देवेंद्र फडणवीस करत असलेली निसर्ग चक्रीवादळ आणि कोल्हापूर-सांगली पूर यांची तुलना कितपत शक्य?

  • गुलशनकुमार वनकर
  • बीबीसी मराठी
देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संकटाच्या काळात आणखी भर पडलीय ती निसर्ग चक्रीवादळामुळे. कोकण आणि किनारपट्टीच्या भागात घरं, शेती, फळबागांचं झालेलं नुकसान मोठं आहे.

राज्य सरकारने अद्याप नुकसानभरपाई जाहीर केलेली नाही, मात्र तातडीची मदत म्हणून रायगडला 100 कोटी, रत्नागिरीला 75 कोटी आणि सिंधुदुर्गाला 25 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केलीय.

त्याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी "चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रचलित दरापेक्षा वाढीव मदत मिळणार" असल्याचं जाहीर केलं. NDRFच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पडझड झालेल्या घरांसाठी ठरलेली 95 हजार एवढी रक्कम देण्याऐवजी आता दीड लाख रुपये मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलं.

तर बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी 50 हजार रुपयांप्रमाणे मदत मिळेल, असंही पवार म्हणाले.

पण सरकारने उचललेली पावलं अपुरी असल्याची टीका भाजपने केली आहे. "भाजपने कोल्हापूर, सांगलीची पूरपरिस्थिती यशस्वीरीत्या हाताळली होती. आम्हाला नैसर्गिक आपत्तीचा अनुभव आहे. पण कोकणातली परिस्थिती हाताळण्यात सरकार कमी पडतंय," असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

गुरुवारी नुकसान झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतरही फडणवीस यांनी श्रीवर्धनमध्ये एक पत्रकार परिषद घेत म्हटलं, "कोल्हापूर/सांगली पुराच्यावेळी कपडे आणि भांड्यासाठी 7500 रुपये दिले होते. तात्पुरत्या निवार्‍यासाठी 36 हजार आणि 24 हजार असे एकरकमी भाडे देण्याचा निर्णय केला होता. मला तुलना करायची नाही. पण, ठोस निर्णय घेण्याची ही वेळ आहे."

राज्यावरचं कोरोनाचं संकट असो वा आत्ता कोकणात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचं, ठाकरे सरकारने या संकटांवर उचललेल्या पावलांवर विरोधीपक्ष सातत्याने टीका करतोय. त्यात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर-सांगलीमध्ये आलेल्या महापुराचं उदाहरण दिलं जात आहे.

पण अशा दोन वेगवेगळ्या काळांमध्ये, भागांमध्ये आणि परिस्थितींमध्ये घडलेल्या नैसर्गिक संकटांची तुलना करणं शक्य आहे का? त्या संकटांना तोंड देताना कोणत्या सरकारने अधिक चांगलं काम केलं, याचं मोजमाप कोण आणि कसं करणार?

कोकणात सध्या काय परिस्थिती?

कोकण किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळामुळे भलेमोठे वृक्ष उन्मळून पडलेत, माडा-सुपारीच्या बागा तुटून पडल्या आहे, वाऱ्यानं फेकल्या गेलेल्या आंब्यांचा सडा पडला आहे. वीजपुरवठा खंडित झाला आहे, संपर्काची साधनं बंद पडली आहेत आणि हजारो घरांवरचे पत्रे-कौलं उडून गेल्यामुळे लोकांच्या डोक्यावरचं छप्पर अक्षरशः हरपलं आहे.

याविषयीचा सविस्तर ग्राऊंड रिपोर्ट तुम्ही इथे वाचू शकता -

फोटो स्रोत, Sharad Badhe

झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणचा दौरा केला. त्यानंतर याच आठवड्यात या भागातली पाहणी करून परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गुरुवारी मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली.

"या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्यास प्राधान्य देण्यात आले. सर्व भागातील नुकसान पाहता प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामे करून त्याची आकडेवारी घ्यायला हवी. यात सर्वप्रथम विद्युत आणि पाणी पुरवठा कसा सुरळीत करता येईल यावर भर द्यायला हवा," अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.

