कोरोना: मदतीची याचना करणाऱ्या व्यक्तीचा तडफडून मृत्यू, कोरोनाच्या संशयातून मदतीला नकार

  • दीप्ती बथिनी
  • बीबीसी तेलुगू
रस्त्याच्या कडेला झोपलेले श्रीनिवास
फोटो कॅप्शन,

श्रीनिवास यांना त्रास होत असताना त्यांनी लोकांकडे मदत मागितली.

"प्लीज, मला मदत करा आणि दवाखान्यात घेऊन जा. मला श्वासही घेता येत नाही," 60 वर्षांच्या श्रीनिवास बाबू यांचे हे अखरेचे शब्द.

रस्त्याच्या कडेला पडलेले श्रीनिवास मदतीसाठी याचना करत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक महिला श्रीनिवास यांना प्रश्न विचारत आहे आणि त्यांना श्वासही घेत येत नसून ते दवाखान्यात न्यायची विनंती करत असल्याचं या व्हीडिओत दिसतं.

हैदराबादपासून 70 किमी अंतरावर असलेल्या तेलंगणातल्या मेडक जिल्हयात बुधवारी हा प्रसंग घडला. या घटनेची स्थानिकांनी माहिती दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

त्यांच्या मते, "आम्ही 108 अॅम्बुलन्सला (रुग्णवाहिका) फोन केला. ती एका तासानंतर आली. त्यानंतर रुग्णवाहिकेमधल्या कर्मचाऱ्यानं सांगितलं की त्याच्याकडे पीपीई किट्स नाही. आणि पेशंटला कोरोनाची लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे दुसरी रुग्णवाहिका बोलवावी लागेल. पण, ती येईपर्यंत उशीर झाला होता. "

त्यानंतर चौकशीत समोर आलं की, जी रुग्णवाहिका पहिल्यांदा घटनास्थळी पोहोचली होती, तिच्यामध्ये दोन पीपीई किट्स होत्या. पण, कोरोनाचा संशयित रुग्ण असल्यामुळे आणि दवाखान्यात पीपीई किट्स नसल्यामुळे त्यांना घेऊन जाण्यास कर्मचाऱ्यांना भीती वाटत होती.

बीबीसी तेलुगूनं मेडकचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्यंकटेश्वर राव यांच्याशी संपर्क साधला.

ते म्हणाले, "मी श्रीनिवास यांच्या पत्नीशी बोललो आहे आणि त्यानुसार ते हैदराबादच्या मार्डपल्ली भागातील रहिवाशी आहेत."

व्यंकटेश्वर राव सांगतात, "श्रीनिवास हे राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून हैदराबादला परत यायचा प्रयत्न करत होते, असं दिसून येतं. पण, त्यांना बरं न वाटल्यानं त्यांनी इतरांना जवळच्या दवाखान्यात घेऊन जाण्याची विनंती केली. त्यानंतर बसनं त्यांना जवळच्याच चेगुंटा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सोडलं.

फोटो स्रोत, ugc Video

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"तिथं लोकांनी त्यांना पाहिलं आणि पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रुग्णवाहिकेला फोन केला. त्यापूर्वी आरोग्य केंद्रातील नर्सनं श्रीनिवास यांनी इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या होत्या. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका गरजेची होती, पण रुग्णवाहिका यायला विलंब झाल्यानं श्रीनिवास यांना जीव गमवावा लागला," राव सांगतात.

तेलंगणा सरकार GVK EMRI सोबत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आहे. याद्वारे 108 अॅम्बुलन्स चालवली जाते.

