कोरोना रुग्णांना खाटा मिळत नाहीत हे वास्तव- देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1) कोरोना: खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड कागदावरच - देवेंद्र फडणवीस

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्यात येतील, असा निर्णय महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. पण हा निर्णय फक्त कागदावर आहे, रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीत, हे वास्तव आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

राज्यातील कोरोना व्हायरसची परिस्थिती आणि निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेलं नुकसान, या विषयांवर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.

"खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं. पण अजूनही रुग्णांना बेड्स मिळत नाहीत, ही वास्तविकता आहे," अशी टीका फडणवीस यांनी केली.

याच पत्रकार परिषदेतून फडणवीस यांनी उद्योजक राजीव बजाज यांच्या मोदी सरकारवरील टीकेलाही उत्तर दिले. "राजीव बजाज कोव्हिड-19 किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नाहीत तर ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी रिक्षा, गाड्या याबद्दल मत व्यक्त केलं असतं तर ते तज्ज्ञांचं मत ठरलं असतं," असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

2) चेंबूरमध्ये वायूगळती झाली नाही - मुंबई महापालिका

मुंबईतील चेंबूर परिसरातील काही कंपन्यांमधून वायूगळती झाल्याची तक्रार आज (रविवार) पहाटे काही स्थानिक रहिवाशांनी केली. त्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, अशी कुठल्याही प्रकारची वायूगळती झाली नसल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय. लोकमतनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मुंबई

"वायूगळती झाल्याची तक्रार चेंबूरमधील रहिवाशांकडून महापालिकेला प्राप्त झाली होती. पण याबाबत शोध घेतला असता कोणत्याच प्रकारची वायूगळती झाली नसल्याचं आढळलं," असं मुंबई महापालिकेने सांगितलं.

मुंबई महापालिकेने रहिवाशांच्या तक्रारीनंतर खबरदारी म्हणून चेंबुरसह घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई परिसरात अग्निशमन दलाच्या 17 तैनात केल्या होत्या.

"या भागात काही लोकांना दुर्गंध येत आहे. त्यांनी काही काळ तोंड आणि नाक कपड्यांच्या साहाय्याने झाकून ठेवावा, अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या असून नागरिकांनी घाबरू नये," असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं होतं.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विटरवरून लोकांना सांगितलं की, सर्व स्थिती नियंत्रणात आहे, गोंधळून जाऊ नका.

मुंबई महापालिकेनेही तातडीने पावलं उचलत परिसरातील HPCL, MGL, RCF कंपन्यांना, तसंच स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देऊन अग्निशमन दल घटनास्थळी रवाना केलं.

वायूगळतीबाबत शोध घेतल्यानंतर या भागात कोणत्याही प्रकारची वायूगळती झालेली नाही, असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

3) वादळग्रस्तांसाठी मदत जाहीर, घराचं पूर्ण नुकसान झाल्यास 95 हजार रुपये मिळणार

निसर्ग चक्रीवादळाने कोकणात प्रचंड नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. अनेक घरं, असंख्य झाडं पडली आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मिळणाऱ्या मदतीचं स्वरुप स्पष्ट केलं. दापोली इथं झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. टीव्ही 9 मराठीने याबाबत बातमी दिली आहे.

अंशतः नुकसान असल्यास 10,300 रुपये (कपडे -1800 रु, भांडी - 2000 रु, अन्य नुकसान - 6500) देण्यात येणार आहेत. त्यांना उद्यापासून तातडीने 5 हजार रुपये मदत स्वरूपात मिळेल. पूर्ण नुकसानीस 95 हजार रुपये मदतीची तरतूद करण्यात आली आहे. त्यांना उद्यापासून तातडीने 25 हजार रुपये मदत दिली जाईल.

फोटो स्रोत, PTI

मदत मिळवण्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. बँकाच गावात जाऊन मदतीचं वाटप करणार आहेत. रेशन मिळालेल्यांनाही पुन्हा रेशन देण्यात येणार असून त्यांना 5 किलो तांदूळ, 1 लिटर केरोसिन आणि 1 किलो डाळ मदत करण्यात येईल. त्याशिवाय अपंगांना समाज कल्याण विभागातून मदत करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

4) राज्यपालांच्या विरोधात विद्यार्थी संघटना एकवटल्या

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा विचार राज्य सरकार करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. यावरून सध्या वाद सुरू असतानाच विद्यार्थी संघटनांनी राज्यपाल हटावची मागणी केली आहे. ही बातमी ईटीव्ही भारत महाराष्ट्रने दिली आहे.

राज्यपाल राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत नसून ते राजकारण करत आहेत' असा आरोप एनएसयूआय, छात्रभारती संघटना, विद्यार्थी भारती, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. तसंच या विद्यार्थी संघटनांनी 'राज्यपाल हटाव'साठी समाजमाध्यमांवर विविध ह‌ॅशट‌ॅग वापरून कोश्यारी यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने मागील आठवड्यातच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहिलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ हटवून त्यांच्या ठिकाणी नवीन राज्यपालांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, छात्रभारती तसेच विद्यार्थी भारती आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसंच फेसबुकवर याबाबतचे हॅशटॅग चालवून राज्यपाल हटावाची मागणी करण्यात येत आहे.

5) केरळ हत्तीण प्रकरणाची पुनरावृत्ती, गायीला स्फोटके खायला घातली, जबडा फाटला

केरळमध्ये गर्भवती हत्तिणीला अननसमधून स्फोटके खायला दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एका गर्भवती गायीसोबत असा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत महाराष्ट्र टाईम्सने सविस्तर बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक फोटो

हिमाचल प्रदेशच्या विलासपुरात एका गायीला खाण्याच्या पदार्थामधून स्फोटके खायला देण्यात आली. ही स्फोटके गायीच्या जबड्यात फुटून गंभीर दुखापत झाली. या प्रकारानंतर गायीच्या मालकाने दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

झंडूता परिसरात एका शेतात चरत असताना, गर्भवती गायीच्या तोंडात स्फोट झाला आणि या स्फोटामुळे गायीचा जबडा तुटला. गायीच्या मालकाने या दुखापतीचा व्हीडिओ बनवून प्रशासनाकडे मदत मागितली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)