भारत चीन सीमा वाद: गलवान खोऱ्यावरुन भारत-चीनमध्ये तणाव का?

  • कमलेश मठेनी
  • बीबीसी हिंदी
चीन

फोटो स्रोत, AFP

गेल्या काही आठवड्यांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव आहे. दोन्ही देशांनी आपआपल्या नियंत्रण रेषेवर सैनिकांची गस्त वाढवली आहे. गलवान खोऱ्यावरुन दोन्ही देशांमध्ये तणावाला सुरूवात झाली.

गलवान खोऱ्याच्या सीमेवर चीनी सैन्याने टेंट उभारले असल्याचं भारताकडून सांगण्यात येत आहे. यामुळे भारतीय लष्करानं या ठिकाणी सैन्य दल वाढवले आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताकडूनच गलवान खोऱ्यात बेकायदा हालचाली सुरू असल्याचा दावा चीननं केलाय.

मे महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही देशांचं सैन्य आमने सामने आलं होतं. 9 मे रोजी उत्तर सिक्कीमच्या नाकू ला सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये चकमक झाली. याचवेळी लदाखच्या सीमा रेषेवर चिनी सैन्याचे हेलिकॉप्टर फेऱ्या घालत होते. यानंतर भारतीय वायू सेनेकडूनही सुखोईसोबत इतर लढाऊ विमानांच्या साहाय्यानं पेट्रोलिंग सुरू केले.

वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनीही सोमवारी चीनचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं, "आम्ही त्याठिकाणी काही असामान्य हालचाली पाहिल्या. अशा हालचालींवर आमची बारीक नजर असते. आवश्यकता असेल तर आम्ही कारवाई करतो. अशा घटनांची जास्त काळजी करण्याची गरज नाही."

सीमा रेषेवर भारतीय सैनिकांची स्थिती कायम आहे अशी माहिती गेल्या आठवड्यात लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दिली होती. सीमावर्ती क्षेत्रात मूलभूत विकासाचे काम सुरू आहे.

दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झालेली चकमक आक्रमक होती. यात काही सैनिक किरकोळ जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

चीनचा भारतावर आरोप

या परिस्थितीला भारत जबाबदार असल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने आपल्या लेखात गलवान खोरे भागातील तणावपूर्ण परिस्थितीला भारत जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

वृत्तपत्राने चिनी सैन्याच्या माहितीच्या आधारावर असे सांगितले की, "भारताने या भागात सुरक्षा संबंधी बेकायदेशीर बांधकाम केले. यामुळे चिनी सैन्याला याठिकाणी सुरक्षा वाढवावी लागली. भारताने या तणावाची सुरुवात केली. आम्हाला विश्वास आहे की 2017 मध्ये उद्भवलेली डोकलामसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. कोव्हिड 19 मुळे भारतासमोर आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे जनतेचे लक्ष हटवण्यासाठी गलवान येथे तणावाचे वातावरण तयार केले जात आहे."

गलवान खोरे अक्साई चीनचा भाग आहे. त्यामुळे भारताकडून उचलण्यात येणारी पावलं भारत-चीन सीमा संबंधांचे उल्लंघन करणारी आहेत. असाही उल्लेख ग्लोबल टाईम्सने आपल्या लेखात केला आहे. शिवाय, मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारत गलवान खोऱ्यात सीमा ओलांडत चीनच्या भागात घुसखोरी करत आहे. असंही ग्लोबल टाईम्सनं म्हटलंय.

गलवान खोरे का महत्त्त्वाचे आहे ?

गलवान खोरे वादग्रस्त अक्साई चीनमध्ये आहे. गलवान खोरे लडाख आणि अक्साई चीनच्या मधोमध भारत-चीन सीमेच्या जवळ आहे.

या ठिकाणी असलेली नियंत्रण रेषा अक्साई चीनला भारतापासून वेगळी करते. अक्साई चीनवर भारत आणि चीन दोघंही दावा करतात. चीनच्या दक्षिण शिनजियांग आणि भारताच्या लद्दाखपर्यंत हे खोरे पसरलेलं आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यीपीठाचे माजी प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे विश्लेषक एस डी मुनी सांगतात, भारतासाठी ही जागा सर्वच बाजूनं महत्त्वाची आहे. कारण पाकिस्तान, चीनच्या शिनजियांग आणि लडाखच्या सीमेला लागून हा परिसर आहे. 1962 च्या युद्धातही गलवान खोरे युद्धाचे प्रमुख केंद्र होता.

कोरोनाच्या संकटात सीमेवर तणाव

एका बाजूला संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. भारतातही एक लाखहून अधिक रुग्णसंख्या आहे. युरोप आणि अमेरिका चीनवर वारंवार प्रश्न उपस्थित करत आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही देशांनी नव्या वादाला सुरुवात केलीय.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

एसडी मुनी सांगतात, "भारत सध्या अशा भागांवर आपला दावा मजबूत करत आहे ज्या भागांना तो आपलं मानतो. पण ते भाग वादग्रस्त आहेत.

