कोरोना : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन'च्या वापरास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी #5मोठ्याबातम्या

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन'च्या वापरास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

कोरोनावर कुठलेही औषध वा लस अद्याप आलेली नाही म्हणून कोरोनाबाधितांना देवाच्या भरवशावर सोडून देता येणार नाही, अस नमूद करत 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन'चा उपचारासाठी वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला परवानगी दिली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

कोरोना संकटाशी संबंधित मुद्दय़ांबाबत करण्यात आलेल्या विविध याचिकांवर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अमजद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं निकाल दिला आहे.

'क्लोरोक्वीन'चा कोरोनाबाधितांसाठी उपचार म्हणून वापर करण्याचे विपरीत परिणाम होत असल्याचा दावा करणारी याचिका करण्यात आली होती. .

'क्लोरोक्वीन' हे कोरोनावरील प्रभावी औषध असल्याचे सिद्ध झालेल नाही. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनही ते वापरण्यास मनाई केलेली नाही वा त्याच्या सेवनानं अन्य दुष्परिणाम होत असल्याचेही पुढे आलेलं नाही. सध्याच्या स्थितीत तेच एकमेव औषध असल्याचे दिसून येते, असं न्यायालयानं सुनावणीदरम्यान म्हटलं आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडे दूरदृष्टी आणि पूर्वतयारीचा अभाव आणि दोन्ही सरकारमधील समन्वयाअभावी महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.

2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रायगड दौरा रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रविवारी (14 जून) नियोजित असलेला रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे. मुंबई आणि अलिबागमध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्याचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

रायडगडमधील चौल, बोर्ली, मुरुड येथे निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप केले जाणार होतं. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन,

उद्धव ठाकरे

दरम्यान, कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी कोकणासाठी विविध मागण्या केल्या.

"कोकण चक्रीवादळाच्या दौऱ्यात माझ्यासमोर जे सत्य आलं, ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. वादळग्रस्तांना एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. सरकारचं अस्तित्व कुठेच दिसत नाही, लोकांना शाळांमध्ये कोंबून ठेवलं आहे, विदारक चित्र उद्धवजींसमोर मांडलं. लोकांना तात्काळ रोख रक्कम मिळायला हवी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली," असं फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

3. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांकडून 'आत्मनिर्भर पॅकेज'वर प्रश्नचिन्ह

कोरोना संकटामुळे निर्माण होणारा अर्थव्यवस्थेवरचा दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी मोदी सरकारकडून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 20 लाख कोटी रुपयांचं 'आत्मनिर्भर भारत' आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषद सदस्य आशिमा गोयल यांनी आत्मनिर्भर पॅकेजवर प्रश्नचिन्हं निर्माण केलंय. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिली आहे.

या पॅकेजमध्ये सुधारणेसाठी अधिक वाव असल्याचं त्यांनी म्हटलंय. अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मागणीला प्रोत्साहन देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय.

त्या म्हणाल्या, "आर्थिक पॅकज संपूर्ण नाही. पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या दूर करून या पॅकेजमध्ये आणखी सुधारणा करता येणं शक्य आहे."

4. '85% स्थलांतरित मजूरांना प्रवासाचा खर्च स्वत: करावा लागला'

Stranded Workers Action Network (SWAN)नं स्थलांतरित मजूरांचा एक सर्व्हे केला आहे. त्यानुसार 85% हून अधिक स्थलांतरित मजूरांना घरी जाण्यासाठी प्रवासाचा खर्च स्वत : करावा लागला. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

28 मे रोजी सर्वोच्च न्यायलयानं मजूरांच्या प्रवासाचा खर्च करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे, असा आदेश दिला होता, पण त्याला उशीर झाला, असंही या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटलं आहे.

"To Leave or Not to Leave: Lockdown, Migrant Workers and their Journeys Home' या नावाचा अहवाल शुक्रवारी प्रकाशित करण्यात आला आहे. मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीला हा सर्वे करण्यात आला आहे.

5. मास्क न वापरल्यानं आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल

बाहेर फिरताना चेहऱ्याला मस्क न लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह 25 जणांविरोधात शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

संग्राम जगताप

जगताप यांचा शुक्रवारी (12 जून) वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते जगताप यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमले होते. बाहेर फिरताना व शुभेच्छा स्वीकारत असताना जगताप यांनी मास्क लावला नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जगताप यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)