'नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार'- गुलाबराव पाटील #5मोठ्या बातम्या

नारायण राणे, नाणार, शिवसेना
फोटो कॅप्शन,

नारायण राणे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार- गुलाबराव पाटील

नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळंच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करून स्वत:चा टीआरपी म्हणजे प्रसिद्धी मिळवायची असते अशी टीका शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. खासदार आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या राणे यांनी नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेवर केलेल्या टीकेला गुलाबरावांनी प्रत्युत्तर दिलं. 'लोकमत न्यूज 18 'ने ही बातमी दिली आहे.

नारायण राणे स्वत: मुख्यमंत्री असताना कोकणात नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी बोलूच नये. ते जर असे बोलले नाहीत, तर त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही असा चिमटाही त्यांनी काढला.

दरम्यान काही दिवसांपूर्वी कोकणातील नाणार प्रकल्पासंदर्भात नारायण राणे म्हणाले होते की, नाणार प्रकल्पाला काही स्थानिकांनी समर्थन दिलं. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घूमजाव आहे. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे.

नाणारबाबत आपली भूमिका व्यक्त करताना राणे म्हणाले, जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार आहोत.

2. आठ दिवसात शिवरायांचा पुतळा बसणार, कर्नाटक सरकारचं आश्वासन

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात काही दिवसांपूर्वी हटवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात पुन्हा बसवण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले आहे. परिस्थिती पाहून कर्नाटक सरकारने सावध भूमिका घेतल्याचं चित्र आहे. 'टीव्ही9'ने बातमी दिली आहे.

मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला. मनगुत्ती येथील नागरिक रस्त्यावर उतरले. यानंतर पोलिसांचा दबाव कमी झाला आणि पुतळा बसवण्यात आला. मात्र कर्नाटक सरकारने पुतळा हटवला. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. विविध राजकीय पक्ष तसंच सामाजिक संघटनांनी जोरदार टीका केली.

3. देश भावुक झाला तेव्हा फाईल्स गायब झाल्या- राहुल गांधी

जेव्हा जेव्हा देश भावुक झाला आहे, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या आहेत असा टोला राहुल यांनी मोदी सरकारला लगावला आहे. मल्ल्या असो की रफाल, नीरव मोदी असो की चोक्सी.

हरवलेल्या यादीत आता चीनच्या घुसखोरीच्या कागदपत्रांचा देखील समावेश झाला आहे. हा योगायोग नाही, हा मोदी सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे अशी टीका राहुल यांनी केली आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं उद्घाटन केलं. त्यासंदर्भात राहुल म्हणतात, देशात वाढत असलेली असत्याची घाणही साफ करायची आहे. पंतप्रधान चीनच्या आक्रमणाविषयी सत्य देशाला सांगून या सत्याग्रहाची सुरुवात करणार का?

नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोनाचा संसर्ग रोखू शकले नाहीत मात्र ते जनतेला खोटी स्वप्नं दाखवत राहिले अशी टीका काही दिवसांपूर्वी राहुल यांनी केली होती.

4. नेपाळमध्येही भव्य राममंदिर- केपी शर्मा ओली

भगवान राम यांचा जन्म नेपाळमध्ये झाला असल्याचा दावा करणारे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी तिथे भव्य राम मंदिर उभारण्याचा निर्णय जाहीर केला. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली

नेपाळमधील ठोरीजवळ अयोध्यापुरी ही भगवान राम यांची जन्मभूमी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. रामाचे खरे जन्मस्थळ नेपाळमध्येच आहे. सांस्कृतिक अतिक्रमणे करताना भारत खोट्या तथ्यांच्या आधारे उत्तर प्रदेशातील अयोध्या ही राम जन्मभूमी असल्याचा दावा सांगत आहे असं केपी शर्मा ओली म्हणाले होते.

ओली यांनी ठोरी आणि माडी येथील लोकप्रतिनिधींना काठमांडू इथे बोलावून भगवान श्री रामजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्यासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले. माडी पालिकेचे नाव अयोध्यापुरी करण्यास सांगितलं आहे. दोन वर्षात रामनवमीच्या मुहुर्तावर मंदिराचे लोकार्पण करण्यात येईल असंही ते म्हणाले.

5. संजय राऊत खोटं बोलतात- सुशांत सिंहचे मामा

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले नव्हते. संजय राऊत चुकीची माहिती देताना खोटं बोलत आहेत असं सुशांतचे मामा आर.सी. सिंह यांनी म्हटलं आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच राऊत यांनी चुकीचे विधान केले आहे. असं बोलून ते आमची प्रतिमा खराब करत आहेत. असं करणं योग्य आहे का? असा सवालही त्यांनी केला. बिहारमधील प्रत्येकजण जाणतो की सुशांत सिंहच्या वडिलांनी केवळ एकच विवाह केलेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सुशांत सिंह राजपूत

संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक सदरात लिहिलं होतं की सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे चांगले संबंध नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते.

त्यामुळे वडिलांशी भावनिक नातं उरलं नव्हतं. वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एफआयआर दाखल करायला लावला. मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारमधून पोलीस आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहार पोलीस म्हणजे इंटरपोल नव्हे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)