सुशांत सिंह राजपूतच्या 50 स्वप्नांची डायरी, काही स्वप्नं राहिली कायमचीच अधुरी...
- भूमिका राय
- बीबीसी प्रतिनिधी

फोटो स्रोत, Getty Images
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा आज (14 जून) स्मृतीदिन. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
'रूठे ख्वाबो को मना लेंगे, कटी पतंगो को थामेंगे...' काय पो छे चित्रपटातल्या गाण्यातील शब्दांना आपल्या अभिनयाने जिवंत करणारा सुशांत सिंह राजपूत आपली अनेक स्वप्नं अधुरी सोडून निघून गेलाय.
त्याच्या आयुष्याची दोरी मात्र आता तुटून गेलीये. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नाहीये. 34 वर्षीय सुशांत 14 जून 2020 ला आपल्या घरी मृत आढळून आला होता. त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं. पण याचं कारण कुणालाच माहीत नाहीये.
छोट्या पडद्यापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुशांतची अनेक मोठी स्वप्नं होती. याच स्वप्नांचा पाठलाग करत तो सिनेमा क्षेत्रात आला होता.
सुशांत सिंह राजपूतने 'काय पो छे' चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर तो एम. एस. धोनी, पीके, केदारनाथ आणि छिछोरेसह इतर चित्रपटांमध्ये दिसला होता.
सुशांत सिंह राजपूतचा चाहता वर्ग मोठा होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
हिंदी सिनेमात स्वकर्तृत्वावर पुढे येत असलेल्या या अभिनेत्याच्या अचानक जाण्यानं लोकांना धक्का बसलाय.
त्याने पाहिलेली अनेक स्वप्नं स्वप्नं हळूहळू पूर्ण होतच होती. पण अशीही काही स्वप्नं आहेत, जी आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत.
सुशांत सिंह राजपूतने आपल्या या स्वप्नांची यादी बनवून ठेवली होती. याबद्दल त्याने ट्विटरवर लिहिलं होतं. त्याची ही आगळीवेगळी स्वप्नं कोणती, ते आपण आपण जाणून घेणार आहोत...
'My 50 dreams & counting! 1,2,3...'
सुशांत सिंह राजपूतने 14 सप्टेंबर 2019 ला आपल्या स्वप्नांचं पहिलं पान शेअर केलं होतं. याचं शीर्षक होतं 'My 50 dreams & counting! 123...'
सुशांतचं पहिलं स्वप्न उडायचं होतं. म्हणजेच त्याला विमान उडवणं शिकायचं होतं.
दुसरं स्वप्न होतं आयर्नमॅन ट्रायथलॉनची तयारी करणं.
ट्रायथलॉन ही एक एकदिवसीय स्पर्धा असते. यामध्ये स्पर्धकाला 3.8 किमी पोहणे, 180.2 किमी सायकलिंग आणि 42.2 किमी धावणे हे खेळप्रकार ठराविक वेळेत पूर्ण करायचे असतात. या स्पर्धेत जिंकणाऱ्या स्पर्धकाला 'आयर्नमॅन' संबोधलं जातं. 2015 मध्ये मॉडेल मिलिंद सोमणनं ही स्पर्धा जिंकल्याचं तुम्हाला आठवत असेल.
तिसरं स्वप्न ऐकून तुम्हाला कदाचित त्याच्या धोनी चित्रपटाची आठवण येईल.
या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची भूमिका निभावणाऱ्या सुशांतला डाव्या हाताने क्रिकेट मॅच खेळायची होती.
फोटो स्रोत, Getty Images
सुशांतचं चौथं स्वप्न होतं मॉर्स कोड शिकणं. ही एक प्रकारची भाषा आहे. तुम्ही यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार जिंकलेला पॅरासाईट चित्रपट पाहिलाय का? यामध्ये वडील तळघरातून याच भाषेच्या माध्यमातून मुलाशी संवाद साधत असतात.
मुलांना अंतराळाबाबत शिकायला मदत करणं हे सुशांत सिंह राजपूतचं पाचवं स्वप्न होतं.
खेळांची आवड असलेल्या सुशांतचं सहावं स्वप्न टेनिसच्या चँपियन खेळाडूविरुद्ध सामना खेळणं हे होतं.
