कोरोना व्हायरस : फ्लू-शॉट्स किती फायदेशीर?

  • मयांक भागवत
  • बीबीसी मराठीसाठी
फ्लू शॉट्स

फोटो स्रोत, Getty Images

ऋतूत झालेला बदल ज्याला आपण सिझन चेंज असं म्हणतो किंवा तापमानात अचानक झालेल्या बदलामुळे अनेकांना ताप येतो.

डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात, अरे साधा 'फ्लू' आहे, तीन-चार दिवसात ठणठणीत होशील. आपण औषध घेतो आणि काही दिवसात ताप गायब होऊन आपण कामावर परततो.

व्हीडिओ कॅप्शन,

कोरोना लस - संपूर्ण भारतीय बनावटीची कोरोना लस ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता

जगभरात दरवर्षी लाखो लोक 'फ्लू' मुळे आजारी पडतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, अंदाजे 3 ते 6 लाख लोकांना दरवर्षी 'फ्लू' मुळे आपला जीव गमवावा लागतो. 'फ्लू' जरी साधा वाटत असला तरी काहीवेळा हा आजार गंभीर स्वरूपाचा, तर काही प्रकरणांमध्ये जीवघेणा ठरू शकतो.

फ्लू शॉट्स म्हणजे काय?

'इन्फ्लूएन्झा' व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनला 'सिझनल फ्लू' असं म्हणतात. सामान्यांना या 'फ्लू' पासून सुरक्षा देण्यासाठी लस उपलब्ध आहे. याला फ्लू शॉट्स असं म्हंटलं जातं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 'फ्लू'पासून बचावासाठी लस अत्यंत प्रभावी हत्यार आहे. 'फ्लू' विरोधातील लसीमुळे 'इन्फ्लूएन्झा' व्हायरसमुळे होणारे गंभीर आजार रोखता येऊ शकतात आणि सामान्यांचे जीव वाचवता येऊ शकतात.

'फ्लू' विरोधातील लस 'इन्फ्लूएन्झा' व्हायरसमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करते. लस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी शरीरात 'फ्लू' विरोधात अॅंटीबॉडीज किंवा रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. डॉक्टरांच्या मते, लसीमुळे 'फ्लू' आणि 'स्वाईन फ्लू' पासून संरक्षण होण्यास मदत मिळते.

'इन्फ्लूएन्झा' व्हायरसमुळे होणाऱ्या 'फ्लू'ची लक्षणं

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, अचानक ताप येणं, ड्राय कफ, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, घसा कोरडा पडणं आणि सर्दी ही 'सिझनल फ्लू' ची लक्षणं आहेत. जगभरात लाखो लोक डॉक्टरांकडे न जाता किंवा औषध न घेताही बरे होतात.

कोव्हिड-19 काळात फ्लू-शॉट्स किती फायदेशीर?

इन्फ्लूएन्झा सदृश्य आजार, फ्लू आणि 'स्वाईन फ्लू' मध्ये फुप्फुसांवर आघात होतो. योग्य उपचार वेळीच मिळाले नाहीत तर, न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.

तज्ज्ञांच्या मते रुग्णाला न्यूमोनिया असल्यास, कोरोना व्हायरस इंन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोव्हिड-19 काळात 'फ्लू-शॉट्स' कोरोना व्हायरस विरोधात प्रभावी नसले, तरी आजारापासून दूर राहण्यासाठी सर्व वयोगटातील लोकांनी फ्लू-शॉट्स घ्यावेत असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

याबाबत बीबीसीशी बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव बालन म्हणतात, "कोव्हिड-19 आणि फ्लूमध्ये विषाणू फुप्फुसातील एकाच रिसेप्टरला बाइंड होतो. फ्लू शॉट्स घेतल्यामुळे फुप्फुसातील रिसेप्टर्स व्हायरसला एक्सपोज होत नाहीत. शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. न्यूमोनिया 'फ्लू'मुळे निर्माण झालेली गुंतागुंत आहे. या लसीमुळे इन्फेक्शनमुळे न्यूमोनियानंतर निर्माण होणारी गुंगागुंत होण्याची शक्यता कमी होते."

"कोव्हिड-19 च्या काळात लहान मुलांना फ्लू-शॉट्स देणं फार महत्त्वाचं आहे. यामुळे मुलांना इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होईल. माझ्याकडे येणाऱ्या अनेक मुलांना फ्लू-शॉट्स देण्यात आले आहेत. एवढंच नाही, तर कामावर जाण्याआधी प्रौढ व्यक्तींचाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फ्लू शॉट्स घेण्याकडे कल वाढत आहेत. कोरोनाच्या काळात लोकांनी फ्लू शॉट्स घ्यावेत," असा सल्ला डॉ. बालन यांनी दिलाय.

तज्ज्ञांच्या मते, मुंबईसारख्या शहरात सिझनल फ्लूचं इन्फेक्शन पावसाळा सुरू होण्यापासून म्हणजे जून महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत रहातं. त्यामुळे या काळात फ्लू किंवा फ्लूसदृष्य लक्षणांनी डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या मोठी असते.

