बुद्ध पौर्णिमा: गौतम बुद्ध हे नेपाळी की भारतीय?

गौतम बुद्ध

फोटो स्रोत, Getty Images

आज वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.

खरी अयोध्या भारतात नाहीये, तर नेपाळमधील बीरगंजच्या पश्चिमेला असलेल्या एका गावात आहे, असं म्हणून नेपाळचे तत्कालिन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राम हे मूळ 'नेपाळी' असल्याचा दावा केला होता.

त्यांच्या या विधानावरून केवळ भारतातच नाही, तर नेपाळमध्येही उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.

त्यानंतर नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी स्पष्टीकरण देत म्हटलं की, "हे विधान कोणत्याही राजकीय हेतूनं करण्यात आलं नव्हतं आणि त्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. अयोध्या आणि त्याचं सांस्कृतिक महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीनं हे वक्तव्यं करण्यात आलं नव्हतं. रामायणातील वेगवेगळ्या ठिकाणांच्या भौगोलिक संदर्भाने हे विधान केलं गेलं होतं."

नेपाळ सरकारच्या या विधानानंतर राम मूळ नेपाळी की भारतीय हा वाद तर शमला, पण नंतर दिवसांपासून आता गौतम बुद्धांना भारतीय म्हणायचं की नेपाळी यावरून चर्चा सुरू झाली.

हा वाद सुरू झाला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या विधानानंतर. भारतीय उद्योग परिसंघाच्या एका वेबिनारमध्ये बोलताना एस जयशंकर यांनी म्हटलं होतं की, महात्मा गांधी आणि भगवान बुद्ध असे दोन भारतीय महापुरूष आहेत, ज्यांच्या विचारांना जगात आजही उजाळा दिला जातो.

या विधानावर नेपाळनं तीव्र नाराजी व्यक्त केली. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की, गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनीमध्ये झाला आहे, हे नाकारता येणार नाही अशी वस्तुस्थिती आहे.

नेपाळमधील 'फाउंटन ऑफ बुद्धिझम' युनेस्कोच्या यादीतील जागतिक वारसास्थळांपैकी एक आहे, असंही नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं.

नेपाळच्या या वारशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मान्यता दिली होती, याची आठवणही नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने करून दिली आहे. 2014 साली नेपाळच्या संसदेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की, जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धाची नेपाळ ही जन्मभूमी आहे. या गोष्टीची आठवण नेपाळनं करून दिली.

फोटो स्रोत, Getty Images

बौद्ध धर्माचा प्रसार हा नेपाळमधून जगाच्या अन्य भागात झाल्याचंही नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

नेपाळकडून आलेल्या या प्रतिक्रियेनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एस. जयशंकर यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता असं स्पष्टीकरण दिलं.

परराष्ट्रमंत्री हे दोन्ही देशांना बुद्धांचा जो संयुक्त वारसा मिळाला आहे, त्याबद्दल बोलले आहेत. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनीत झाल्याचं नाकारता येणार नाही, असं ते म्हणाले.

गौतम बुद्धांचं बालपण

गौतम बुद्ध नेमके कुणाचे या प्रश्नाचं उत्तर आम्ही काही अभ्यासकांना विचारलं.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता रुपा कुलकर्णी बोधी सांगतात की "राजकुमार सिद्धार्थाचा जन्म लुंबिनीजवळच्या वनात झाला होता असं वर्णन आहे, हे लक्षात घ्यायला हवं. त्यावेळी वनांवर कोणाचं अधिपत्य होतं का? तसंच तो जन्मतः बुद्ध थोडीच होता? तो राजकुमार सिद्धार्थ होता. पण तो घर सोडून रानात गेला आणि जिथे जिथे गेला त्या जागा भारतात आहेत. त्याला ज्ञानप्राप्ती झाली, ती जागाही भारतात आजच्या बोधीगया इथे आहे."

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

बुद्धांच्या काळात म्हणजे साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी नेपाळचं स्वतंत्र अस्तित्व नव्हतं आणि भारत म्हणून एकसंध देशही नव्हता. तेव्हा या प्रदेशात छोटी छोटी स्वायत्त गणराज्यं होती. त्यातल्याच एका गणराज्याचा म्हणजे कपिलवस्तूचा सिद्धार्थ हा राजकुमार होता. त्याचे वडील शुद्धोदन हे एक शाक्य राजे होते तर आई माया आजच्या नेपाळमध्ये असलेल्या देवदह इथली होती.

सिद्धार्थाचं बालपण गेलं, ती कपिलवस्तू नेमकी कुठे होती, याविषयीही तज्ज्ञांचे दोन मतप्रवाह आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात इंडॉलॉजीच्या असिस्टंट प्रोफेसर आणि पुरातत्वज्ज्ञ मंजिरी भालेराव त्याविषयी माहिती देतात. "भारतातील पिपराहा आणि नेपाळमधील तिलौराकोट या दोन्ही जागा कपिलवस्तू असाव्यात असं मानलं जातं. ढोबळमानानं त्यांचं राज्य हा आजच्या नेपाळ आणि भारताच्या सीमेवरील प्रदेश होता असं मानलं जातं."

ज्याने असा अहिंसेचा संदेश दिला त्याच्यावरूनच असे वाद घालणं योग्य नाही. त्याचं तत्वज्ञान सगळीकडे कसं पोहोचेल आणि जगात शांतता कशी पसरेल हे पाहायचं की तो कुठल्या गावचा यावरून वाद घालायचा हा विचार सर्वांनीच करायला हवा.

बुद्धाला हे हवं होतं, की लोकांमध्ये भांडणंच होणार नाही, द्वेष पसरणार नाही. ते विसरून लोक नेमकं भांडत आहेत. बुद्ध आता जपानचाही आहे, चीनचाही आहे, बौद्धेतरांचाही आहे, सर्वांचा आहे. शेवटी बुद्धानं जगाला धम्म दिला, एक जीवनपद्धती दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)