'लॉकडाऊनच्या काळात पारले-जी बिस्कीटांची 80 ते 90% जास्त विक्री'

कृष्णराव बुद्ध

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन लागू करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगांना फटका बसला. मात्र, काही उद्योगांना याचा फायदाही झाला.

लॉकडाऊनमुळे मजूर आपल्या गावी परत गेल्याने त्याचाही फटका उद्योगांना बसलाय. कामगारांच्या तुटवड्यामुळे उद्योगावर 15 ते 20 टक्के परिणाम झाल्याचं पारले प्रॉडक्ट्स कंपनीने म्हटलंय.

गोळ्या-चॉकलेट्स, बिस्किटं आणि डाळींच्या व्यवसायात असणाऱ्या पारले प्रॉडक्ट्सचे मार्केटिंग मॅनेजर कृष्णराव बुद्ध यांची बीबीसीच्या प्रतिनिधी निधी राय यांनी घेतलेली ही मुलाखत...

प्रश्न :या काळात कंपनीच्या उत्पादनांची विक्री कशी झाली?

लॉकडाऊनच्या काळामध्ये पारले जी बिस्कीटांची 80 ते 90% जास्त विक्री झाली. यामुळे देशभरातला आमचा मार्केटचा हिस्सा 5%नी वाढल्याचा अंदाज आहे. सेवाभावी संस्थांनी आणि राज्य सरकारांनी या बिस्कीटांची घाऊक खरेदी केल्याने ही वाढ झाली. अजूनही प्रत्यक्ष आकडेवारी आमच्याकडे आलेली नाही. पण या आकडेवारीवरून अधिक स्पष्ट अंदाज येईल. पण सध्यातरी उत्पादन पुन्हा सुरू करणं हेच आमच्यापुढचं मोठं आव्हान आहे.

प्रश्न - कामगारांच्या तुटवड्याचा तुमच्या उद्योगावर किती परिणाम झालाय?

हो, कामगारांची कमतरता असल्याने उद्योगावर 15 ते 20% परिणाम झालाय. सध्याच्या घडीला आमच्यासाठी हे नक्कीच मोठं आव्हान आहे.

फोटो स्रोत, www.parleproducts.com

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

प्रश्न - लॉकडाऊनमुळे लोक सध्या घरी आहेत आणि रोजगाराच्या संधी कमी झाल्याने लोकांनी खर्चही कमी केले आहेत. याचा परिणाम कसा झालाय?

लॉकडाऊनमुळे ग्राहकांना घरी तयार केलेले पदार्थांचच सेवन करावं लागलं. यामुळे पॅकेज्ड फूड म्हणजेच पॅकबंद अन्नपदार्थांसाठीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. हल्ली डाळ - तांदूळ वा चपाती - भाजीच्या आहाराच्या तुलने लहान मुलं आणि अगदी मोठ्यांचाही कल जंक फूड ऑर्डर करण्याकडे असतो. घरच्या जेवणासाठीचे पर्याय ग्राहक शोधत आहेत. आणि यामुळे बिस्किटं, चटपटीत नाश्ता, नूडल्स किंवा ड्रायफ्रूट्सचा पर्याय निवडला जातो.

प्रश्न - पुढच्या तीन महिन्यांमध्ये मागणी कशी असण्याचा अंदाज आहे?

कामगार नसल्याने आणि स्थानिक नियमांमुळे आम्हाला बाजारपेठेच्या मोठ्या मागणीसाठीचा पुरवठा करता आलेला नाही. अनेकांनी भीतीपोटी खरेदी करून साठा करून ठेवल्याने सुपरमार्केटमधली शेल्फ्स रिकामी झाली होती.

प्रश्न - लॉकडाऊनचा काय परिणाम झालेला दिसतोय आणि गोष्टी पूर्ववत व्हायला किती काळ लागेल असं तुम्हाला वाटतं?

लॉकडाऊनचा गंभीर आहे आणि जगातल्या सगळ्यांवरचा हा परिणाम झाल्याचं मला वाटतंय. अन्न, डिसइन्फेक्टंट्स, हँडवॉश अशा आवश्यक गोष्टींची चांगली विक्री झालेली आहे. पण रिअल इस्टेट, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी आणि कपडे उद्योगातल्या कंपन्यांना मोठा फटका बसलेला आहे. मला वाटतं गोष्टी पूर्वपदावर यायला आणि झालेल्या तोट्यातून सावरायला किमान सहा महिने लागतील. काही लोकं खर्च करतील पण इतरजण मात्र पुढचे तीन महिने तरी बाहेर पडण्याआधी विचार करतील.

प्रश्न - वस्तूंच्या किंमतींबद्दल काय सांगाल?

सध्यातरी किंमतींमध्ये वाढ झालेली नाही. तेल किंवा इंधन, साखर, गव्हाची कणीक याच्या किंमतींमध्येही वाढ झालेली नाही. सध्यातरी उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा कंपनीचा विचार नाही.

फोटो स्रोत, Twitter/@officialparleg

फोटो कॅप्शन,

पारले कंपनीकडून लॉकडाऊनदरम्यान मदतही करण्यात आली.

प्रश्न - सरकारने केलेल्या उपाययोजनांचा आतापर्यंत काही फायदा झाला का?

सरकारे आम्हाला काही प्रमाणात मदत केली. आम्ही 50% कर्मचाऱ्यांच्या मदतीने उत्पादन करावं असं सरकारचं म्हणणं आहे. यामुळे आम्ही उत्पादन तर करू शकतोय. पण याचा एकूण उत्पादन क्षमेतवर परिणाम मात्र झालेला आहे. कारण आमच्याकडे फक्त 50% मनुष्यबळ आहे.

प्रश्न - भविष्यामध्ये वस्तूंसाठीची मागणी वाढावी म्हणून सरकारने काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?

इंधन, तेल, पीठ, साखरेसारख्या वस्तूंच्या किंमती वाढणार नाहीत याची सरकारने काळजी घ्यावी आणि त्यावर नियंत्रण ठेवावं. यासोबतच खर्च करण्यासाठी लोकांकडे पैसा यावा आणि त्यातून पर्यायाने अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी होऊन ती सावरावी यासाठी सरकारने रोजगाराच्या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)