कोरोना महाराष्ट्र: आशासेविकेचा सवाल, 'आज मला मारलं, उद्या माझ्या मुलाला काही केलं तर?'

  • अनघा पाठक
  • बीबीसी मराठी
आशा

"काही ध्यानीमनी नसताना त्यांनी गावात आमच्यावर हल्ला केला. माझे मिस्टर आणि मी जात होतो गाडीवरून. लाठीचा पहिला फटका माझ्या मिस्टरांच्या हातावर बसला, माझ्या मांडीला लागलं. गाडीवरून उतरलो तर त्यांनी पाठीत गुद्दे घातले," आशा गटप्रवर्तक रोहिणी आहिरे सांगत होत्या. रोहिणी नाशिक जिल्ह्यातल्या मळगाव या लहानशा गावात राहातात तसंच काम करतात.

आसपासच्या गावातल्या जवळपास 15 आशा सेविका त्यांना रिपोर्टिंग करतात. काही दिवसांपूर्वी रोहिणी आणि त्यांच्या पतीला मारहाण झाली होती. कारण? रोहिणी यांनी बाहेरगावहून आलेल्या काही लोकांना होम क्वारंटाईन व्हायला सांगितलं होतं आणि अशा लोकांची यादी आरोग्यविभागाला पाठवली होती.

'आमची नावं वर पाठवलीच कशी?' याचा राग येऊन गावातल्या काही लोकांनी रोहिणी आहिरेंना मारहाण केली. याआधीही आशा सेविकांना मारहाण होण्याच्या घटना राज्यात आणि देशातही घडल्या आहेत.

का होत आहेत सततचे हल्ले?

गावामध्ये असलेले कोरोना व्हायरसबद्दलचे गैरसमज याला कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. "लोकांना काय वाटतं की आशा वर्कर आपल्या दारी आली म्हणजे आता आपली बदनामी होणार," मळगावात आशा सेविका असलेल्या सुवर्णा देवरे म्हणतात.

"अनेकदा आशा वर्कर तपासणीसाठी जाते, तिथल्या लोकांचं तापमान घेते, काही लक्षणं दिसली तर ती वर कळवते. त्या माहितीच्या आधारावर आरोग्य विभागाचे कर्मचारी रूग्णाला दवाखान्यात अॅडमिट करायला घेऊन जातात आणि अशात जर रूग्ण दगावला तर सगळा रोष आशा वर्करच्याच माथी येतो. तुमच्यामुळे आमचा चांगलाचुंगला माणूस गेला असं म्हणत आशा वर्करला मारहाण केली जाते. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात अशीच घटना घडली," सुवर्णा पुढे सांगतात.

राजकीय समीकरणं की पुरुषसत्ताक विचारांचा पगडा?

आशा वर्कर्सला मारहाण झालेल्या अनेक घटनांमध्ये स्थानिक पुढाऱ्यांचा हात किंवा हल्लेखोरांना संरक्षण असल्याचं दिसून येतंय. याबद्दल बोलताना आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक संघटनेचे (आयटक) अध्यक्ष राजू देसले म्हणतात की, "ज्यांच्यावर लोकशाहीत लोकांचं प्रबोधन करण्याची जबाबदारी आहे, अनेकदा तेच लोक हल्ला करताना दिसून येत आहेत.

"या आशा वर्कर्स कोण आल्या आम्हाला शिकवणाऱ्या, आम्ही काय करावं आणि काय करू नये ते सांगणाऱ्या अशी या पुढाऱ्यांची मानसिकता असते. त्यातून अशा घटना घडतात. अनेकदा आपल्या गटातल्या माणसांनी नियम मोडले तरी त्यांनी संरक्षण देण्याची राजकीय समीकरणंही यात दिसून येतात," ते नमूद करतात.

या हल्ल्यांमागे पुरुषसत्ताक विचारांचा पगडा हेही एक कारण आहे असं राजू देसलेंना वाटतं. "आशा वर्कर्सचा जर तुम्ही वयोगट बघितला तर त्या साधारण तिशी-चाळीशीच्या आहेत. या आशा त्या त्या गावातल्या सुना असतात. आणि तिथल्या जेष्ठांना, विशेषतः पुरुषांना, आशांनी घराबाहेर जाऊ नका, क्वारंटाईन राहा असं सांगणं किंवा बाहेरगावी जाणार असलात तर आम्ही वर माहिती कळवू अशी भूमिका घेणं पटत नाही. त्यातूनही अशा हल्ल्यांच्या घटना घडतात.

