अरविंद बनसोड यांच्या मृत्यूवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप का होत आहेत?

  • प्रवीण मुधोळकर
  • बीबीसी मराठीसाठी
अरविंद बनसोड, नागपूर
फोटो कॅप्शन,

अरविंद बनसोड

नागपूर जिल्ह्यातील पिंपळधरा गावातील दलित सामाजिक कार्यकर्ते अरविंद बनसोड यांच्या मृत्यू प्रकरणावरून दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातील आंबेडकरवादी संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. आंबेडकर यांनी अरविंद बनसोड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणातील आरोपी मयुर ऊर्फ मिथिलेश उंबरकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे. शिवाय हे प्रकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदार संघातील असल्याने आरोपी देशमुख यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणी सोशल मिडियावर #justice_for_arvind_bansod आणि #DalitLivesMatter या हॅशटॅगच्या माध्यमातून लोक व्यक्त होताहेत.नागपूर पासून साधारणत: 70 किलोमीटर अंतरावरील थडीपवनी गावातील 27 मे रोजीची ही घटना आहे. युपीएसएसी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे 32 वर्षीय अरविंद बनसोड हे पिपळखुटा आणि थडूपवनी भागात सामाजिक कार्यातही सक्रिय होते. शिवाय ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे कामही करायचे. हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

त्या दिवशी काय झालं?

घटनेच्या दिवशी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पिपळखुटा गावातून अरविंद आणि त्यांचा मित्र गजानन राऊत हे दोघे बाईकने तीन किलोमीटर अंतरावरील थडीपवनी गावात बँकेच्या कामानिमित्त गेले.

बॅंकेचं काम आटोपल्यानंतर दोघेही गॅस एजन्सीचा फोन नंबर घेण्यासाठी बँकेसमोरील ऊर्जा गॅस एजन्सी समोर गेले. फोन नंबर घेण्यासाठी एजन्सीच्या फलकाचा अरविंद बनसोड यांनी आपल्या मोबाईल फोनने फोटो घेतला. याच क्षणी गॅस एजन्सीचे मालक मयूर ऊर्फ मिथिलेश उंबरकर यांनी अरविंद आणि गजानन यांना शिविगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. गजानन यांनी मिथिलेश यांना अरविंद बनसोड फोन नंबरसाठी फोटो काढतोय असं सांगितल्यावर त्याचा राग अनावर झाला. हाच तो अरविंद बनसोड का? खूप नाव ऐकले होतं, राजकारण करतो काय असं सांगत अर्वाच्च भाषेत त्यांनी शिवीगाळ केली.

फोटो कॅप्शन,

अरविंदची खोली

आरोपी मयूर इथेच थांबले नाही तर त्यांनी थांब अरविंद बनसोड "तुझी नेतागिरी उतरवतो" असे सांगत पुन्हा वाद वाढवायला सुरुवात केली, असं गजानन यांचं म्हणणं आहे. तेवढ्यात गजानन राऊत हे आपल्या दुचाकीत पेट्रोल भरायला शेजारील पेट्रोल पंपावर निघून गेले असा दावा त्याने केला. दरम्यान मयुर उंबरकर यांनी गॅस एजन्सी आणि शेजारील गोदामातून चार ते पाच लोकांना बोलावून अरविंद बनसोड यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप गजानन राऊत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केला आहे. दरम्यान अरविंद बनसोड यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.या संपूर्ण घटनेनंतर काही वेळात म्हणजेच दुपारी साडेबारा वाजता गॅस एजन्सीच्या समोर अरविंद बनसोड बेशुद्धावस्थेत सापडले. तेवढ्यातच मयूर उंबरकर आपल्या कर्मचाऱ्यांसह तिथं पोहोचले. मयूर यांनी अत्यवस्थ अरविंद यांना आपल्या गाडीत घातले आणि सोबतचे कर्मचारीही घेतले. तेवढ्यात दुचाकीमध्ये पेट्रोल भरून गजानन राऊत तिथं पोहचले. गजानन यांना कारमध्ये न घेताच मयूर अत्यवस्थ अरविंद यांना घेऊन जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. कुणालाही न कळविता मयूर पुढे अरविंद यांना घेऊन नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घेऊन गेले. एकीकडे हे सर्व सुरु असतांना संध्याकाळपर्यंत बनसोड कुटुंबीय अरविंदचा शोध घेत होते. शेवटी जलालखेडा पोलीस ठाण्यात गेल्यावर अरविंद यांना नागपुरात मेयो रुग्णालयात दाखल केल्याच सांगण्यात आलं, असं घटनेचे प्रत्यक्षदर्शी गजानन राऊत यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

आरोपींचं म्हणणं काय?

