कोरोना: टेस्टिंगचं टार्गेट पूर्ण पण अचूकतेचं काय?

  • श्रुती मेनन
  • बीबीसी रिअॅलिटी चेक
कोरोना, रॅपिड एंटीजन

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

कोरोना चाचणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या काही आठवड्यात दरदिवशी 10 लाख कोरोना चाचण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येईल. हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं का? ज्या चाचण्या घेतल्या जात आहेत त्या विश्वसनीय आहेत का?

सध्या देशात किती चाचण्या होत आहेत?

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एक आठवड्याचा हिशोब पाहिला तर भारतात दरदिवशी 5 लाख चाचण्या घेतल्या जात आहेत. अवर वर्ल्ड इन डेटा नावाच्या वेबसाईटने यासंदर्भात माहिती दिली आहे.

केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात येणारे चाचण्यांचे आकडे थोडे अधिक आहेत. हा मोठा आकडा आहे परंतु याकडे भारताच्या प्रचंड लोकसंख्येच्या माध्यमातून पाहायला हवं.

भारतात दरदिवशी एक लाखांमागे 36 चाचण्या होत आहेत. दक्षिण आफ्रिकेत हे प्रमाण 69, पाकिस्तानात 8, युकेत 192 असं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी दरदिवशी 10 लाख चाचण्या घेण्यात व्हाव्यात असं वाटतं. भारताची लोकसंख्या 130 कोटीपेक्षा जास्त आहे.

भारतात टेस्ट किट कोणते वापरले जात आहेत?

कोरोनाविरुद्धच्या लढाईत टेस्टिंग अर्थात चाचण्या हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र ज्या पद्धतीने चाचण्या होत आहेत ते जाणकारांसाठी चिंतेचा विषय आहे.

संपूर्ण जगभर पीसीआर (पॉलीमेरास चेन रिअक्शन) टेस्ट सर्वमान्य आहे. यामध्ये जनुकीय गोष्टींना स्वॅब सँपलपासून विलग केलं जातं.

प्रथिनं आणि चरबीला जनुकीय गोष्टींपासून विलग करण्याकरता रसायनांचा वापर केला जातो. सँपल्स मशीन अनॅलिसिस साठी ठेवलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

चाचण्यांसाठी कोणते किट वापरले जातात?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

याला टेस्टिंगचे गोल्ड स्टँडर्ड अर्थात सर्वोत्तम मानकं म्हणून मानलं जातं. भारतात याची किंमत खूप जास्त आहे आणि टेस्टिंग प्रोसेसला आठ तास लागतात. अंतिम निष्कर्ष हाती येण्यासाठी एक दिवस लागू शकतो. सँपल्स प्रयोगशाळेपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो यावरही ते अवलंबून आहे.

टेस्टिंगची क्षमता वाढवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी स्वस्त आणि झटपट निकाल देणाऱ्या प्रणालींचा वापर सुरू केला. याला रॅपिड एंटीजन टेस्ट म्हटलं जातं. जगभरात डायग्नोस्टिक किंवा रॅपिड टेस्ट म्हटलं जातं.

ही टेस्ट प्रोटिनला ज्याला एंटीजन म्हटलं जातं त्याला वेगळं करते. या टेस्टचा निकाल 15 ते 20 मिनिटात मिळू शकतो.

मात्र हे टेस्टिंग पूर्णत: विश्वसनीय नाही. काही प्रकरणात या टेस्टची अचूकता निम्म्याहूनही कमी आहे. व्हायरस हॉटस्पॉट्स आणि हेल्थकेअर सेटअपमध्ये या टेस्टचा वापर प्रामुख्याने होतो.

तुम्हाला आता कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे या टेस्टमधून कळतं. अँटीबॉडी टेस्टमध्ये तुम्हाला आधी कोरोनाचा संसर्ग झाला होता का हे कळू शकतं. दोन्ही टेस्टमध्ये फरक आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दक्षिण कोरिया, बेल्जियम आणि देशातच विकसित करण्यात आलेल्या तीन एंटीजन टेस्टला मंजुरी दिली आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

टेस्ट किट

यापैकी एकाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि एम्सने पारखून घेतलं आहे. अचूक निर्णय देण्याची क्षमता 50 ते 84 टक्के आहे हे पडताळणीतून स्पष्ट झालं.

पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे प्राध्यापक श्रीनाथ रेड्डी सांगतात एंटीजन टेस्टच्या माध्यमातून एकूण संख्येपैकी निम्म्याहून अधिक जणांना संसर्ग झाला आहे की नाही हे समजू शकत नाही. याची काही कारणं आहेत. स्वॉब सँपल नीट नसणं, व्यक्तीचं व्हायरल लोड, टेस्टिंग कीटचा दर्जा असे काही मुद्दे आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने यासंदर्भात नियमावली जारी केली होती. एंटीजन टेस्टचा निकाल निगेटिव्ह आला आणि लक्षणं दिसत आहेत तर त्या व्यक्तीची पीसीआर टेस्टही करायला हवी. जेणेकरून चुकीच्या निगेटिव्ह निकालाची शक्यता पडताळली जाईल.

रॅपिड टेस्टची शिफारस जगभरात करण्यात येते का?

विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे का हे तपासण्यासाठी एंटीजन्स टेस्टचा उपयोग होऊही शकतो आणि नाहीही.

युकेत सर्वसाधारणपणे करण्यात येणाऱ्या रॅपिड टेस्टच्या चुकीच्या निकालाचं प्रमाण 20 टक्के आहे.