सुशांत सिंह राजपूतचे अनेक फिटनेस व्हीडिओ तुम्ही पाहिले असतील. फोर क्लॅप्स पुशअप्स त्याचं सातवं स्वप्न होतं.
दुसरं पान
पहिलं पान तर सात स्वप्नांमध्येच भरलं. पण आणखी काही स्वप्नंही होती. त्यासाठी त्याने दुसरं पान लिहिलं.
सुशांत सिंह राजपूतला आपण त्याच्या अभिनय आणि स्माईलसाठी ओळखतो. पण त्याची स्वप्नं पाहिली तर त्याला अंतराळ आणि ग्रह-ताऱ्यांमध्ये विशेष रस असल्याचं दिसून येईल.
आपल्या आठव्या स्वप्नात त्याने याचा उल्लेख केलाय. सुशांतला एक आठवडाभर चंद्र, मंगळ, गुरू आणि शनि ग्रहावर फिरत त्यांचं निरीक्षण करायचं होतं.
समुद्रातल्या ब्ल्यू-होलमध्ये डुबकी घेणं सुशांतचं नववं स्वप्नं होतं.
दहाव्या स्वप्नात सुशांतला डबल स्लिट एक्सपेरिमेंट एकदा करून पाहायचं होतं. प्रकाशाच्या लहरींचे गुणधर्म तपासण्याचा हा एक प्रयोग आहे.
फोटो स्रोत, Getty Images
सुशांतला एक हजार झाडं लावायची होती, हेच त्याचं 11वं स्वप्न होतं.
सुशांत अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकायचा. इथल्या हॉस्टेलमध्ये पुन्हा जाऊन एक दिवस घालवणं त्याचं 12वं स्वप्न होतं.
सुशांतच्या अंतराळ प्रेमाचं उदाहरण त्याच्या 13व्या स्वप्नात दिसतं. त्याला 100 मुलांना इस्रो किंवा नासाच्या वर्कशॉपची पाहणी करायला पाठवायचं होतं.
कैलाश पर्वतावर मेडीटेशन करणं त्याचं 14वं स्वप्न होतं. केदारनाथ चित्रपटादरम्यान कदाचित त्याने हे स्वप्न पाहिलं असावं.
तिसरं पान आणि आणखी 11 स्वप्नं
- चँपियन खेळाडूविरुद्ध पोकर खेळणं
- पुस्तक लिहिणं
- युरोपमधलं सर्न अंतराळ केंद्र पाहायला जाणं
- ध्रुवीय प्रकाशाचं चित्र काढणं
- नासाच्या आणखी एक कार्यशाळेत सहभाग नोंदवणं
- सहा महिन्यात सिक्स पॅक अॅब्स बनवणं
- समुद्रातल्या सेनोट्समध्ये पोहणं
- पाहता न येणाऱ्या लोकांना कोडींगची भाषा शिकवणं
- जंगलात एक आठवडा राहणं
- वैदीक ज्योतिषशास्त्र समजून घेणं
- डिस्नेलँड पाहणं
चौथ्या पानावरची काही स्वप्नं
- अमेरिकेत गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करणारं लीगो केंद्र पाहायला जाणं
- एक घोडा पाळणं
- दहा प्रकारचे नृत्यप्रकार शिकून घेणं
- मोफत शिक्षणासाठी काम करणं
- अंड्रोमेडा गॅलेक्सी एका विशाल दुर्बिणीतून पाहणं आणि त्याचा अभ्यास करणं
- क्रिया योग शिकणं
- अंटार्क्टिका खंड फिरायला जाणं
- महिलांना स्वयं-संरक्षणाचे धडे देणं
- एका सक्रिय ज्वालामुखीला कॅमेऱ्यात कैद करणं
सुशांतच्या मनातली पाचव्या पानावरची स्वप्नं
शेती करायला शिकणं सुशांत सिंह राजपूतचं 35वं स्वप्न होतं.
36व्या स्वप्नात पुन्हा सुशांतच्या डान्सच्या आवडीची झलक मिळते. मुलांना डान्स शिकवणं हेसुद्धा त्याचं एक स्वप्न होतं.
सुशांतला दोन्ही हातांनी सराईतपणे तिरंदाजी करायला शिकायचं होतं. हे त्याचं 37वं स्वप्न होतं.
