कोरोना पुणे सिरो सर्व्हे: 51.5 टक्के लोकांच्या शरीरात कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडी

  • मयांक भागवत
  • मुक्त पत्रकार
कोरोना

फोटो स्रोत, Sopa images

पुण्यातील 50 टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाच्या अॅंटीबॉडीज सापडल्या आहेत ही बाब समोर आली आहे. सिरो सर्व्हेतून ही गोष्ट समोर आली आहे.

स्वतंत्र शौचालय असणाऱ्या घरांमध्ये 45.3 टक्के, सार्वजनिक शौचालय वापरणाऱ्यांमध्ये 62.2 टक्के तर झोपडपट्टीत रहाणाऱ्या 62 टक्के लोकांच्या शरीरात कोव्हिड-19 विरोधातील अॅंटीबॉडी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे.

हा सर्व्हे सावित्रिबाई फुले विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसीएमआर) ट्रान्सलेशनल स्वास्थ आणि तंत्रज्ञान संस्था, फरीदाबाद आणि ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय, वेल्लोर आणि पुणे महापालिकेतर्फे करण्यात आला.

सिरो सर्वेक्षणाची माहिती

येरवडा, कसबापेठ-सोमवारपेठ, रस्तापेठ-रविवारपेठ, लोहियानगर-कासेवाडी, नवीपेठ-पार्वती या पुण्यातील पाच प्रभागांमध्ये सर्व्हे करण्यात आला. यासाठी 1664 लोकांची चाचणी करण्यात आली. या लोकांचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले होते.

20 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान सिरो सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

कोणत्या भागात किती प्रमाणात कोव्हिड-19 चा प्रसार

16 ऑगस्टला पुण्यातील सिरो सर्वेक्षणाचा रिपोर्ट पुणे विद्यापीठाच्या वेब-साईटवर अपलोड करण्यात आला आहे.

वयोगटानुसार अॅंटीबॉडीजचं प्रमाण

या रिपोर्टनुसार, पुरूष आणि स्त्रियांच्या शरीरात तयार झालेल्या कोव्हिड-19 अॅंटीबॉडी सर्वेमध्ये फारसा फरक आढळून आलेला नाही.

सर्वेक्षणासाठी 861 पुरुष आणि 803 स्त्रीयांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images

50.1 टक्के स्त्रीयांच्या तर 52.8 टक्के पुरूषांच्या शरीरात कोव्हिड-19 अॅंटीबॉडी तयार झाल्याचं दिसून आलं.

तर, 65 वर्षावरील व्यक्तींच्या शरीरात कोव्हिड-19 अॅंटीबॉडीच प्रमाण 39.8 टक्के असल्याचं आढळून आलं आहे.

सार्वजनिक शौचालय वापरणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता तयार झाली का?

स्वतंत्र शौचालय असणाऱ्या घरांमध्ये राहणाऱ्या 45.3 टक्के लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडी तयार झाल्यात असं हा सर्व्हे सांगतो.

सार्वजनिक शौचालय वापरणाऱ्या 62.2 टक्के लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडी असल्याचं समोर आलं आहे.

बंगल्यांमध्ये रहाणाऱ्यांमध्ये कोव्हिड-19 अॅंटीबॉडीजचे प्रमाण 43.9 टक्के आहे. तर, चाळीत 56 टक्के लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडीज असल्याचं दिसून आलं आहे.

झोपडपट्टीत 62 टक्के आणि आपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 33 टक्के लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडी

या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष काय?

या सर्व्हेचा अर्थ पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या स्कूल ऑफ हेल्थ सायन्सच्या संचालक डॉ. आरती नगरकर यांनी उलगडून सांगितला आहे.

51 टक्के लोकांमध्ये अॅंटीबॉडी आढळून आल्याचा अर्थ या लोकांना कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव होवून गेला आहे. हे लोक असिप्टोमॅटीक म्हणजे कोव्हिड-19 ची कोणतीही लक्षणं नसणारे होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या शरीरात अॅंटीबॉडी निर्माण झाल्याचा रिपोर्ट आमच्यासाठीही धक्कादायक होता. 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडी निर्माण होतील असं वाटलं नव्हतं.""सर्वेसाठी निवडण्यात आलेल्या प्रभागात जून महिन्यात मोठ्या संख्येने कोव्हिड-19 चे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांच्या शरीरात अॅंटीबॉडी निर्माण झाल्याची शक्यता आहे. कम्युनिटी ट्रान्समिशन किंवा सामाजिक संसर्ग झाला किंवा नाही याबाबत लोकांचं दुमत असू शकतं. परदेशातून आलेल्या लोकांपासून पहिल्यांदा हे इंन्फेक्शन सुरू झालं. पण आता सर्वेचे आकडे स्पष्ट करतात की कोव्हिड-19 चं समाजात सर्क्युलेशन होत आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)