ऑक्सफोर्ड नैनोपोर विकसित टेस्ट किटची अचूकता 98 टक्क्यांपर्यंत आहे. मात्र याचीही अजून संशोधक आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून स्वतंत्र पडताळणी बाकी आहे.

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन,

कोरोना चाचणी

या दोन रॅपिड टेस्ट एंटींजन ऐवजी जनुकीय गोष्टी वापरतात. त्यामुळे त्या विश्वासार्ह आहेत.

कोणत्याही रॅपिड टेस्टचे निष्कर्ष निगेटिव्ह आले तर पीसीआर टेस्ट करून घ्यायला हवी असं जागतिक आरोग्य संघटना आणि युएस फूड अँड ड्रग्ज अडमिनिस्ट्रेशन या दोन्ही संघटनांनी म्हटलं आहे.

दुकानात जाऊन खरेदी करता येईल असं टेस्टिंग किट तयार करण्याचा अमेरिकेचा विचार आहे. नाक किंवा थुंकीवाटे तुम्हाला स्वॉब घेता येईल. प्रेगनन्सी टेस्ट किटप्रमाणे काही मिनिटात निकाल तुमच्या हातात असेल. लॅब टेस्टइतकी कामगिरी चांगली असेल तेव्हाच या किटला मंजुरी मिळेल असं युएसएफडीएने म्हटलं आहे.

राज्याराज्यात कोरोनाचे आकडे कळत नाहीयेत का?

टेस्टिंग प्रोटोकॉल स्वत: निश्चित करणाऱ्या राज्यांनी रॅपिड एंटींजन टेस्ट करायला सुरुवात केली आहे. देशात होणाऱ्या एकूण टेस्ट्सपैकी 30 टक्के एंटीजन टेस्ट असल्याचं ICMRने 4 ऑगस्टला म्हटलं होतं.

दिल्ली यामध्ये अव्वल क्रमांकावर होतं. जून महिन्यातच दिल्लीत एंटींजन टेस्टला सुरुवात झाली होती. बाकी राज्यांनीही दिल्लीचा कित्ता गिरवला. दिल्लीने 18 जूनपासून एंटींजन टेस्ट करायला सुरुवात केली. 29 जूनपर्यंत कोणताही डेटा उपलब्ध नाही.

29 जून ते 28 जुलैपर्यंतच्या आकडेवारीचा आम्ही अभ्यास केला. त्यानुसार दिल्ली सरकारतर्फे 5,97, 590 टेस्ट घेतल्या. यापैकी 63 टक्के एंटींजन टेस्ट होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कोरोना

उपलब्ध डेटानुसार एंटींजन टेस्ट निगेटिव्ह आलेल्यांपैकी एक टक्क्यांहून कमी लोकांनी पीसीआर टेस्ट केली. ज्या लोकांनी ही टेस्ट केली त्यापैकी 18 टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

गेल्या काही दिवसात दिल्लीत कोरोना संसर्गाचे आकडे कमी होऊ लागले आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते याचं एक कारण अनेकांना कोरोना झाल्याचं समजलेलंच नाही.

पीसीआर टेस्ट करण्यासाठी आता अधिकारी वर्ग आग्रह करत आहे.

मात्र डेटा पाहिला तर लक्षात येतं की 50हून अधिक टक्के टेस्ट एंटींजन स्वरुपाच्याच होत आहेत. या टेस्ट हॉटस्पॉट आणि हेल्थकेअर केंद्रासाठी आहेत असं दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.

कर्नाटकने जुलै महिन्यात एंटींजन टेस्ट सुरू केल्या. 30 जिल्ह्यात 35,000 टेस्ट घेणं कर्नाटकचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झालेलं नाही परंतु एंटीजन टेस्टची संख्या वाढते आहे. पीसीआर टेस्टची संख्या कमी होते आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, जुलैच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये टेस्टचे निकाल निगेटिव्ह आलेल्या परंतु लक्षणं असलेल्या लोकांनी पीसीआर टेस्ट केल्यानंतर यापैकी 38 टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं.

तेलंगण सरकारनेही जुलैमध्ये एंटीजन टेस्टचा परीघ वाढवला. तेलंगण सरकारतर्फे पीसीआर आणि एंटीजन टेस्टची आकडेवारी जारी करण्यात येत नाही. मात्र सध्या सरकारी आणि खाजगी मिळून 31 प्रयोगशाळांना पीसीआर टेस्ट करण्याची परवानगी आहे. एंटीजन टेस्ट करणाऱ्या 320 सरकारी प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात मुंबईत एंटीजन टेस्टची सुरुवात झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाची लक्षणं असलेले 65 टक्के लोक एंटीजन टेस्टमध्ये निगेटिव्ह आढळले. त्यांच्या पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या.

सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. अनुपम सिंह सांगतात, रॅपिड टेस्टचे काही फायदे आहेत. संसर्ग झाला आहे की नाही हे कळण्याची प्रक्रिया वेगवान होते.

मात्र संसर्ग झाला आहे हे कळू शकत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

रॅपिड एंटीजन टेस्ट टेस्टिंगचं टार्गेट पूर्ण करू शकतात. अधिकाधिक टेस्टिंग व्हावं ही लोकांची मागणीही पूर्ण होऊ शकते. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार नेमका कसा होतो आहे हे सांगण्यात अपयशी ठरण्याची जोखीम राहतेच. हे टाळण्यासाठी सातत्याने पीसीआर टेस्ट होणं आवश्यक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)