"मेडक जिल्ह्यात आठ 108 रुग्णवाहिका आहेत. यापैकी 2 रुग्णवाहिका कोव्हिड-19 साठी काम करत आहे. इतर 6 नियमितपणे आपात्कालीन स्थितीसाठी वापरल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स देण्याची जबाबदारी GVK EMRIची आहे. आम्ही त्यांना 100 किट्स दिल्या आहेत. रुग्णाला प्रथमोपाचार देणं आणि गरज लागल्यास दवाखान्यात भरती करणं हे रुग्णवाहिकेचं काम आहे. त्या रुग्णवाहिकेमध्ये पीपीई किट्स का नव्हती हे मला माहिती नाही. याप्रकरणातील रुग्णवाहिकेचा चालक आणि तांत्रिक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहे," राव पुढे सांगतात.

'याआधी आम्ही कोव्हिडचा रुग्ण हाताळला नव्हता'

बीबीसी तेलुगूनं रुग्णवाहिकेचा चालक आणि तांत्रिकाशी संपर्क साधला.

ते सांगतात, "रुग्णवाहिकेत दोन पीपीई किट्स होत्या. आम्ही 30 मिनिटांत घटनास्थळी पोहोचलो. तेव्हा तिथं पोलीस आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी होते. आम्ही त्यांना विचारणा केली तेव्हा हा व्यक्ती कोरोनाचा संशयित रुग्ण असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. त्यांच्यापैकी कुणीही त्याच्याजवळ जात नव्हतं. त्यांच्याकडे मास्क आणि ग्लोव्ह्ज होते. आम्हालाही भीती वाटत होती, कारण यापूर्वी आम्ही एकाही कोरोना पेशंटला हाताळलं नव्हतं.

"आमच्याकडे फक्त दोन पीपीई किट्स होत्या. आम्ही त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेमध्ये घेतलं असतं तरी त्यानंतर रुग्णवाहिका सॅनिटाईज करण्यासाठी आमच्याकडे सॅनिटायझर नव्हतं. त्यामुळे मग आम्ही आमच्या वरिष्ठांना फोन केला आणि त्यांना कोव्हिड साठीची रुग्णवाहिका पाठवायला सांगितलं आणि मग आम्ही तिथून निघून आले."

श्रीनिवास यांच्या पश्चात बायको, मुलगी आणि मुलगा आहे. त्यांची पत्नी कल्याणी यांना त्या दिवशी दुपारी आलेला फोन कॉल आठवतो.

त्या म्हणतात, "कल्याणी सगळं काही संपलं आहे. मला वाटतं माझ्याकडे फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. रुग्णवाहिका अजून आली नाही. तू आली असती पण तू खूप लांब आहे. मुलं आणि माझ्या वडिलांची काळजी घे. आता सगळं संपलंय, हे सांगताना कल्याणी यांच्या डोळ्यात पाणी होतं."

"माझ्या मुलीला तिच्या वडिलांशिवाय झोप येत नव्हती. आता आपले वडील या जगात नाही, हे समजायच्या स्थितीतही ती नाही. आता मी एकटीच तिची काळजी कशी घेणार?," कल्याणी प्रश्न उपस्थित करतात.

श्रीनिवास यांचा मुलगा भानू चंदर यांनी म्हटलं, "हा व्हीडिओ पाहिल्यानंतर मी कुणाला दोष द्यावा? कुणातच नैतिकता उरली नसल्याचं स्पष्ट दिसतं. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णवाहिकेत पीपीई किट्स नसणं हास्यास्पद आहे. इतकी सारी तयारी कुठे गेली?"

GVK EMRIचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. ब्रह्मानंद राव यांच्याशी आम्ही बोललो.

ते म्हणाले, "राज्यात 351 रुग्णवाहिका आहेत. यापैकी 92 रुग्णवाहिका कोरोनाच्या रुग्णांसाठी वापरल्या जात आहेत. यापैकी 30 रुग्णवाहिका या ग्रेटर हैदराबादमध्ये आहेत, तर इतर 62 संपूर्ण जिल्ह्यात वापरल्या जातात. रुग्णवाहिकेत 10 पीपीई किट्स आणि सॅनिटायझर्सचा पुरवठा केला आहे. इतर रुग्णवाहिका ज्या नियमित कामासाठी वापरल्या जात आहेत, त्यांना 4 पीपीई किट्स पुरवण्यात आल्या आहेत."

