कोरोना व्हायरस : धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांच्यासह या 7 नेत्यांना कोव्हिड-19ची लागण

फोटो स्रोत, facebook
धारावीच्या झोपडपट्टीत राहणारे गरीब असो वा राजमहालांमध्ये राहणारे राजकुमार, कोरोना व्हायरस कुणाशीही भेदभाव करत नाही, हे सत्य आता जगाला कळून चुकलंय.
कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून मोठे जागतिक नेतेसुद्धा कोरोनाग्रस्त आढळले आहेत. अगदी भारतातही काही नेतेमंडळी पॉझिटिव्ह आढळली आहेत.
1. धनंजय मुंडे
11 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट झालं. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली.
त्याविषयीची अधिक माहिती तुम्ही इथं वाचू शकता - धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण, मुंबईतील रुग्णालयात करणार दाखल
2. जे. अन्बळगन
10 जूनला तामिळनाडूच्या द्रमुकचे नेते जे. अन्बळगन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 'श्वसनाचा त्रास' होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना आठवडाभरापूर्वी चेन्नईच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
फोटो स्रोत, J Anbazhagan Facebook page
द्रमुक नेते जे. अन्बळगन
त्यानंतर त्यांची "तब्येत खालावल्यावर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, मात्र त्यांचा लढा अपयशी ठरला," असं हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटल आहे.
3. ज्योतिरादित्या शिंदे
9 जून रोजी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्या शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांना दक्षिण दिल्लीस्थित साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं असून, तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत.
वाचा संपूर्ण बातमी इथे - ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोनाची लागण, दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
या यादीत आणखी कोण कोण आहेत? एक नजर टाकू या...
4. जितेंद्र आव्हाड
सर्वांत आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोनाबाधित असल्याचं लक्षात आलं. त्यांच्यावर मुंबईतल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यावर ते पूर्णपणे बरे झाले.
त्यांच्या या लढ्याविषयी त्यांनी बीबीसी मराठीला सर्वप्रथम सांगितलं होतं - पाहा ही मुलाखत -
5. अशोक चव्हाण
त्यानंतर काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेसुद्धा कोरोनाने बाधित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना नांदेडहून एका विशेष अँब्युलन्सने मुंबईला हलवण्यात आलं होतं. त्यांच्यावरही उपचार झाले असून त्यांनीही कोरोनावर अशी मात केली आहे.
त्यांनी त्यांच्या या लढ्याविषयी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सविस्तरपणे सांगितलं आहे.
6. शुजीत बोस
फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पश्चिम बंगालचे अग्निशमन आणि आप्तकालीन सेवा मंत्री शुजीत बोस आणि त्यांच्या पत्नीला कोरोना झाल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झालं होतं.
7. सतपाल सिंह
तर उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल सिंह आणि त्यांच्या पत्नी तसंच उत्तराखंडच्या माजी मंत्री अमृता रावत यादेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान मेच्या अखेरीस स्पष्ट झालं होतं.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
जगभरात
जगभरात अनेक नेते, राजकीय पुढारी आणि राजघराण्यातले सदस्यही कोरोना विषाणूने बाधित आढळले आहेत. एक नजर टाकू या या घटनाक्रमावर...
फोटो स्रोत, Getty Images
30 मे : बेल्जियमचे राजे फिलिप यांचे पुतणे राजकुमार जोकिम हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 28 वर्षांचे जोकिम हे काही दिवसांपूर्वीच इंटर्नशिपसाठी स्पेनमध्ये गेले होतं.
देशात सर्वत्र लॉकडाऊन लागू असताना 15 पेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंधन होतं. त्यातच ते तिथे एका पार्टीत गेले, जिथे सुमारे 27 लोक असल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलं. त्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं निदान झालं. हे समजताच स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले.
फोटो स्रोत, AFP
19 मे : आफ्रिका खंडात कोरोनाचा उद्रेक हा सध्या आशिया आणि युरोपपेक्षा जरा कमी राहिला आहे.
