मुंबई लोकल रुळावर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सेवा

लोकलचा प्रवास

फोटो स्रोत, Twitter

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून मुंबईची लाइफ लाइन समजली जाणारी लोकल बंद करण्यात आली होती. जवळपास अडीच महिने बंद असलेली ही लोकल सोमवारपासून (15 जून) पुन्हा रुळावर आली आहे.

सोमवारी पहाटे साडे पाच वाजता चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल धावली.

व्हीडिओ कॅप्शन,

लोकल ट्रेनचा आवाज इतक्या दिवसांनी ऐकून किती छान वाटलं

सध्या सामान्य नागरिकांना या लोकलमधून प्रवास करण्यास मुभा नसेल. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकलची सेवा सुरू असेल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आयकार्ड दाखवल्यानंतरच प्रवास करू शकतील. दरम्यान पश्चिम रेल्वेवर 120 तर मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गावर 200 लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

सध्या मुंबई महानगर परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट आणि एसटी धावत आहेत. मात्र टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर खासगी कार्यालय व अन्य प्रवाशांनाही प्रवेश दिल्यानंतर या दोन्ही सेवांना प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. यामुळे करोनाचा प्रसार होण्याचा धोकाही वाढला होता

या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीने जोर पकडला होता. त्याकरता गेल्या काही दिवसांत राज्य सरकारी यंत्रणा आणि रेल्वे तसेच पोलीस, पालिका प्रशासनाच्या बैठकाही झाल्या व लोकलसेवा सुरू करण्यावर एकमत झाले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळता यावेत म्हणून एका फेरीत केवळ 700 प्रवासीच प्रवास करू शकणार आहेत.

रेल्वेतून प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच प्रवाशांनी विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Twitter

शेवटची लोकल रात्री 11.30 वाजता सुटणार आहे. अप आणि डाउन दिशेला दर 15 ते 20 मिनिटांनी लोकल धावणार आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकल चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर व त्यानंतर दहिसर ते विरार दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.

मध्य आणि हार्बरवर जलद मार्गावर लोकल चालवण्यात येणार आहेत. चर्चगेट-विरार, विरार-डहाणू, सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल या मार्गांवर लोकल धावतील.

अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र पाहूनच प्रवाशांना रेल्वे स्थानकांत प्रवेश देण्यात येईल. इतर प्रवाशांना लोकलमधून प्रवास करता येणार नाही.

रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी प्रवासी रांग, थर्मल स्क्रीनिंग करण्याची जागा, पार्किंगची व्यवस्था आणि त्याठिकाणी बंदोबस्त असे आदेश रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून सर्व रेल्वे पोलिसांना देण्यात आले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)