या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते बंडोपंत उंबरकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

फोटो कॅप्शन,

परिसर

आरोपीचे वडील बंडोपंत उंबरकर म्हणाले, "माझा मुलगा आणि मृत अरविंद बनसोड यांची आधी कुठलीही फारशी ओळख नव्हती. अरविंद हा पिंपळखुट्यात राहायचा तर आम्ही थडिपवनी गावात राहतो. 27 मे रोजी आमच्या गॅस एजन्सीत अरविंद आल्याच मला कळलं. माझा मुलगा पंचायत समितीचा सदस्य आहे त्यामुळे अनेक लोक गॅस एजन्सीत येत असतात. लोकप्रतिनीधी असल्या कारणाने अरविंद गॅस एजन्सीचा फोटो का काढतोय अस माझ्या मुलाने विचारले. यावरूनच हा वाद सुरु झाला." "माझ्या मुलाने किंवा त्यांच्या सोबत गॅस एजन्सीत असणा-यांनी अरविंदला मारहाण केलेली नाही. आता अरविंदच्या वादानंतर त्याने विष का प्राषण केले हे सांगता येणार नाही" असं उंबरकर म्हणाले. "त्या दिवशी जेव्हा अरविंद आणि त्याचा मित्र गजानन राऊत गॅस एजन्सीत आले आणि नंतर वाद झाल्यानंतर अरविंद दुसरीकडे तर त्याचा मित्र गजानन अरविंदच्या भावाला आणण्यासाठी पिंपळखुट्यात गेला होता. याच वेळात अरविंदने विष विकत घेतले आणि ते प्राषन केले. त्याच अवस्थेत तो आमच्या ऊर्जा गॅस एजन्सी समोर आला आणि अत्यवस्थ झाला. आता अशा परिस्थितीत माझा मुलगा मयुर याने क्षणाचाही विलंब न लावता त्याला आपल्या कार मध्ये बसवून दवाखान्यात नेले आणि भरती केले यात त्याचा काय दोष" असा सवाल उंबरकर यांनी विचारला. शिवाय या प्रकरणाला जातीयवादाची जोड देऊ नका ह्या प्रकरणाचा जातीयवादाशी काही संबध नाही असे उंबरकर म्हणाले. मी राजकारणात असल्याने लोकांनी ह्या प्रकरणात राजकारण आणल्याचेही उंबरकर म्हणाले. ही घटना घडल्यावर पोलिसांवर कुठलाही दबाव आपण आणला नाही किंबहुना घटनेच्या दिवसापासून दोन दिवस नंतरपर्यंत आपण थडीपवनी गावात नव्हतो असंही ते उ म्हणाले. आमच्या गावात कुठल्याही प्रकारे असा जातीयवाद नाही आणि असा रंगही या प्रकरणाने देण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन त्यांनी केलं.

अरविंद बनसोड यांच्या कुटुंबियांचं काय म्हणणं?

अरविंद बनसोड यांच्या पिंपळखुटा गावात जाऊन त्यांच्या कुटुंबियांशी बीबीसी मराठीने संपर्क केला. काही वर्षापुर्वी अरविंद यांच्या आईचं निधन झाल. वडिल दशरथ बनसोड आणि आजी लक्ष्मीबाई अरविंद यांच्या आठवणी सांगू लागले. यूपीएससी आणि एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करणारे अरविंद सदैव आपल्या अभ्यासातच राहत, असं दशरथ बनसोड सांगत होते.

फोटो कॅप्शन,

अरविंद बनसोड यांचे कुटुंबीय

आपण चार एकर शेती विकली आणि त्याला स्पर्धा परिक्षांची पुस्तकं आणि अभ्यासाच्या खर्चासाठी मदत केली. पण २७ तारखेच्या घटनेनंतर आम्ही खचून गेलो आहोत अरविंदचा गुन्हा काय होता, असा प्रश्न दशरथ बनसोड विचारत होते. आरोपी उंबरकर यांनी जातीवाचक शिविगाळ करत अरविंदला मारहाण केली असंही दशरथ राऊत म्हणाले.घटनेच्या दिवशी मी जलालखेडा पोलिस ठाण्यात अरविंदला शोधण्यासाठी विनंती करायला गेलो होतो. तेव्हा या प्रकरणात आरोपी मयुरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांना केली होती. पण पोलिसांनी 'अरविंद मेला काय'? तो मेल्यावर गुन्हा दाखल करू असे उत्तर दिल्याचं दशरथ यांनी सांगितलं. पोलिसांनी अरविंदला व्हेंटिलेटर लावल्यावर दवाखान्यात धाव घेतली तो पर्यंत त्याचा जबाब का घेण्यात आला नाही हा प्रश्नही अनुत्तरीत असल्याच दशरथ बनसोड म्हणाले. आरोपींना तात्काळ कडक शिक्षा द्यावी शिवाय आरोपी मयुर आणि त्याचे वडील बंडोपंत उंबरकर यांना राजकारणात कुठल्याही पदावर ठेऊ नये, अशी मागणीही बनसोड यांनी केली.