याच खंडातल्या दक्षिण सुदान या देशाचे उपराष्ट्राध्यक्ष रीक मचार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यासोबतच त्याच्या पत्नी आणि देशाच्या संरक्षण मंत्री अँजेलिना टेनी यासुद्धा कोरोनाग्रस्त आढळल्या.
मचार हे स्वतः दक्षिण सुदानच्या कोरोनाविरोधी टास्क फोर्समध्ये होते. आणि त्यांच्यासोबत या टास्कफोर्समधले इतर काही सदस्यही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ही अख्खी टीमच बदलण्यात आली.
फोटो स्रोत, Reuters
30 एप्रिल : जानेवारीमध्ये रशियाच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले मिखैल मिशुस्तिन हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
रशियन टीव्हीवर प्रसारित एका व्हीडिओ कॉलदरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सांगितलं की, "मला आत्ताच कळलं की मी घेतलेली कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे."
"मी आधीपासूनच सांगत होतो, की जे तुम्हाला होऊ शकतं ते कुणालाही होऊ शकतं," असं पुतीन यांनी मिशुस्तिन यांना सांगितलं.
ते दवाखान्यात भरती असताना त्यांचा कार्यभार उपपंतप्रधान आंद्रे बेलुसूव्ह यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
फोटो स्रोत, Getty Images
27 मार्च : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं लक्षात आलं. तापासह काही लक्षणं कायम राहिल्यामुळे त्यांना 5 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 7 एप्रिल रोजी त्यांना ICU मध्ये हलवण्यात आलं होतं.
त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर अखेर 13 एप्रिलला त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला.
फोटो स्रोत, Reuters
25 मार्च : राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
71 वर्षांचे चार्ल्स यांच्यात सौम्य लक्षणं आढळल्याचं डॉक्टरांनी म्हटलं, "मात्र त्यांची प्रकृती उत्तम आहे," असंही क्लॅरेन्स हाऊसने एका निवेदनात स्पष्ट केलं.
त्यांच्या पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल कॉमिला पार्कर यांचीही चाचणी घेण्यात आली होती, मात्र त्यांना विषाणूची लागण झालेली नाही.
फोटो स्रोत, Reuters
19 मार्च : मोनॅकोच्या राजघराण्याचे प्रिन्स अलबर्ट द्वितीय हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, असं एक निवेदन फ्रेंच मीडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आलं.
फोटो स्रोत, Getty Images
13 मार्च : ऑस्ट्रेलियाचे केंद्रीय गृहमंत्री पीटर डुट्टाँ हे कोव्हिड-19 पॉझिटिव्ह असल्याचं जाहीर झालं. त्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा 'जरा ताप आणि घशात खवखव' जाणवत होती, असं ते म्हणाले.
11 मार्च : युनायटेड किंगडमच्या आरोग्य मंत्री आणि हुजूर पक्षाच्या खासदार नदीन डॉरीस या कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळल्या.
युकेच्या आरोग्य मंत्रालयानुसार डॉरीस यांनी तेव्हा काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिथे तेव्हा पंतप्रधान बोरीस जॉन्सन हेसुद्धा हजर होते.
फोटो स्रोत, Reuters
25 फेब्रुवारी : इराणमध्ये घडलेला हा प्रकार जरा धक्कादायक होता. एका पत्रकार परिषदेत इराणचे आरोग्य मंत्री कोरोना व्हायरसची लक्षणं समजावून सांगत होते, स्वतःची काळजी घेण्यास सांगत होते.
तेव्हा त्यांच्याच बाजूला उभे असलेले त्यांचे कनिष्ठ सहकारी आणि देशाचे आरोग्य उपमंत्री सतत कपाळावरचा घाम पुसत होते. नंतर चाचणी घेतली असता हे मंत्री इराज हारिर्ची कोरोना पॉझिटिव्ह निघाले.
याचदरम्यान चीनच्या बाहेर कोरोनाचा मोठा उद्रेक इराणमध्ये होत होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)