कोरोना: माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना विषाणूची लागण, मुंबईत उपचार सुरू

अर्जुन खोतकर

फोटो स्रोत, Facebook

शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण झालीय. त्यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट आणि फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली.

"लोक संकटात असताना नेतृत्त्वाने घरात बसून चालत नाही. कोव्हिडचे सर्व नियम पाळूनदेखील लोकहिताची कामे करताना अखेर कोव्हिडने मला गाठलेच," अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली.

अर्जुन खोतकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इश्वरकृपेने आणि लोकाशीर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेन, असा विश्वास खोतकरांनी व्यक्त केला.

तुकाराम मुंढे कोरोनामुक्त

नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे हे कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांनी स्वतःच ट्वीट करून ही माहिती दिली.

फोटो स्रोत, TUKARAM MUNDHE

कोव्हिडसोबत सकारात्मक विचार आणि कृतीनं लढा देणं आवश्यक असल्याचं तुकाराम मुंढे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि सर्वांच्या प्रयत्नांमुळे कोरोनातून बरे झालो असल्याचं तुकाराम मुंढेंनी म्हटलं.

तुकाराम मुंढे यांनी 25 ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तुकाराम मुंढे यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी माहिती दिली.

"माझी कोव्हिड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला लक्षणं नाहीत. मात्र, नियमांनुसार मी स्वत:हून अलगीकरण कक्षात राहत आहे," अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली होती.

फोटो स्रोत, Tukaram Mundhe

तसंच, आपण घरातून नियमित काम सुरूच ठेवणार असून, नागपूरमधील कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवेन, असंही त्यांनी सांगितलं.

अर्जुन कपूरला कोरोना

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर याला कोरोनाची लागण झाली असून, त्यानेच त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली.

"मला कोरोनाची लागण झाली असून, मी लक्षणंविरहित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईन आहे," अशी माहिती अर्जुन कपूरने दिली.

आपण सगळेच अत्यंत भयंकर संकटातून जात आहोत, पण आशा आहे की, या विषाणूवर अवघी मानवजात नियंत्रण मिळवेल, असंही अर्जुन कपूरनं इन्स्टाग्रामवर म्हटलंय.

दुसरीकडे, हरियाणातील काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनाही कोरोनाची लागण झालीय. त्यांनी स्वत: ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्यांना अलगीकरण कक्षात राहून चाचणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

फोटो स्रोत, Twitter

तसंच, पैलवान दीपक पुनिया यालाही कोरोनाची लागण झाली असून, दीपक लक्षणंविरहित आहे. दीपक घरातच क्वारंटाईन झाला आहे. भारतीय क्रीड प्राधिकरण अर्थात SAI ने ट्विटरवरून दीपकच्या तब्येतीची माहिती दिली.

फोटो स्रोत, Twitter

नाना पटोले यांना कोरोनाची लागण

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपली कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे ट्वीटरवर जाहीर केले आहे. विदर्भातील पूरस्थितीमुळे आपले बाहेर फिरणे झाले आहे.

या काळात आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असं त्यांनी आवाहन केलं आहे.

फोटो स्रोत, Nana Patole/facebook

फोटो कॅप्शन,

नाना पटोले

ऐन विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 7 आणि 8 सप्टेंबर हे दोन दिवस अधिवेशन होणार आहे. याआधी 3 ऑगस्टला हे अधिवेशन घेणं अपेक्षित होतं पण कोरोनाच्या संकटामुळे ते पुढे ढकलण्यात आलं.

काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण

काँग्रेसचे कोल्हापुरातील आमदार ऋतुराज पाटील यांना 21 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातच उपचार सुरू आहेत. ऋतुराज पाटील यांनी याबाबत स्वत:च ट्विटर हँडलवरून माहिती दिली.

फोटो स्रोत, Twitter/Satej Patil

फोटो कॅप्शन,

ऋतुराज पाटील

"माझी कोव्हिड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती," अशी माहिती ऋतुराज पाटील यांनी ट्वीटद्वारे दिली होती.

ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसचे आमदार आहेत. राज्यमंत्री सतेज पाटील यांचे ऋुतराज हे पुतणे आहेत.

फोटो स्रोत, Twitter

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 16 ऑगस्ट 2020 रोजी निलेश राणे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

"कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोव्हिड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वत:ला सेल्फ क्वारंटीन करून घेतलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी", असं निलेश यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER

निलेश यांनी सुशांत सिंग प्रकरणानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डमध्ये आलं आहे की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये सहभाग जाणवतो.

तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण या केसमध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे असं निलेश यांनी म्हटलं होतं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निलेश यांनी टीका केली होती.

बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

बाळासाहेब पाटील यांनी कोरोना झाल्याची माहिती स्वत:हून सोशल मीडियावरून दिली.

"काल माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती, रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. तब्येत ठीक आहे, काळजी करण्याची गरज नाही," अशी माहिती बाळासाहेब पाटलांनी दिली.

फोटो स्रोत, Twitter

तसंच, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आठवडाभर विलगीकरणात राहावे, असं आवाहनही त्यांनी ट्विटरवरून केलंय.

बाळासाहेब पाटील हे साताऱ्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार असून, सध्या महाराष्ट्राचे सहकार व पणन मंत्री आहेत. सातारा जिल्ह्याचे ते पालकमंत्रीही आहेत.

साताऱ्यातील सह्याद्री साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. 1999 पासून आजवर ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत.

किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या रुग्णालयात

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. किरीट सोमय्या यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images

"मी आणि माझी पत्नी प्रा. डॉ. मेधा सोमय्या कोरोनाबाधित झालो असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहोत," अशी माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून दिली

किरीट सोमय्या हे भाजपचे माजी खासदार असून, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात

दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही कोरोनावर मात केली. 22 जून 2020 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून धनंजय मुंडे घरी परतले.रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

फोटो स्रोत, Dhananjay Munde/facebook

फोटो कॅप्शन,

धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर 11 जूनला ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली होती.

त्यांनी म्हटलं होतं, "धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते मुंबईत कॅबिनेट बैठकीला गेले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे."

"धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे," असंही त्यांनी पुढे सांगितलं.

"धनंजय मुंडे यांच्या संपर्कातील 6 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सध्या धनंजय मुंडे मुंबईत आहेत आणि लवकरच ते दवाखान्यात अमडिट होतील," असं मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी बीबीसीला मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यावर सांगितलं होतं.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं, "धनंजय मुंडे यांचा रिपोर्ट positive आला आहे. त्यांना श्वास घेण्यात थोडा त्रास होत आहे, पण symptomatic आहेत. ते मंत्रिमंडळ बैठकीत होते, राष्टृवादीच्या कार्यक्रमातही होते पण बैठकीत 1 मीटर अंतर ठेवलं जातं. सर्व मंत्र्यांना obvervation करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."

दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

या मंत्र्यांचीही कोरोनावर मात

महाराष्ट्रातल्या 3 मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, facebook

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)