आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही - सर्वोच्च न्यायालय : #5मोठ्याबातम्या

सर्वोच्च न्यायालय

फोटो स्रोत, Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1. आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही - सर्वोच्च न्यायालय

आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडूमधील वैद्यकीय कॉलेजात ओबीसींना 50 टक्के आरक्षण न देण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, कृष्ण मुरारी आणि एस रवींद्र भट यांच्या खंडपीठानं सुनावणीदरम्यान आरक्षणाचा अधिकार मुलभूत अधिकार नसल्याचं सांगितलं आहे.

तामिळनाडूतील अनेक पक्षांनी केंद्राच्या आरक्षण न देण्याच्या निर्णयाविरोधात याचिका केल्या असून सर्वोच्च न्यायालयानं त्या सर्व फेटाळल्या आहेत.

एका विषयावर पक्ष एकत्र आले असल्याचं कौतुक करताना न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.

यावेळी याचिकाकर्त्यांनी केंद्राचा निर्णय तामिळनाडू सरकारच्या आरक्षणसंबंधी कायद्याचं उल्लंघन असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

यावर न्यायालयानं याचिका करणाऱ्या सर्व पक्षांना आपण मद्रास उच्च न्यायालयात याचिका करण्यासाठी मुक्त असल्याचं सांगितलं.

"तुम्ही ही याचिका रद्द करा आणि मद्रास उच्च न्यायालयात जा," असं न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितलं.

2. विद्यापीठ रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठ टॉप-10मध्ये

देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क-2020 या वर्षाची यादी जाहीर झाली आहे.

या यादीत महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यापीठाचं स्थान एका क्रमांकानं उंचावल आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

या यादीत पहिल्या क्रमांक बंगळुरूमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफफ सायन्सनं पटकावला आहे. तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दुसऱ्या आणि जामिया मिलिया इस्लामिया दहाव्या क्रमांकावर आहेत.

3. साधूंच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्राला नोटीस

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात साधूंच्या झालेल्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

पालघरमध्ये दोन साधूंसह तीन जणांचा जमावानं केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.

याप्रकरणी दाखल दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला बाजू मांडण्यास सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Ani

या हत्येची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी केली जावी, अशी मागणी या याचिकांत करण्यात आली आहे.

अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकांवर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी केली. या दोन याचिकांपैकी एक याचिका ही 'श्री पंच दशभान जुना आखाडा'चे साधू आणि मृत साधूंच्या नातेवाईकांनी केलेली आहे.

4. कोकणाला 9 दिवसात काहीच मदत मिळाली नाही - फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणची पाहणी केली.

"चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झालंय. 9 दिवसात कोणतीही मदत मिळालेली नाही, जिथे नुकसानग्रस्तांना ठेवलंय, त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे," अशी टीका पाहणीनंतर फडणवीसांनी केली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, "चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना जिथं ठेवलं आहे त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे. अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवण्यात आलं आहे. त्यांना आधी योग्य ठिकाणी ठेवलं पाहिजे. सरकारने हेक्टरी 50 हजाराची मदत घोषित केली आहे.

मात्र, हे नुकसान वेगळं आहे. पिकांच्या बाबतीत ही मदत ठिक आहे, पण कोकणात पुढील अनेक वर्षे उत्पन्न देणारी झाडं पडली आहेत. जी उभी आहेत त्या झाडांची अवस्था देखील वाईट आहे. कोकणात जमिनीची मालकी सर्वात कमी आहे. अनेकांना गुंठ्यातच जमीन आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला गुंठ्यावारी हजार रुपयेच मिळेल. सरकारने याचे निकष बदलले पाहिजे. सरकारने थेट आर्थिक मदत द्यावी."

फोटो स्रोत, Getty Images

ते पुढे म्हणाले, "कोकणात घरांची मोठी पडझड झाली आहे. राज्याने सध्या दीड लाख रुपये देऊ असं सांगितलं. मात्र, तेवढ्याने काही होणार नाही. आम्ही आमच्यावेळी केंद्र आणि एनडीआरएफची एकत्रित रक्कम देऊन अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत देऊ केली होती. आत्ता लोकांना घरावर छतं लावायची आहेत त्याची काळाबाजार सुरु झाला आहे. सरकारने या काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. सरकारने या गोष्टी कमी किमतीत उपलब्ध करून द्याव्यात."

5. राज्यात मान्सूनचं आगमन

निसर्ग चक्रीवादळामुळे थांबलेली मान्सूनची वाटचाल पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

गोवा, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

पुढील चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हा मान्सून पोहचेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

पुढील चार दिवस म्हणजे 14 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)