बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद का झालाय?

  • स्वाती पाटील
  • बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूरहून
बेळगाव

फोटो स्रोत, BBC/Swati Patil

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती या गावामध्ये मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 5 ऑगस्ट रोजी बसवण्यात आला होता. मात्र हा पुतळा तिथून हटवण्यात आल्यानं गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जोपर्यंत पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी बसवण्यात येत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गावामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मनगुत्ती ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावानुसार मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासोबत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वाल्मिकी अशा महापुरुषांचे समान उंचीचे पुतळे उभारण्याची परवानगी आहे. मात्र जागा निश्चित नसल्याने हे पुतळे अजून बसवण्यात आले नव्हते.

मनगुत्ती गावातील एका गटाने 5 ऑगस्ट रोजी मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला होता. मात्र परवानगी नसताना पुतळा बसवण्याला दुसऱ्या गटातील युवकांनी विरोध सुरू केला.

फोटो स्रोत, BBC/Swati Patil

6 ऑगस्ट रोजी परवानगी येईपर्यंत पुतळा झाकून ठेवण्यात यावा असं तहसीलदाराकडून सांगण्यात आले. मात्र 7 ऑगस्ट रोजी रात्री पोलीस बंदोबस्त मध्ये हा पुतळा तिथून हटवण्यात आला. हा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी बसवण्यात यावा यासाठी ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं गावकरी संध्याराणी पाटील यांनी सांगितले.

मनगुत्ती गावातील ज्या चौकात हा पुतळा बसवला आहे, त्या ठिकाणी दर पाच वर्षांनी होणाऱ्या यात्रेदरम्यान उत्सवमूर्ती खेळवली जाते. त्यामुळं काही संघटनांनी त्या ठिकाणी पुतळा बसवण्यात विरोध केला आहे. मात्र जर आता मुलांनी पुतळा बसवला असताना तो हटवणे योग्य नाही. त्यामुळे पुतळा त्याच ठिकाणी ठेवण्यात यावा ,असं गावकरी सतबा कदम यांनी म्हटलं.

राजकीय पक्षांचीही उडी

या घटनेचा शिवसेनेने तीव्र शब्दात विरोध केला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी इथं कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेने कर्नाटक सरकारचा निषेध करत आंदोलन केले.

भाजप सरकार केवळ निवडणुकीपुरते शिवाजी महाराजांवर बेगडी प्रेम दाखवते, असा आरोप करत शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेणार नाही असं शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले. शिवसेनेकडून उद्या मनगुत्ती गावामध्ये धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे

फोटो कॅप्शन,

एकनाथ शिंदे यांचं पत्र

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी तातडीने या संदर्भात लक्ष देऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुन्हा स्थापना करावी अशी मागणी सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्राद्वारे केली आहे.

फोटो स्रोत, BBC/Swati Patil

मनगुत्ती गावामध्ये ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार 2019 मध्ये पाच समाजातल्या लोकांना पुतळा बसवण्याची परवानगी देण्यात आली होती. यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,श्रीकृष्ण परमात्मा, वाल्मिकी आणि बसवण्णा हे पुतळे बसण्याची परवानगी देण्यात आली होती.

मात्र या समाजांमध्ये समन्वय नसल्याने हे पुतळे अजून बसवण्यात आले नव्हते. असं असताना दोन दिवसांपूर्वी इथल्या मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. या गोष्टीला बाकीच्या संघटनांनी विरोध केला.

पाचही पुतळे परवानगीनंतर बसवण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे विनापरवानगी बसवलेला हा पुतळा हटवण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, BBC/Swati Patil

गावातील लोकांमध्ये समन्वय साधून एकमताने हा प्रश्न सोडवण्यासाठी पोलिसांकडून समजूत घालण्यात येत आहे. मात्र पुतळा आजच्या आज त्याच ठिकाणी बसवण्यात यावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.

तर कर्नाटक सरकारने मागणी मान्य केली नाही तर प्रत्यक्ष गावात जाऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

आठ दिवसात प्रश्न निकाली काढण्यावर बैठकीत एकमत

दरम्यान, पुतळा बसवण्याच्या वादावर गावात नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी, आणि मनगुत्ती गावातील पंचांनी निर्णय घेतला. त्यानुसार येत्या आठ दिवसात हा प्रश्न निकाली काढण्याबाबत एकमत झाले.

शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत योग्य त्या कायदेशीर बाबी पूर्ण करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं गावातील पंच मंडळी पुढाकार घेऊन हा प्रश्न कसा सोडवतात यावर पोलीस , महसूल विभाग आणि तहसीलदार यांचे लक्ष असणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)