सुशांतचं 38वं स्वप्न रेसनिक हेलिडेचं प्रसिद्ध पुस्तक पूर्ण वाचणं हे होतं.
त्याला पॉलिनेशियन अॅस्ट्रोनॉमीसुद्धा शिकायची होती. हे त्याचं 39वं स्वप्न होतं.
आपल्या लोकप्रिय 50 गाण्यांची धून गिटारवर वाजवायला शिकणं त्याचं 40वं स्वप्न होतं.
सुशांतचं 41 वं स्वप्न बुद्धिबळाशी निगडीत आहे. त्याला एकदा तरी चँपियन खेळाडूविरुद्ध बुद्धिबळाचा डाव खेळायचा होता.
सुशांत सिंह राजपूतचं 42वं स्वप्न. त्याला लँबर्गिनी ही महागडी गाडी विकत घ्यायची होती.
सुशांतच्या स्वप्नांच्या यादीचं शेवटचं पान
व्हिएन्नाच्या सेंट स्टीफन कॅथेड्रल चर्चला जाणं त्याचं 43वं स्वप्न होतं.
सुशांतचं 44वं स्वप्न विज्ञानाबाबतचं आहे. त्याला व्हीजिबल साऊंड आणि व्हायब्रेशनचा प्रयोग करायचा होता.
भारतीय सैन्य दलासाठी मुलांना तयार करणं त्याचं 45वं स्वप्न होतं.
सुशांत सिंह राजपूतला स्वामी विवेकानंद यांच्यावर एक डॉक्युमेंट्री बनवायची होती. हे त्याचं 46वं स्वप्न होतं.
समुद्राच्या लाटांवर बोर्ड सर्फिंग करणं त्याचं पुढचं स्वप्न होतं.
सुशांतचं 48वं स्वप्न होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणं.
ब्राझीलचा डान्स आणि मार्शल आर्ट प्रकार शिकणं हे त्याचं 49वं स्वप्न होतं.
तर रेल्वेत बसून संपूर्ण युरोपचं पर्यटन करणं सुशांत सिंह राजपूतचं अखेरचं स्वप्न होतं.
स्वप्नपूर्ती
सुशांतने फक्त स्वप्नांची यादीच बनवली, असं नव्हे तर काही स्वप्नं त्याने पूर्णसुद्धा केली.
त्याचं विमान उडवणं शिकण्याचं पहिलं स्वप्न पूर्ण झालं.
डाव्या हाताने क्रिकेट मॅच खेळायचं तिसरं स्वप्नही त्यानं पूर्ण केलं होतं.
युरोपमधलं सर्न अंतराळ केंद्र पाहायला जाणं, हे त्याचं सतरावं स्वप्न होतं आणि ते त्यानं पूर्ण केलं होतं
सुशांतला दोन्ही हातांनी सराईतपणे तिरंदाजी करायला शिकायचं होतं आणि तो ते शिकतही होता.
सेनोट्समध्ये पोहण्याचं एकविसावं स्वप्नही पूर्ण करणं त्याला जमलं होतं.
दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकायचा. इथल्या हॉस्टेलमध्ये पुन्हा जाऊन एक दिवस घालवण्याचं बारावं स्वप्नही त्यानं पूर्ण केलं.
सुशांतला आकाश निरीक्षणाची आवड होती. त्याचं तिसावं स्वप्न अंड्रोमेडा गॅलेक्सी एका विशाल दुर्बिणीतून पाहणं आणि त्याचा अभ्यास करणं होतं. ते त्यानं पूर्ण केलं.
ब्लू होलमध्ये डाइव्ह करण्याचं स्वप्नंही त्यानं पूर्ण केलं.
डिस्नेलँड पाहणं हे त्याचं पंचविसावं स्वप्न होतं. तिथं तो गेलाही होता.
त्याला व्हीजिबल साऊंड आणि व्हायब्रेशनचा प्रयोग करायचा होता, तो त्यानं केला होता.
सुशांतच्या 50 स्वप्नांच्या यादीतली 11 स्वप्नं त्याला पूर्ण करता आली. सुशांत असता तर इतरही काही स्वप्नं पूर्ण करू शकला असता. पण ही स्वप्नं आता कधीच पूर्ण होणार नाहीत. कारण ही स्वप्नं पाहणारे डोळे चिरनिद्रा घेऊन कायमचे बंद झाले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)