#BINOD : बिनोद कोण आहे? सोशल मीडियावर त्याचे मीम्स का ट्रेंड होत आहेत?

बिनोद कोण आहे? सोशल मीडियावर त्याचे मीम्स का ट्रेंड होत आहेत?

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर, फेसबुक इन्स्टाग्रामवर नुसतं हेच नाव चर्चेत आहे. आणि का बरं? याचं उत्तर कुणाकडे स्पष्टपणे मिळत नाही.

त्यावरचे मीम्स इतके व्हायरल झाले आहेत, की एकाने पेटीएमला ट्विटरवर आव्हान दिलं - हिंमत असेल तर तुमचं ट्विटर प्रोफाईल नाव बिनोद करून दाखवा.

आणि पेटीएमने ते केलंसुद्धा.

कोण आहे हा बिनोद?

तर युट्यूबवर 'स्ले पॉईंट' नावाचं एक युट्यूब चॅनल आहे. अभ्युदय आणि गौतमी नावाच्या दोन तरुणांनी हे चॅनल काही वर्षांपूर्वी सुरू केलं होतं. ते इंटरनेटवरच्या ट्रेंडिंग विषयांवर गप्पा करतात, काही रंजक व्हीडिओ बनवतात.

काही दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हीडिओ बनवला की कसं युट्यूबच्या कमेंट्स सेक्शनमध्ये लोकांनी कचरा फेकलेला असतो. त्या व्हीडिओचं टायटलच होतं - Why Indian Comments Section is Garbage (BINOD)

फोटो स्रोत, Youtube grab

त्यात एक नाव प्रामुख्याने लक्षात आलं, ते म्हणजे हेच बिनोद. बिनोद थरू नावाच्या एका व्यक्तीने या युट्यूब चॅनलच्या व्हीडिओंच्या कमेंट्समध्ये एकच कमेंट टाकली होती - BINOD, म्हणजेच स्वतःचं नाव.

या व्हीडिओचा उद्देश होता लोकांना हे दाखवणं की युट्यूबच्या काही व्हीडिओंमधल्या कमेंट्स किती निरुपयोगी असतात.

हा व्हीडिओ पाहून इतर अनेक लोकप्रिय युट्यूबर्सनी त्यांच्या त्यांच्या कमेंट्स चेक केल्या. त्यात त्यांना कळलं, की अरे, बिनोदने त्यांच्याही व्हीडिओंमध्ये कमेंट केली आहे.

सर्व ट्रेंडिंग व्हीडिओंमध्ये एकच कमेंट - BINOD.

त्यामुळे लोकांना प्रश्न पडला की अरे हा बिनोद आहे तरी कोण. पण त्याबद्दल कुणालाच काही कळू शकलेलं नाही अजून तरी.

ज्या स्ले पॉइंटच्या युट्युबर्सनी हा कचरा कमेंट्सवाला व्हीडिओ केला होता, त्यांनी आणखी एक व्हीडिओ केलाय, ज्यात त्यांनी याच बिनोदचा शोध घेतला आहे.

पण त्यांनाही बिनोद थरू काही सापडला नाही.

पण मजेची बाब म्हणजे हा बिनोद अगदी ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर ट्रेंड होऊ लागला. #Binod असा हॅशटॅग वापरला जाऊ लागला.

कुणी मीम्स बनवले तर कुणी फक्त #Binod वापरून काहीच्या काही ट्वीट्स केले. त्यामुळे झालं असं की मुंबई, नागपूर आणि जयपूर पोलीसही बिनोदचा शोध घेऊ लागले..

म्हणजेच, लोक कमेंट्सच्या कचऱ्यातून मीम्स बनवू लागले.

फोटो स्रोत, TWITTER

अर्थात बिनोद कोण आहे, तो काय करतो, कुठे असतो, हे अजूनही कुणाला ठाऊक नाही. पण आम्हाला वाटतं बिनोद हा इंटरनेटवरचा डॉन आहे, क्योंकी कमसे कम 'तीन मुल्को की पुलिस उसे ढूंढ रही है'!

फोटो स्रोत, TWITTER

बिनोद केला बाबा, फक्त बिनोद! आणि बघा ना, हसतखेळत तुम्ही ही बातमी इथवर वाचलीसुद्धा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)