मुंबईत गॅसगळती नाहीच, अग्निशमन दलाची माहिती

मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक फोटो

मुंबईत कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना चक्रीवादळानंतर आता वायूगळती झाल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त झाली होती. पण याबाबत शोध घेतला असता कोणत्याही प्रकारची वायूगळती आढळली नसल्याची माहिती मुंबई फायर ब्रिगेडने दिली आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन यंत्रण सज्ज असल्याची माहिती फायर ब्रिगेडने दिली आहे.

मुंबईतील चेंबूर परिसरातील काही कंपन्यांमधून गॅस लिकेज झाल्याची तक्रार आज(रविवार) पहाटे काही स्थानिक रहिवाशांनी केली होती. यामुळे चेंबुरसह घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई परिसरात बृहन्मुंबई महापालिकेने सुरुवातीला अग्निशमन दलाच्या 13 आणि नंतर 4 गाड्या घटनास्थळी तैनात केल्या होत्या. त्याचप्रमाणे अंधेरी परिसरातूनही नागरिकांना अशी दुर्गंध येत असल्याची माहिती मिळाल्याचे फायर ब्रिगेडने म्हटले आहे.

रात्रीपासून नैसर्गिक वायूसदृश्य गळतीचा वास येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महानगरपालिका आणि अग्निशमन दल यांनी गळती शोधण्याचे काम सुरू केले.

"या भागात काही लोकांना दुर्गंध येत आहे. त्यांनी काही काळ तोंड आणि नाक कपड्यांच्या साहाय्याने झाकून ठेवावा, अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या असून नागरिकांनी घाबरू नये", असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं होतं.

मुंबई महापालिकेने तातडीने पावलं उचलंत परिसरातील HPCL, MGL, RCF कंपन्यांना तसंच स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देऊन अग्निशमन दल घटनास्थळी रवाना केलं.

गळतीबाबत शोध घेतल्यानंतर या भागात कोणत्याही प्रकारची वायूगळती झालेली नाही, असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मुंबई फायर ब्रिगेडचे मुख्य अधिकारी पी.एस. रहांदगळे यांनीही वायूगळती झाल्याचे आढळले नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्वीटरवर लोकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)