"आशा वर्कर्सची नेमणूक मुळात केली होती ती मातामृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी. पण कोरोना काळात त्याच्यावर जबाबदारी वाढली आहे. अशा वेळेस त्यांनी गावातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊन, गावातल्या घरांचा नियमितपणे सर्व्हे करणं अपेक्षित आहे, आणि हेच अनेकांना खपत नाहीये," देसले सांगतात.

"लोक कधी कधी इतकं घाणेरडं बोलतात की सांगता सोय नाही. हिला काही काम नाही, आली उठून आमच्या दारावर, हिला पैसेच मिळत असणार त्याशिवाय कोणी येतं का असं काहीबाही ऐकवतात. आम्हाला कोरोनासाठी सरकार देतं महिना फक्त हजार रूपये. म्हणजे दिवसाला तीस रूपये फक्त.

"हेच जर कोणाच्या शेतात रोजाने कामाला गेलो तरी दिवसाला दीडशे रूपये मिळतात. बरं, कोरोना आला तरी आमची नेहमीची लसीकरण, गरोदर मातांची काळजी, त्यांची तपासणी ही काम थांबलेली नाहीत ना. इतकं सगळं करूनही लोक असं वागवत असतील तर नको वाटतं हे काम," सुवर्णा हताश आवाजात सांगतात.

'गावात फिरायला भीती वाटते'

अनेक आशांना आजकाल दडपणाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे त्या गावात काम करताना जीव मुठीत घेऊनच काम करत आहेत. "आज माझ्यावर आणि माझ्या मिस्टरांवर हल्ला झाला.

"उद्या माझ्या कामाचा राग मनात धरून माझ्या मुलाला रस्त्यात गाठलं, माझी पुतणी आहे तिला काही केलं तर या भीतीने मला झोप येत नाही. या परिस्थिीतीत कसं काम करायचं आशांनी किंवा गटप्रवर्तकांनी?," रोहिणी हतबलपणे विचारतात. गावात फिरायलाही भीती वाटत असल्याचं त्या म्हणतात.

'नातेवाईक पाठ फिरवतात तिथे आशा उभी असते'

कोरोनाच्या काळात कित्येकदा रक्ताच्या नातेवाईकांनी कोरोना पेशंटकडे पाठ फिरवल्याच्या घटना समोर आल्या आहेत पण तरीही आशा आपला जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात राहावा यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

"नातेवाईक सोडून जातात तरी आशा उभी राहाते. रात्री दोनला एखादी बाई अडली तर तिची प्रसुती करायला आशा तिला दवाखान्यात घेऊन जाते. आताही कोरोनाकाळात गावातल्या वृद्धांची, कोमॉर्बिडीची पेशंटची सगळी काळजी आशा घेतेय, त्यांच्याकडे लक्ष देतेय. पंतप्रधानांपर्यंत जो अहवाल जातो ना, तोही आशाने घरोघरी फिरून जमा केलेल्या माहितीवर आधारित असतो, आणि तरीही प्रत्यक्षात आशांची अवहेलना होते," सुवर्णा खेदाना सांगतात.

योग्य वेळी गुन्हे दाखल केले असते तर...

आपल्यावर सतत होण्याऱ्या हल्ल्यांचं कारण सरकारची निष्क्रियताही आहे असंही या आशांचं म्हणणं आहे. जेव्हा सुरुवातीलाच असे हल्ले झाले तेव्हाच अशा हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली असती तर पुढे इतरांची असे हल्ले करण्याची हिंमत झाली नसती असं सगळ्या जणी एकमुखाने सांगतात.

देशात सध्या 10 लाख आशा वर्कर कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी जवळपास 6 लाख आशा वर्कर गेल्या 6 आणि 7 ऑगस्टला आपल्या मागण्यांसाठी लाक्षणिक संपावर गेल्या होत्या. थकित मानधन तातडीने अदा करणं, मानधनात वाढ करणं, कोरोना सर्व्हे करताना सुरक्षेची साधनं पुरवणं आणि आशांच्या सुरक्षेची हमी घेणं या त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत.

कोरोना काळात आरोग्य कर्मचारी तसंच आशा वर्कर्सवर हल्ले करणाऱ्या व्यक्तींना 7 वर्षांपर्यत कैद आणि दंडाची शिक्षआ सुनावणारा अध्यादेश केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात काढला होता. राज्याचे आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र यड्रावरकर यांनीही बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं की आशांना न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण सरकारकडून असे हल्ले रोखण्यासाठी काहीही पावलं उचलली गेली नसल्याचं आशांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)