पाकिस्तानातून जोधपूरमध्ये आलेल्या कुटुंबातील 11 लोकांचा एकाच दिवशी मृत्यू

  • नारायण बारेठ
  • राजस्थानमधून बीबीसी हिंदीसाठी
पाकिस्तानातून आलेल्या एकाच कुटुंबातील 11 लोकांचा एकाच दिवशी मृत्यू

फोटो स्रोत, NARAYAN BARETH/BBC

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील देचू पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका शएतात पाकिस्तानातून आलेल्या एका विस्थापित कुटुंबातील 11 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. या कुटुंबातला फक्त एकच सदस्य जिवंत राहिला आहे.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळी किटकनाशके सापडली आहेत. जोधपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राहुल बारहट यांनी बीबीसीशी बोलताना घटनास्थळी फॉरेन्सिक एक्सपर्ट पोहोचल्याचं सांगितलं. या घटनेमागे प्रथमदर्शनी कौटुंबिक वाद असावा असं पोलिसांना वाटत आहे.

रविवारी या सर्वांचे मृतदेह शेतामध्ये दिसल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. हे सर्व भिल्ल आदिवासी समुदायाचे आहेत. आठ वर्षांपुर्वी ते पाकिस्तानातील सिंध प्रांतातून भारतात आले होते. त्यानंतर ते परत गेले नव्हते.

हे कुटुंब भाडेपट्ट्यावर शेती कसत होतं असं सांगितलं जात आहे. या कुटुंबातील फक्त केवलराम हे 37 वर्षांचे गृहस्थ घटनेतून वाचले आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

फोटो स्रोत, NARAYAN BARETH/BBC

फोटो कॅप्शन,

केवलराम

केवलराम यांच्या आई-वडिलांबरोबर एका भावाचा, तीन बहिणींचाही मृत्यू घटनेत झाला आहे तसेच केवलराम यांच्या एका मुलीचा आणि दोन मुलांचेही प्राण गेले आहेत. मृतांमधील 75 वर्षांचे बुधाराम या कुटुंबाचे प्रमुख होते.

जोधपूर जिल्ह्यातील लोडता अचलावता गावातच त्यांनी शेतामध्ये घर बांधलं होतं. केवलराम घटनास्थळापासून दूरवर जाऊन झोपले होते म्हणून ते वाचले अशी प्राथमिक माहिती आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर इथं लोकांची गर्दी होऊ लागली आणि मग पोलिसांना कळवण्यात आलं.

या घटनेचं कारण काय असावं याचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक बारहट यांनी बीबीसीला सांगितलं. त्यासाठी फॉर्नेन्सिक एक्स्पर्टची मदत घेण्यात येत आहे.

फोटो स्रोत, NARAYAN BARETH/BBC

फोटो कॅप्शन,

जोधपूरः पाकिस्तानातून आलेल्या एकाच कुटुंबातील 11 लोकांचा एकाच दिवशी मृत्यू

पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदुंसाठी काम करणाऱ्या 'सीमांत लोक संघटने'चे अध्यक्ष हिंदूसिंह सोढा यांनी हे लोक नागरिकत्वासाठी विनंती करत होते असं सांगितलं.

सोढा सांगतात, "ही अत्यंत दुःखद घटना आहे. पाकिस्तानातून आलेल्या हजारो हिंदू अल्पसंख्यक समाज दुःखात बुडून गेला आहे. या घडीला किमान वीस हजार लोक भारताच्या नागरिकत्वासाठी प्रयत्न करत आहेत.

त्यातल्या दहा हजार लोकांनी नागरिकत्वासाठी लागणाऱ्या अटीही पूर्ण केल्या आहेत."

या घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व लोक भिल्ल समुदायाचे होते. आज आदिवासी दिवस साजरा केला जात असतानाच ही घटना घडली आहे. पाकिस्तानात भिल्ल समुदायाला अनुसुचित जातीमध्ये वर्गीकृत केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)