फोटो कॅप्शन,

गॅस एजन्सी

आरोपी मयुर उंबरकरला अजून अटक झालेली नाही आणि तो अटकपूर्व जामिनावर सुटलाय असे कसे असा सवालही दशरथ बनसोड यांनी उपस्थित केलाय.आरोपी मयुर याने परस्पर अरविंदला दवाखान्यात नेण्याएवजी आम्हाला जर सांगितले असते तर आम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं असतं आणि त्याचा जीव वाचविला असता असं अविनाशची आजी लक्ष्मीबाई म्हणाल्या.

कुटुंबीय आणि आंबेडकरवादी संघटनांचे आक्षेप

1) अत्यवस्थ अरविंद यांना कुणालाही न सांगता आपल्या गाडीत टाकून आरोपी मयुर उंबरकर यांनी दवाखान्यात परस्पर का नेले, नेमके याच वेळेत काय झाले?2) आरोपी मयुर यांनी अरविंद यांच्या पोटात आढळलेल्या कीटकनाशकाची बाटली अरविंद यांना दवाखान्यात नेतांना गाडीत सोबत का घेतली?

3) अरविंद यांना व्हेंटिलेटर लावेपर्यंत पोलिसांनी त्यांचा जबाब का नोंदविला नाही?

4) आरोपी मयुर उंबरकर यांना अटकपूर्व जामिन कसा काय मिळाला पोलिसांनी त्याला विरोध का केला नाही?

5) मयुर उंबरकर यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही? त्यांना आरोपी का करण्यात आलं नाही?

6) स्थानिक जलालखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक तसंच तपास करणाऱ्या पोलिसांनी तपास योग्य केला का, याचा तपास करावा.

7) पोलिसांचा तपास पोलिसच कसे करणार म्हणून सीबीआयकडे हा तपास सोपवावा.

8) या घटनेमुळे अरविंद बनसोड यांच्या कुटुंबियांचा आधार गेल्याने त्यांच्या वारसापैकी एकाला नोकरी द्यावी.

9) आरोपी मयुर ऊर्फ मिथिलेश उंबरकर यांच्यावर कारवाई करून त्याचे पंचायत समिती सदस्यपद रद्द करावे.

पोलिसांचे म्हणणं काय?

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मते अरविंद यांचा मृत्यु हा कीटकनाशकांच्या सेवनामुळे झालाय. तसं पोस्टमार्टमच्या अहवालात नमूद केले असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणात आरोपी मयुर ऊर्फ मिथिलेश उंबरकर यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा दाखल केल्याचं ते म्हणाले.आरोपी मयुर उंबरकर यांना न्यायालयाने अटकपुर्व जामीन दिलाय असे सांगत या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि घटनेच्या वेळी अरविंद सोबत असणाऱ्या गजानन राऊत याचा जबाब न्यायाधीशांनी घेतल्याचं पोलीस अधीक्षक म्हणाले. पण हे प्रकरण आत्महत्येचे आहे का, यावर सध्या यावर काही भाष्य करता येणार नाही शिवाय तपास सुरु असल्याचं ते म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर या प्रकरणात आरोप का?

या प्रकरणातील आरोपी मयुर उर्फ मिथिलेश उंबरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीचे सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंडोपंत उंबरकर यांचे पुत्र आहेत.गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुळ गाव वडविहिरा हे या घटनेच्या थडीपवनी गावाजवळच आहे. बंडोपंत उंबरकर हे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

अरविंद बनसोड या तरूणाच्या मृत्यूची चौकशी पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणेच होणार असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बीबीसी मराठीला दिली. अरविंद बनसोड यांच्या मृत्युचा तपास आधी पोलीस निरीक्षक जलालखेडा करीत होते. मात्र या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेवून आणि सखोल चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यासाठी हा तपास वरिष्ठ स्तरावरील उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल यांच्याकडे दिला आहे. या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही, असं ते म्हणाले.यआरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट नुसार कारवाईचे आदेशनागपूरचे पालकमंत्री डाँ नितीन राऊत यांनी अरविंद बनसोड यांच्या मृत्युबद्दल काल सायंकाळी नागपूर पोलीस अधीक्षक, उपविभागिय पोलिस अधिकारी आणि तपास अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. आता या प्रकरणाचा तपास स्वतः उपविभागीय पोलिस अधिकार्‍याने करावा आणि आता आरोपींवर 'अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातींवरील अत्याचार (प्रतिबंध) कायदा १९८९' अॅट्रॉसिटी अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा असे स्पष्ट आदेश दिल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)