"अशा स्थितीत कर्मचाऱ्यांनी पीपीई किट्स का वापरली नाही, ते आम्हाला नक्की माहिती नाही. श्वसनासंबंधी आजाराची लक्षणं म्हणजे कोरोना झाला असा त्याचा अर्थ होत नाही. कोरोना रुग्ण असण्याच्या संशयावरून त्याला दवाखान्यात शिफ्ट न करणं हे चुकीचं आहे. आम्ही चालक आणि तांत्रिक यांच्यावर कारवाई केली आहे आणि त्यांना हैदराबादला हलवलं आहे," ते पुढे सांगतात.

फोटो स्रोत, BBC

'पुरेशा किट्स असल्याचा सरकारचा दावा'

दरम्यान, राज्यात पुरेशा प्रमाणात पीपीई किट्स असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

राज्यातील उच्च न्यायलयात दाखल केलेल्या अहवालात राज्याच्या आरोग्य संचालकांनी म्हटलं की, 2 जूनपर्यंत राज्यात 7 लाख पीपीई किट्स आहेत. पण, तुमच्याकडे किती साठा आहे ते जाणून घेण्यास आम्ही उत्सूक नसून, तो कोरोनाचा सामना करणारे आरोग्य कर्मचारी आणि दवाखान्यांपर्यंत पोहोचत आहे का, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना आहे की नाही हे पाहण्यासाठी श्रीनिवास यांचे नमुने घेण्यात आले नाही. मृतदेहांची आम्ही चाचणी करत नाही, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पण, मृतदेहांवरही कोरोनाची चाचणी करा, असे आदेश तेलंगणा उच्च न्यायालयानं दिले आहेत. आपल्या आदेशात न्यायालयानं म्हटलंय, "दवाखान्यातून बाहेर पडलेले मृतदेह कोरोनाची वाहतूक करत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी त्यांची तपासणी करायला हवी. एखादा लक्षणं नसलेला मृत रुग्ण कोरोना व्हायरसचा प्रसार करत तर नाही, हे जाणून घेण्यासाठी हा आदेश दिला आहे."

फोटो कॅप्शन,

श्रीनिवास बाबू यांची पत्नी कल्याणी

चाचणी न करताच मृतदेह कुटुंबीयांच्या हाती दिल्यास कुटुंबातील सदस्य, शेजारी, मित्रमंडळी आणि अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांना कोरोना व्हायची शक्यता असते, असंही कोर्टानं म्हटलंय.

पण, मृतदेहांवर कोरोना चाचणी केली जावी, या उच्च न्यायालयाची आदेशाची अंमलबजावणी करणं अवघड काम आहे, असं सरकारनं म्हटलं आहे.

"राज्यात दररोज वेगवेगळ्या कारणांमुळे 900 ते 1000 जणांचा मृत्यू होतो. दररोज राज्यातल्या दुर्मीळ भागात कुणाचातरी मृत्यू होतो. या सगळ्यांनी कोरोना चाचणी करणं शक्य नाही. दवाखान्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना हे काम लावलं, तर ते इतर रुग्णांना वेळ देऊ शकणार नाही. दवाखान्यात काही रुग्ण इतर आजार आणि काही जण डिलिव्हरीसाठी आलेले असतात. आता काही जण कोरोनाच्या उपचारासाठी येत आहेत. या सगळ्या रुग्णांना सोडून मृतदेहांवर कोरोनाची चाचणी करणं शक्य नाही. WHO, ICMR किंवा केंद्र सरकार कुणीही मृतदेहांवर चाचणी करायला सांगितलं नाही. याप्रकरणी उच्च न्यायालयानं दिलेला आदेशाची अंमलबजावणी करणं शक्य नाही."

उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पण, श्रीनिवास यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला, की अस्थमामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होऊन त्यांचा जीव गेला, या प्रश्नाचं उत्तर मात्र कधीच मिळणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)