महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस - राजनाथ सिंह : #5मोठ्याबातम्या

राजनाथ

फोटो स्रोत, Getty Images

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सचा घेतलेला आढावा

1. महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे- राजनाथ सिंह

महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे अशी टीका केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. करोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते चांगलं नाही असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या हाती या सरकारची सूत्रं आहेत तरीही असं घडतं आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे, असंही सिंह यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्त्वात आहे का? महाराष्ट्र करोनाच्या बाबती आता चीनला मागे टाकेल अशी भीती व्यक्त होते आहे. या सगळ्याला सरकारची अकार्यक्षमता म्हणायचं का? असा प्रश्नही राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला. भाजपाच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

आम्ही करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. सहकार्य करतो आहोत. तरीही या सरकारला करोनाग्रस्तांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही ही बाब दुर्दैवी आहे, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या सरकारमध्ये काहीही समन्वय नाही. राजकारण समाजाच्या सेवेसाठी केली जाते. राजकारण हे स्वार्थासाठी केलं जात नाही असंही ते म्हणाले.

2. चांगली काम करणारी माणसं भाजपमध्येच असतात- फडणवीस

"शिवसेनेला ठाम विश्वास आहे की, सोनू सूद हे भाजपचे आहेत. या गोष्टीचा मला आनंदच वाटला. कारण, चांगलं काम करणारी माणसं भाजपमध्येच असतात," असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी हाणला आहे. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

कोणीही चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक झालंच पाहिजे. सोनू सूद यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सांगतो की, सूद यांनी स्वत:च्या हिंमतीवर काम केले आहे. आम्ही जलयुक्त शिवारचे काम करायचो तेव्हा 'नाम' संस्था आणि आमीर खान हे पण काम करायचे. तेव्हा आम्ही हेवादावा केला नाही. उलट त्यांना अधिक मदत कशी करता येईल हे बघितले. कारण ते सरकारच्या कामात मदत करत होते. त्यामुळे सोनू सूद यांच्या कामाचे स्वागत झाले पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.

3. पाकिस्तानात योगींचं कौतुक

लोकसंख्येनुसार भारतातलं सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशने करोना संसर्गावर ज्या पद्धतीने नियंत्रण मिळवलं, त्याचं पाकिस्तानातही कौतुक करण्यात आलं आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

उत्तर प्रदेशसारख्या सर्वांत मोठ्या राज्यात करोनाची परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळण्यात आली, त्याबाबत पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'चे संपादक फहाद हुसैन यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे.

'डॉन'चे संपादक फहाद हुसैन यांनी उत्तर प्रदेशचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान करोना हाताळण्यासाठी कसा संघर्ष करत आहे यावर हुसैन यांनी एक दिवस अगोदरच लेख लिहिला होता. त्यानंतर एका ट्वीटद्वारे त्यांनी यूपीचं कौतुक केलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

पाकिस्तान आणि उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. पण उत्तर प्रदेशने लॉकडाऊनचं कसं काटेकोर पालन केलं आणि पाकिस्तानला अपयश आलं, असं फहाद हुसैन म्हणाले.

हुसैन यांनी रविवारी सकाळी एक आलेख शेअर केला, ज्यात उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानच्या आकडेवारीची तुलना केली होती. या आलेखानुसार पाकिस्तानची लोकसंख्या २०.८ कोटी, तर यूपीची लोकसंख्या २२.५ कोटी आहे. पण भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमध्ये मृत्यू दर हा यूपीपेक्षा सात पट जास्त असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

4. पेट्रोल डिझेलवर नको, दारुवर कर वाढवा- मनसे

देशात पेट्रोल-डिझेलचे दर हे इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत. त्यात हा अधिभार नको. त्यामुळे महागाई वाढेल. सरकारने याऐवजी मद्यावरील कर वाढवावा हे मार्च महिन्यापासून सुचवित आहे कारण आधीच आपल्या राज्यात इंधनाचे दर इतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत आणि त्यात हा अधिभार, असं मनसेनं म्हटलं आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

इंधनावर अधिभार लादल्याने सगळ्याच गोष्टी महाग होतात. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात आणि महागाई भडकते त्यामुळे असा कर लादू नये अशी मागणही त्यांनी केली आहे.

5. तर चीनला धडा शिकवू-भारतीय व्यापारी संघटनेचा पवित्रा

चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे भारतातल्या छोट्या व्यापाऱ्यांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. चीनी मालावर बहिष्कार टाकणं भारतासाठी कठीण आहे असं चीनने म्हटलं होतं.

छोट्या व्यापाऱ्यांच्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं चीनच्या आव्हानाचा स्वीकार केला आहे. देशातील व्यापारी आणि नागरिक मिळून चीनी मालावर बहिष्कार टाकून ते यशस्वी करून दाखवू असा प्रतिइशारा भारताच्या व्यापाऱ्यांनी दिला आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकल होण्याचं आवाहन देशवासीयांना केलं होतं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने चीन त्रस्त झाला आहे. भारताचा रिटेल बाजार हातातून निसटत असल्याचं चीनला दिसत आहे. त्यामुळे वृत्तपत्रांच्या आधारे चीन अशी विधानं करत असल्याचं सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खडेलवाल यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)