नवाब मलिक: 'भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादीत परत येण्यास आतुर'

नवाब मलिक

फोटो स्रोत, Nawab Malik/FACEBOOK

राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारी असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. या बातम्या बिनबुडाच्या आहेत. असं ते म्हणाले.

उलट निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

यावर अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. लवकरच निर्णय घेऊन हे जाहीर केलं जाईल असं मलिक यांनी म्हटलं.

राणा जगजितसिंह पाटील, बबनराव पाचपुते, नमिता मुंदडा, शिवेंद्र राजे भोसले हे नेते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाऊन आमदार म्हणून निवडून आले होते.

विरोधकांकडून आमचे आमदार जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहे यावर नवाब मलिक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे, असं राष्ट्रवादीने पत्रक काढून म्हटले आहे.

आमचे आमदार जाण्याऐवजी निवडणुकीच्या अगोदर भाजपात गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत यायला आतुर झाले आहेत. परंतु यावर कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र यावर लवकरच निर्णय होवून त्याची माहिती दिली जाईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केल्याचं पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं जाईल असं कर्नाटकातील बी. एस. येडियुरप्पा सरकारमधील मंत्री शशिकला जोल्ले यांनी नुकताच म्हटलं आहे.

कोरोना संकट संपल्यावर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल असं कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी म्हटलं होतं. नारायण राणे यांनी देखील नुकताच म्हटलं की लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या मनात जे आहे ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऑपरेशन लोटस होणार का ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी बीबीसीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुलाखत घेतली होती. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल का? असा प्रश्न बीबीसी मराठीने त्यांना विचारला होता. तेव्हा सध्या तरी आमचा तसा काही विचार नाही पण भविष्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणारच नाही असं मी सांगू शकत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांचं वक्तव्य आलेलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)