"ताप, सर्दी, खोकला ही फ्लू आणि कोव्हिड-19ची लक्षणं सारखीच आहेत. फ्लू शॉट्स घेतल्याने फ्लू किंवा फ्लू सदृष्य आजाराने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी होईल. 60 ते 70 टक्के रुग्णसंख्या कमी झाल्याने कोव्हिड काळात रुग्णालयांवरील ताण कमी होईल. फ्लू शॉट्स घेतल्यामुळे आजारामुळे निर्माण होणारी मॉर्बिडीटी कमी होईल. त्यामुळे फ्लू शॉट्स गरजेचे आहेत," असं हिरानंदानी रुग्णालयातील छातीरोग आणि क्रिटिकल मेडिसीनतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मेहता यांनी सांगितलं.

'फ्लू' शॉटने कोरोना बरा होतो?

कोरोना व्हायरसविरोधात अजूनही कोणतीही लस किंवा ठोस औषध उपलब्ध नाही.

फ्लू शॉट्स घेतल्याने कोरोना बरा होतो या लोकांमध्ये पसरलेल्या गैरसमजाबाबत बोलताना डॉ. स्वप्नील मेहता म्हणतात, "फ्लू शॉटमुळे घेतल्यामुळे कोव्हिड-19 बरा होतो असा लोकांमध्ये गैरसमज आहे. आमच्याकडेही अनेक लोक याबाबत विचारणा करत आहेत. कोरोना व्हायरस हा इन्फ्लूएन्झा व्हायरसपासून पूर्णत: वेगळा आहे. त्यामुळे फ्लू शॉट्सचा कोरोना व्हायरसवर काहीही परिणाम होत नाही."

कोणी घ्यावे फ्लू शॉट्स?

WHO च्या शिफारसींनुसार, गर्भवती महिला, 6 महिने ते 5 वर्षांपर्यंतची लहान मुलं, 65 वर्षावरील वयोवृद्ध व्यक्ती आरोग्य कर्मचारी आणि इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी दरवर्षी फ्लू-शॉट्स घेणं गरजेचं आहे. कारण, या व्यक्तींचा हाय रिस्क ग्रूपपमध्ये समावेश होतो.

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईत राहाणाऱ्या श्वेता रेडीज म्हणतात, "माझ्या 8 वर्षांच्या मुलीला गेल्या 20 दिवसांपासून खोकला होता. औषधांनी खोकला बरा झाला. पण, कोरोनाच्या काळात लहान मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी डॉक्टरांनी एक 'फ्लू' शॉट घेण्याचा सल्ला दिलाय. जेणेकरून पावसाळा आणि हिवाळ्यात हवामान बदलल्यामुळे होणारं फ्लूचं इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होईल."

'फ्लू' विरोधी लस किती प्रभावी?

पुण्यात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ. संवेदा समेळ बीबीसीशी बोलताना सांगतात, "एचआयव्ही, हृदयरोग, डायलेसिसवर असणारे रुग्ण, अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण यांची इम्युनिटी कमी असते. अशा रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फ्लू शॉट्स फार प्रभावी आहेत. या रुग्णांच 'फ्लू' पासून संरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे."

फोटो स्रोत, Getty Images

"कोव्हिड-19 च्या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांना फ्लू शॉट्स घेण्याचा सल्ला आम्ही देतो. अनेक रुग्णांना आत्तापर्यंत फ्लू शॉट्स देण्यात आले आहेत. फ्लू शॉट्समुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता 50 ते 60 टक्क्यांनी कमी होते. इन्फेक्शन झालंच तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्याची तीव्रता आणि गुंतागुंत कमी होण्यास मदत होते," असं त्या पुढे म्हणाल्या.

कधी घ्यावा फ्लू शॉट?

डॉ. स्वप्नील मेहता पुढे म्हणतात, "जागतिक आरोग्य संघटनेने भारतात दोन वेळा पावसाळा सुरू होण्याअगोदर आणि हिवाळा सुरू होण्याआधी फ्लू शॉट घेण्याचा सल्ला दिलाय. जेणेकरून पावसाळा आणि हिवाळ्यात होणाऱ्या फ्लूच्या इन्फेक्शनपासून संरक्षण होण्यास मदत होईल. भारतात लोकांमध्ये पाश्चिमात्य देशांसारखी फ्लू शॉट्स घेण्याबाबत जागरूकता नाही. मात्र, हळूहळू भारतीयांमध्येही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फ्लू शॉट्स घेण्याबाबत जागरूकता वाढते आहे."

'फ्लू' विरोधातील लसीबाबात असणारे गैरसमज

1- 'फ्लू' हा गंभीर आजार नाही-उत्तम आरोग्य असणाऱ्यांनाही फ्लू होण्याची शक्यता असते. मात्र, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना याचा धोका जास्त असतो.

2- 'फ्लू' लसीमुळे फ्लू होईल- 'फ्लू' लसीमुळे फ्लू होत नाही. लस घेतल्यानंतर अंगदुखी किंवा ताप आला तर तो सामान्य आहे. शरीराने लशीला केलेला तो प्रतिकार आहे.

3- फ्लूच्या लसीमुळे साइड इफेक्ट होतात- फ्लू लस पूर्णत: सुरक्षित आहे.

4- 'फ्लू' लस घेतल्यानतंरही फ्लू झाला. म्हणजे लस प्रभावी नाही- 'फ्लू'चे विविध प्रकार आहेत. त्यामुळे लस घेतल्यानंतरही फ्लू होऊ शकतो. कारण व्हायरस सारखा बदलत असतो.

(स्रोत -जागतिक आरोग्य संघटना)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)