्या प्रत्येक आसनावर केवळ एकच प्रवासी बसून प्रवास करू शकेल. तसंच केवळ 5 प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील."
सोमवारपासून एसटीच्या अतिरिक्त 250 बस धावणार
सोमवारपासून मंत्रालय व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी एसटीने अतिरिक्त 250 बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.
या बसेस मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजे पनवेल, पालघर, आसनगाव ,विरार ,नालासोपारा ,वसई, बदलापूर येथून धावणार असून पैकी 142 बसेस विशेषतः मंत्रालय, 15 बसेस महापालिका भवन मार्गावर धावणार आहेत.
उर्वरित ( सुमारे 100 ) बसेस मुंबई महानगर प्रदेशातंर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता धावतील.
अर्थात, या सर्व बसेस योग्य रीतीने सॅनिटाईज केलेल्या असून प्रवासात सोशल डिस्टंनसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
23 मार्च पासून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी ,मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी या सर्वांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या तब्बल 400 बसेसद्वारे दररोज 800 पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात. दररोज सुमारे 14 ते 15 हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण एसटीच्या बसेसद्वारे केली जाते. गरज भासल्यास आणखीन जादा बसेस एसटी कडून सोडण्यात येतील, असे एसटी प्रशासनाने कळविले आहे.
एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)