निशिकांत कामत: सामान्य माणसाच्या आक्रोशाला वाचा फोडणारा दिग्दर्शक हरवला

  • तुषार कुलकर्णी
  • बीबीसी मराठी
निशिकांत कामत

फोटो स्रोत, AFP

'अंथरूण पाहून पाय पसरावेत असंच सांगितलं जातं पण कधी अंथरूण मोठं घ्यायचं सांगितलं जात नाही,' सातच्या आत घरातली मध्यमवर्गीय घरातली मुलगी आपल्या घुसमटीला वाट मोकळी करून देत सांगते.

निशिकांत कामतचे दिग्दर्शन असलेला हा पहिला चित्रपट, त्यानंतर डोंबिवली फास्ट, मुंबई मेरी जान, फोर्स, दृश्यम आणि लई भारी अशा व्यावसायिक आणि कला या दोन्ही स्तरावर गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन निशिकांत कामतने केलं होतं.

वेगवान पटकथा, मोजके पण समर्पक संवाद, धीरगंभीर पार्श्वसंगीत आणि कसदार अभिनय करणाऱ्या कलाकारांची फौज यावर निशिकांत कामतने सिनेरसिकांचं मनोरंजन केलं.

एखाद्या सामाजिक विषयावर आधारित चित्रपट म्हणजे तो रटाळ असेल असं अनेकांना वाटत होतं पण निशिकांत कामतने मनोरंजन आणि सामाजिक विषय या दोन्हीमध्ये संतुलन साधत दर्जेदार चित्रपट दिले.

फोटो स्रोत, Twitter

सातच्या आत घरातचा विषय पाहायला गेला तर अत्यंत साधा. आई-वडिल आपल्या मुला-मुलींनी नेहमी सांगतात की संध्याकाळ होण्याच्या आत घरात या.

एका बाजूला सर्व आधुनिक युग येत आहे रात्र आणि दिवसामधला फरक पुसट होत आहे त्याचवेळी सातच्या आत घरात या असे आदेश धुडकावून लावले जाणार ही धागा पकडून संजय सूरकरने कॉलेज जीवनावर आधारित चित्रपट काढला. हा चित्रपट निशिकांत कामतने लिहिला होता.

आपण मनाने किती जरी पुढारलो असलो तरी अद्यापही आपल्या आजूबाजूचं वातावरण तितकं सुरक्षित नाही हे त्याने दाखवून तर दिलेच पण आपल्या प्रेयसीवर बलात्कार झाल्यावर तिचा स्वीकार न करणारा बॉयफ्रेंड दाखवून नव्या युगातही जुन्या मानसिकतेनी ग्रस्त असलेल्या समाजही त्याने दाखवला.

या चित्रपटातून त्याने कोणताही संदेश दिला नाही पण समाजाच्या परिस्थितीचं दाहक वर्णन त्याने केलं.

फोटो स्रोत, Twitter

त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट म्हणजे डोंबिवली फास्ट. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या आपटेची घुसमट त्याने दाखवली. व्यवस्थेनी दुखावलेल्या आपटेचं रक्त अन्याय पाहिल्यावर खवळत असतं. त्यात त्याचा कोंडमारा होतो पण तो काही करू शकत नाही.

शेवटी तो हातात बॅट घेतो आणि त्याच्या भावनांना वाट मोकळी करतो. असं वाटतं याच स्पीडने गेल्यावर आपटे एका रात्रीत मुंबईचा क्राईम संपवतो की काय पण निशिकांत कामतने इथे हा चित्रपट सुपरहिरो मुव्ही न होऊ देता वास्तवदर्शीच ठेवला आहे.

खूप दबाव टाकला तर सामान्य माणूस पेटून उठू शकतो पण त्याच्या प्रतिक्रियेला मर्यादा आहेत असं त्याने दाखवलं. या चित्रपटाचा त्याने तामिळमध्ये पण रिमेक केला होता. आर. माधवन यात प्रमुख भूमिकेत होता. 2006 साली झालेल्या साखळी बाँबस्फोटाने मुंबई हादरली होती. लाइफ लाइन म्हटल्या जाणाऱ्या लोकलमध्ये हे बाँबस्फोट झाले. त्याने जनजीवन विस्कळीत झाले.

फोटो स्रोत, Twitter

मुंबई स्पिरिट-मुंबई स्पिरिट म्हटलं जातं पण शहरात राहणाऱ्या माणसांनाही भावना आहेत. त्यांना देखील पुन्हा उभं राहण्यासाठी वेळ लागतो. त्यांचं पुन्हा उभं राहणं इंस्टंट फुडसारखं नाही तर त्यामागे एक प्रक्रिया आहे, हे मुंबई मेरी जानमधून निशिकांत कामतने दाखवलं.

बाँबस्फोटाने प्रभावित झालेल्या विविध लोकांची कथा त्याने एका सुत्रात गुंफून नवा प्रयोगही करून पाहिला. हा निशिकांत कामतचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्याला रसिक आणि समीक्षकांची दाद मिळाली. नंतर फोर्स, दृश्यम, लई भारी आणि रॉकी हॅंडसम सारख्या पूर्णपणे व्यावसायिक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. दृश्यम आणि रॉकी हॅंडसम हे इतर भाषांमध्ये असलेल्या चित्रपटाचे रिमेक त्याने केले. फोर्स देखील तामिळचाच रिमेक होता. रॉकी हॅंडसम हा चित्रपट तर कोरिअन सिनेमा मॅन फ्रॉम नो व्हेअरचा ऑफिशियल रिमेक होता. कोरिअन चित्रपट खूप वेगवान असतात. त्यामुळे जर योग्य अॅडप्टेशन झालं नसतं तर त्याचं हसं देखील झालं असतं. पण त्याने ते आव्हान समर्थपणे पेललं.

फोटो स्रोत, Twitter@rieteshDeshmukh

लई भारीच्या निमित्ताने निशिकांतने आपला मोर्चा पुन्हा मराठीकडे वळवला. रितेश देशमुख आणि निशिकांत कामतची जोडी मराठी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. ज्याप्रमाणे तेलुगू-तामिळ चित्रपटात गावातला नायक शक्तिशाली लोकांना टक्कर देतो अगदी तसाच नायक निशिकांत कामतने उभा केला होता. रितेश देशमुखने म्हटलेले डायलॉग्स अनेकांच्या ओठावर होते. मोजकेच परंतु दर्जेदार चित्रपट देणाऱ्या निशिकांत कामतच आज दुपारी 4 वाजता निधन झालं. तो 50 वर्षांचा होता. आणखी काही वर्षं तो राहिला असता तर याहूनही दर्जेदार चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले असते अशी हळहळ एक चाहता म्हणून मला वाटते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)