तसंच, या भागातील फळबागांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची बाबही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचं सांगितलं.

याशिवाय, राज्य सरकार यापुढे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना अधिक सक्षमपणे मिळवण्यासाठी एक यंत्रणा उभी करत असल्याचं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

"जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे. यासाठी सैन्य आणि पोलीस दलांमधल्या निवृत्त अधिकाऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. अशा परिस्थितीत त्यांचा उपयोग कसा करून घेता येईल, हा विचार आम्ही करत आहोत," असं त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

पण चक्रीवादळ विरुद्ध महापुराची तुलना?

मुळातच निसर्ग चक्रीवादळ आणि कोल्हापूर-सांगलीचा पूर, या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. गेल्या वर्षीचा महापूर हा अभूतपूर्वच असा होताच, पण आता कोरोना आणि त्यात हे चक्रीवादळ, अशी ही तुलना होऊ शकत नाही, असं 'दिव्य मराठी'चे मुख्य संपादक संजय आवटे यांना वाटतं.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

तसंच फडणवीस म्हणतायत त्या प्रमाणे "राज्य सरकार अपयशी ठरलं, असं काही इतक्या लवकर म्हणण्याची गरज नाहीय, कारण आत्ताशी कुठे मंत्र्यांचे दौरे होतायत, नुकसानीचे पंचनामे होतायत. काय काय आणखी करणं शक्य आहे, त्याची चाचपणी केली जात आहे," असं ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ मंदार वैद्य यांच्या मतेसुद्धा या दोन्ही संकटांची तुलना नाही होऊ शकत, कारण दोन्हीचे परिपेक्ष, परिणाम आणि बाधितांची परिस्थिती वेगवेगळी आहे. "सामान्य आणि गरीब माणूस दोन्हीकडे भरडला गेला, हेच एक साम्य," ते सांगतात.

आपत्ती व्यवस्थापन तसंच निवारण करण्याचा प्रदीर्घ आणि आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले वैद्य यांनी 2019चा पूर आणि आत्ताच्या चक्रीवादळाने झालेलं नुकसान जवळून पाहिलं आहे. त्यामुळे होणाऱ्या सामाजिक हानीचं सुद्धा ते बीबीसी मराठीशी बोलताना सविस्तर विश्लेषण करतात.

"गेल्या वर्षी कोल्हापूर-सांगली सारख्या भागांत आधी ऑगस्टमध्ये पाऊस आणि पूर आला. लोक त्यातून सावरून, आपल्या घरांची डागडुजी करून स्थिरस्थावर होऊच लागले होते की आणखी एक संकट त्यांच्यावर कोसळलं, ते म्हणजे अतिवृष्टीचं. याचा फटका तर संपूर्ण महाराष्ट्रालाच बसला, पण पूरग्रस्तांवर हे संकट दुसऱ्यांदा आलं.

फोटो स्रोत, Getty Images

"त्यातून लोक सावरतच होते तर आता लॉकडाऊन सुरू झालं. त्यामुळे आजही अनेक कुटुंब माळावर राहतात, पडक्या घरांमध्ये राहतात, कारण त्यांना दुरुस्तीची पुरेशी साधनं उपलब्ध झालेली नाहीत.

कोल्हापूरचं उदाहरण घ्यायचं झालं तर, पूरग्रस्तांपैकी बहुतांश लोक हे नदीकाठी राहणारे ऊसतोड कामगार तसंच दलित समुदायांमधून येतात. सरकारने तेव्हा जाहीर केलेल्या अनेक गोष्टी होत्या की आपण आंतरराष्ट्रीय बँकांकडून निधी आणू, इत्यादी. पण खरं तर त्यांच्या पुनर्वसनाचं पुढे काहीच झालं नाही. त्यामुळे एकप्रकारे कोल्हापूरची पूरपरिस्थिती ओसरली, मात्र तिथली दाहकता लोकांना आजही जाणवत आहे."

दुसरीकडे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वांत जास्त नुकसान श्रीवर्धन, रोहा आणि माणगाव या गावांमध्ये झालंय. इथल्या आदिवासी-बहुल भागांमध्ये साधेपणाने बांधलेल्या कच्च्या घरांचं मोठं नुकसान झाल्याचं वैद्य सांगतात.

"लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक अन्नपुरवठा विभागाने चांगलं काम केलं होतं, त्यामुळे इथल्या आदिवासींनी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून घरांमध्ये बऱ्यापैकी धान्य साठवून ठेवलं होतं. पण आता तेही सारं नासून गेलंय.

या संपूर्ण नुकसानीचा अंदाज अजूनही पूर्णपणे आलेला नाहीय, पण याकडे आत्ताच लक्ष दिलं नाही तर पुढे दीर्घकालीन परिणाम दिसतील, जसे आजही कोल्हापूर-सांगलीत दिसत आहेत," असंही ते सांगतात.

कोणत्या सरकारने संकट कसं हाताळलं?

"जेव्हा निसर्ग चक्रीवादळ येऊ घातलं होतं, तेव्हाच (ठाकरे) सरकारने पुरेशी खबरदारी घेतली होती. संभाव्य हानी लक्षात घेता सरकारने पूर्णपणे तयारी केली होती, त्यामुळे हानी तुलनेनं कमी झाली. म्हणून या सरकारने परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली, यात काही शंका नाही," असं संजय आवटेंना वाटतं.

काही महिन्यांपूर्वीच जुळवाजुळव करून अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारपुढे कोरोनारूपात आधीच एक मोठं आव्हान येऊन उभं ठाकलं. त्यामुळे मंत्रालय ते जिल्हास्तरीय प्रशासन अशी संपर्कव्यवस्था पूर्वीपासूनच कार्यान्वित होती. त्याचाही इथे काही प्रमाणात फायदा झाला.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जे वेळोवेळी जनतेशी तसंच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी थेट सोशल मीडियाद्वारे संवाद साधत होतेच, त्यांनी हे चक्रीवादळ धडकण्याच्या आदल्या रात्रीसुद्धा राज्याला उद्देशून भाषण केल्यामुळे आपत्तीत काय करावे, काय नाही, हे लोकांना अगदी स्पष्टपणे कळलं होतं, असं विश्लेषण या तयारीचं मंदार वैद्य करतात.

दुसरीकडे, कोल्हापूर-सांगलीच्या पूरपरिस्थितीत मदतकार्यासाठी तिथे गेलेले वैद्य सांगतात की लोकांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होतं की "त्यांना पुराचा धोका लक्षात आला नाही, लोकांनी त्याला कमी लेखलं आणि त्याची तीव्रता समजावून सांगण्यात प्रशासन अपयशी पडलं."

आवटेंचं एक निरीक्षण असंही होतं की, "जेव्हा (2019 मध्ये) महापूर आला होता, तेव्हा इशारा दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांची (फडणवीसांची) महाजनादेश यात्रा साधारणपणे आठवडाभर सुरूच होती. म्हणजे अशा महापुराचा धोका आहे, या इशाऱ्याकडे तेव्हा सरकारनेच दुर्लक्ष केलं होतं."

संजय आवटे पुढे सांगतात. "महापूर आला तेव्हा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असो वा सोलापूरचे पालकमंत्री सुभाष देशमुख, कुणीच पहिले सात-आठ दिवस या भागात फिरकलेसुद्धा नाहीत."

"आणि ते सगळं झाल्यानंतरही परिस्थिती नीटपणे हाताळली गेली नाही. सगळंकाही अगदीच कॅझ्युअली घेतलं गेलं. त्यामुळे तेव्हाचा महापूर आपण यशस्वीरीत्या हाताळला, असं जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर ते फारच हास्यास्पद आहे," असं ते सांगतात.

"कुठलीही आपत्ती हा माणसांच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो, अनेकदा आपत्ती ही लोकांना विकासाच्या प्रक्रियेतून दोन-दोन पिढ्या मागे ढकलणारी घटना असते. आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं, संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनी त्याच्याकडे लोकांना मदत करण्याच्या, पुन्हा उभं करण्याच्या भावनेतून बघितलं पाहिजे, त्याच्यावर असं राजकारण नाही केलं पाहिजे," असं आवाहनही मंदार वैद्य करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)