"याची सुरुवात 1958 मध्येच झाली होती. जेव्हा चीनने अक्साई चीनमध्ये रस्ता बनवला जो कराकोरम रोडला जोडला जातो आणि पाकिस्तानच्या दिशेनेही जातो. जेव्हा रस्त्याचे काम सुरू होते तेव्हा कुणाचेही लक्ष त्याकडे गेले नाही. पण जेव्हा लक्षात आले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आक्षेप घेतला. तेव्हापासूनच भारताकडून हे सांगण्यात येते की अक्साई चीनला चीननेच हडपलं."

तेव्हा भारताने याबाबत कोणतीही लष्करी कारवाई केली नव्हती. आता भारताला या जागेवर दावा सांगायचा असल्याने भारताकडून कारवाई करण्यात येत आहे. ज्याप्रकारे पीओके आणि गिलगीट-बालटीस्तान विषयी भारताने आपला हक्क मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.

एस. डी. मुनी सांगतात की चीन गलवान खोऱ्यात भारताकडून होत असलेल्या बांधकामाला बेकायदा मानत आहे. कारण भारत-चीनमध्ये सीमा रेषेला मानलं जाईल आणि त्याठिकाणी बांधकाम केले जाणार नाही असा करार झाला आहे. पण चीनने आधीच त्या ठिकाणी आवश्यक तेवढे सैन्य उभे केले आहे. आहे ती परिस्थिती कायम ठेवण्याची भाषा चीनकडून केली जात आहे. भारताकडूनही त्या ठिकाणी परिस्थिती मजबूत केली जात आहे.

भारताची बदलती रणनीती

पीओकेपासून अक्साई चीनबाबत भारत रणनीती का बदलत आहे? भारत असुरक्षित आहे की अधिक आक्रमक झाला आहे?

एस. डी. मुनी यांच्यानुसार भारत आक्रमक झालेला नाही. तर तो अधिक स्पष्ट बोलू लागला आहे. ज्या जागांवर तो आपला अधिकार असल्याचे सांगत होता त्या जागांवर तो आता आपला अधिकार दाखवू लागलाय.

ते सांगतात की 1962 च्या तुलनेत आताचा भारत अधिक सक्षम आहे. आर्थिकदृष्ट्याही मजबूत आहे. शिवाय, ज्या पद्धतीनं चीन समोर आलाय त्याच्यापासून धोका वाढला आहे. पाकिस्तानशीही संबंध अत्यंत बिघडलेले आहेत. त्यामुळे धोका वाढत चाललाय. या परिस्थितीत भारत सरकारला वाटत आहे की आपल्या सीमा सुरक्षित करणं गरजेचं आहे. जर अक्साई चीनमध्ये भारताने काही सुरक्षेसाठी काम केले असेल तर ते चीनवर लक्ष ठेवता यावे यासाठी असावे.

फोटो स्रोत, Getty Images

ग्लोबल टाईम्सने एका संशोधकाच्या आधारावर लिहिले आहे की गलवान खोऱ्यात डोकलामसारखी परिस्थिती नाही. अक्साई चीनमध्ये चीनी सेना मजबूत आहे आणि तणाव वाढला तर भारताला याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते.

याविषयी जाणकारांचेही हेच म्हणणे आहे. चीनची स्थिती त्या ठिकाणी मजबूत असल्याने भारताचे नुकसान होऊ शकते. पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळे चीनची कूटनीती दुबळी झाली आहे. युरोपीय देश आणि अमेरिका चीनवर उघडपणे आरोप करत असताना भारताने चीनविरोधात आतापर्यंत कोणतंही मोठं वक्तव्य केलेले नाही. अशा परिस्थितीत चीन भारताकडून समतोल भूमिकेची अपेक्षा करत आहे. भारत याविषयी चीनसोबत करार करण्याच्या मन:स्थितीत आहे.

देशांवर दवाब वाढेल

ऐन कोरोनाच्या संकटात दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव वाढल्याने त्यांच्यावर दबाव वाढेल. भारत कोरोनावरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठी सीमा वाद निर्माण करत असल्याचा आरोप चीननं केलाय.

एसडी मुनी सांगतात, कोरोना संकटाचा सामना हा वेगळा विषय आहे. देशाची सुरक्षा हा दुसरा मुद्दा आहे. चीनसुद्धा दक्षिण चीन समुद्रात आपल्या नौदलाचा विस्तार करत आहे. संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करण्यात व्यस्त आहे. पण सैन्य दल कोरोनाचा सामना करत नाहीय. सैन्य आपलं काम करेल. हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत. जी कोरोनाच्या आधीही होती. आताही आहेत आणि भविष्यातही राहतील. त्यामुळे चीनची भूमिका योग्य नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)